Wednesday, December 26, 2012

वैकुंठातला निवारा

हा वृद्धाश्रम इथे कसा?
स्मशानास खेटून
मृत्यूच्या फलाटावरच्या
एखाद्या वेटिंगरूम सारखा
बोलवा, बोलवा
त्या संस्था चालकांना
नगर नियोजकांना, सिटी इंजिनियरना
.................................
ते बघा
बघा ते, पाय खरडत खरडत
चाललेले आजोबा
ते रोज दिसतात
गेले कित्येक दिवस,
महिने, वृद्धाश्रमातून निघतात
आणि जाऊन बसतात
स्मशानाच्या दरातील बाकावर
'राम नाम सत्य' चा गजर झाला
कि उठून उभे राहतात
एकटक बघत राहतात अंतयात्रेकडे
काहीतरी मोजतात
स्वत:शीच पुटपुटतात
मान हलवतात
पुन्हा बसतात
पुढच्या प्रेतयात्रेची वाट पाहतात  
कातरवेळी जेव्हा दिशा उदास होतात
आणि खांदे पडलेल्या चाकरमानी सावल्या
घोळक्याने घरी सरकत असतात
तेव्हा ते असे एकटे बसलेले बघून
मलाच गलबलून येते
या पेक्षा ते मेलेले बरे, असे वाटते
संध्याछाया दाटून येताना
त्यांनी का दिवस मोजत बसायचे
तेही स्मशानाच्या दारात?
अरे, कोणीतरी हा वृद्धाश्रम
हलवा ना येथून
......................
अहो पत्रकार
काहीतरी गैरसमज होतोय तुमचा
तो म्हातारा चांगला धीट आहे
डोक्यावर थोडा परिणाम झालाय
बायको गेल्या पासून, इतकंच
दोन्ही पोर अमेरिकेत असतात
कोथरूडचा बंगला भाड्याने देऊन
स्व:खुषीने इथे राहतोय
मरणाची भीती नाही त्याला
त्याला हेवा वाटतो
मढ्या भोवतालच्या गर्दीचा
एके काळी मोठा गोतावळा होता
त्याला आता चिंता आहे
त्याची तिरडी उचलायला
चार जण असतील की नाही याची
येडा साला
तो दिवस नाही मोजत स्वतःचे
माणसे मोजतो, अंतयात्रेतील माणसे
...............
तरी पण हा मानसिक छळच त्यांचा
हा वृद्धाश्रम इथे नसता तर
तर.. नाही..नाही..वृद्धाश्रम नव्हे
हे स्मशानच इथे नसते तर
हे स्मशान इथे कसे?
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
माणसाच्या जगण्याच्या
जगण्यासाठीच्या संघर्षाच्या
सर्व खुणा आजूबाजूला
त्यात हे स्मशान कसे?
हे गावाबाहेर हवे
दूर दूर, खूप दूर
या शहराच्या सीमेबाहेर
नगर नियोजकांना
काही अक्कल आहे की नाही?
..................
बरोबर आहे तुमचे
पण हे स्मशान हद्दीबाहेरच होते
वाहत्या नदीकाठावर
गावातल्या कोलाहलापासून दूर
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
स्मशानावरच उभे आहे
पूर्वी इथे सगळीकडे स्मशानच होते
आम्ही तरी काय करणार
शहरच विस्तारत गेले
स्मशानास येउन भिडले
कसा थोपवायचा हा विकास?
हे फक्त या शहरातच घडतंय
असेही नाही, सर्वत्र हीच परिस्थिती
आता अपरिहार्य आहे
शहर आणि स्मशाना मधील
हद्दी पुसल्या जाणे
=================
अभिजित अत्रे

Friday, December 14, 2012

गझल:-- ग्यांगवॉर

प्रेमावर अनेकांनी खूप गझल लिहिल्या आहेत. दोस्त म्हणाला तू  एखाद्या रुक्ष विषयावर-- पुण्यात , पिंपरीत, मुंबईत होणाऱ्या टोळीयुद्ध, मारामारी, इत्यादी.. इत्यादी विषयांवर -- गझल लिही. त्याच्यासाठी.... 
==============================
गंजून गेले भाले, म्यान तलवार झाली
जरीपटके झाले ओले, आज कोयत्यास धार झाली

बूरूज ढासळून पडले, तोफ आता गार झाली
दगडी चाळीत जे दडले, त्यांचीच चर्चा चिकार झाली

पुस्तकात  लपवलेल्या  पिस्तूलाची, कहाणी आता बेकार झाली
काल मावळात गावठी कट्ट्यांची, विक्री बेसूमार झाली

ही वाट काळोखाची, जिंदगी जूगार झाली
ही न युद्धे वीरांची, गल्लीत शिकार झाली

संगे कोणी ना आला, गर्दी हुशार झाली
थोडा अंधार काय झाला, सावलीही पसार झाली

या शहरातील पांडवांची, वस्ती का लाचार झाली?
इथे शमीच्या झाडांची, कत्तल फार  झाली  
==========
अभिजित अत्रे

Monday, December 3, 2012

नकार

कडेलोटाचे फर्मान निघाले तेव्हाही
शाबूत होते माझ्या बेसावध डोळ्यात
एक इंद्रधनुष्य, त्याच्या सप्तछटांनसकट
आता हे रंगहीन अस्तित्व कोसळत आहे
एका तीव्र उतारावरून, खोल खोल
तळ नसलेल्या काळोख्या दरीत
एखाद्या उंच पर्वताच्या शिखरावरून
निसटलेल्या दिशाहीन पत्थरा प्रमाणे
आता अटळ आहे
ठिकऱ्या होऊन विखरून पडणे
पण
अजूनही तुझ्या शब्दांवरचा माझा विश्वास
तसूभरही कमी झालेला नाही
आठवते?, पाठ वळवून निघताना
तू म्हणाली होतीस की तसे
माझे काही बिघडणार नाही फारसे
तुझ्या नकाराने 
==========
अभिजित अत्रे

Monday, November 5, 2012

एका गुंठा मंत्र्याची कैफ़ियत

भिंतीला ओल आली की
बुरशी धरते, पोपडे पडतात
मोड येत नाहीत, मातीसारखे
तरीही परवानगी दिलीत
एन.ए. ला, गुंठेवारीला
धरणीशी जोडलेली नाळ
अशी एका फटक्यात तोडलीत?
विचारले एकदा पत्रकारांनी मंत्र्यांना, खाजगीत
तेव्हा ते हसले, म्हणाले, भलेबहाद्दर
आता तुम्ही जाब विचारणार आम्हाला?
आमच्या सगळ्याच पिढ्या बरबाद झाल्या की
शेतीच करता करता, तेव्हा कुठे होता तूम्ही?
आम्हीही लहानपणापासून एकत आलो
भारत एक कृषी प्रधान देश आहे
पण कृषी करणारा कधीच प्रधान झाला नाही
फक्त आज्या - पणज्याच्या हातावरच्या
कमनशिबी रेषाच उमटत राहिल्या अवजारांवर
आयुष्य सलत राहिले पायात रुतलेल्या
बांधावरच्या बाभळीच्या काट्या सारखे
कणसात कधी दाणे भरलेच नाहीत असे नाही
पण जास्त करून दारिद्र्यच पिकले
कॉंग्रेसच्या गवतासारखे, वर्षानु वर्षे
आणि पिढ्यानां सवय झाली
अंधाराने घर सारवायची
अशी सवय मोडणे खूप कठीण
तुमच्यापेक्षा जास्त आमचा बाप चिडला होता
दोन दिवस जेवला नाही, बोलला नाही
त्याला जबरदस्तीने उचलून
इथे या फ्ल्याट मध्ये थांबवले
आता त्यालाही कळतय
तळ बुडालेल्या विहिरीतून पाणी शेंदण्यापेक्षा
खूप सोपे असते फ्लशचे बटण दाबणे
निर्णय घेताना माझेही  डोळे  भरून  आले  होते
पण काळी आईच कंटाळली होती
म्हणाली, असे अर्धवट भिजून
कुणाचेच कल्याण होत नाही
एकदाच काय ते
सिमेंटने न्हाऊ माखू घाल
बळी राजाचे राज्य नाही आले या देशात
गुंठामंत्र्यांचे तरी येऊ दे!
================
अभिजित अत्रे

Friday, October 19, 2012

मर्जर

आदेशाप्रमाणे मंत्र्यांच्या
अठ्ठावीस गावे शहराच्या
हद्दीत समाविष्ट करण्याच्या
प्रस्तावावर सही करून
विश्लेषणाचे तक्ते डकवून
पाणी पुरवठ्याचे गाजर दाखवून
अनधिकृत बांधकामांची भीती घालून
मेगासिटीची झालर लावून
आणि
सिग्नेचरचे दोन पेग रिचवून
जरा उशीराच रात्री घरी
जेव्हा परत आला टाऊनप्लॅनर

तेंव्हा त्याची बायको
मुलाला झोपवता झोपवता
मांडीवर डोके थोपटता थोपटता
एक गोष्ट सांगत असते
ईसापनीतीची
बैल बनू पाहणाऱ्या
मोठे मोठे पोट फुगवणाऱ्या
फुगवता फुगवता फुटणाऱ्या
फुगून फुटून मरणाऱ्या
बेड्कीची
===========
अभिजित अत्रे

Wednesday, October 10, 2012

दगडूशेठ

आठवते तुला? 
वाड्यात रंगलेला लपाछपीचा खेळ
कधी कधी जोगेश्वरीचा बोळ ओलांडायचा
तेव्हा येऊन दडायचो गाभारयात, बिनदिक्कत
कधी कधी, सकाळी सकाळी, सगळ्यांच्या नकळत
आज्जी पाठवायची तपकीर आणायला
तेव्हा येता जाता पारोशानेच शिरायचो देवळात
खोबऱ्याचे तुकडे टाकायचो तोंडात, बिनधास्त

वाडा इतिहासजमा झाला
तपकिरीचे दुकान, आणि आज्जीही
तू पण किती बदलास
परवा आलो होतो, ऐन उत्सवात, रात्रीचा
पोराने हट्ट धरला, म्हणून निघालो गर्दीचा

मंदिराच्या खूप अलीकडेच, रस्त्यावर
मोठ्या मोठ्या प्रवेशद्वारांच्या कमानी
हे नवीन, बाकी जुनेच,
तोच गोंधळ व तीच धक्काबुक्की
मी वाट काढत पुढे सरकतो
फोन वाजतो...वडील बोलत होते ...
कुठे आहात? दगडूशेठला
कशाला घेऊन जातोस नातवाला गर्दीत
चुकला, हरवला, काही झाले तर..तर काय?
.. मी हसतो..त्यांचा जन्म गेला या गल्ली बोळात
अति काळजी, मी फोन कट करतो
पोराच्या मनगटावरची पकड मात्र घट्ट होते..

बाबा मंदिरात मूर्तीच नाही
अरे ती समोर, मांडवात हलवतात
एवढी मोठी मूर्ती कशी उचलतात
अरे ती आतून पोकळ असते
बाबा देव पोकळ असतो?
देव नाही रे.. मूर्ती
...............

बाबा तो फुलवाला कुठे बसतो
कोणता फुलवाला?
तो, ज्याने ती बॉम्बची ब्याग ठेऊ दिली नाही.. तो
...(बापरे.. पोरगा पेपर वाचतो कि काय?)
...फालतू प्रश्न विचारू नकोस
समोर बघ, तो बघ रंगीबेरंगी महाल
.........
त्या मचाणावर सोल्जर का आहेत मशीनगन घेऊन?
बाप्पाचे संरक्षण करायला
पण बाप्पा आपले रक्षण करतो ना
मग पोलीस कसे करणार त्याचे रक्षण?
...
पोरगा मशीनगनकडे एकटक पाहतोय
मला लोकांच्या हातातला नारळ हँण्डग्रेनेड भासतोय
हसू नकोस, ....तुझे बरे आहे बाप्पा
तुझा विमा काढलाय पन्नास कोटींचा
आम्हा भक्तांचे काय?
(माणसाने किती प्रगती केली बघ बाप्पा
देवाचा पण विमा काढू शकतो माणूस)

.....नाही रे..मी अजिबात घाबरलेलो नाही
काहीतरीच काय.. आणि तू असताना कसली भीती
त्यात हा माझ्याच घराचा परिसर
भीती नाही रे .. खरे सांगू.. मी वैतागलोय
पोलीस शिट्ट्या वाजवतोय, कंटाळलेला कार्यकर्ता
पुढे चला, पुढे चला, चा घोष करतोय....

तू समोर दिसतोयस, कोणीतरी जुनी ओळखही देतोय
पण मेटल डिटेक्टरच्या कमानीतून पुढे जावत नाहीए
मी उजवीकडे, लक्ष्मीरस्त्यावर वळतोय
.. ..
इथे बरेच शांत आहे ..विशेष गर्दीही नाही
अगदी आम्हा तिघांच्या चालण्याचा
आवाजही ऐकू येतोय
माझ्या चपलेचा, पोराच्या बुटाचा
आणि हळू हळू सरपटणाऱ्या
दहशतीचा
......
होईल होईल
या सोबतीचीही सवय होईल
पुढल्या वर्षी नक्की येईन!
==========
अभिजित अत्रे

Monday, September 3, 2012

एक गाव हवे आहे

प्रस्ताव खूप पूर्वीच पाठवलाय
मुख्यमंत्र्यांकडे
अजून उत्तराची वाट पाहतोय
तसे मागणे काही फार मोठे नाही
एक गाव हवे आहे

अगदी लहान, छोटेसे
वेंगुर्ला, चिपळूण, रत्नागिरीच्या
कोणत्याही वेसेला खेटलेले
थोडे आंबा फणसाच्या झाडांचे
ताडाचे, माडाचे, नारळीचे
कौलारू घरांचे
सताड उघड्या दारांचे
समुद्राची गाज ऐकत
पोफळीच्या बागेत
निवांत पहुडलेले
किवां ओसरीवरील
करकरत्या झोपाळ्यावर
संथपणे पाय हलवीत
सुपारी कातरत बसलेले
एक गाव हवे आहे

संह्याद्रीच्या कुशीतलेही चालेल
बोरी बाभळीच्या पायवाटेवरचे
करवंदीच्या  जाळीचे
शेळ्या मेंढ्यांच्या लेन्ड्यांचे
सुगरणीच्या खोप्याचे
शिळ घालणाऱ्या राघूचे
निळ्या जांभळ्या आकाशाचे
सदरा फडफडवणाऱ्या वाऱ्याचे
डोंगराच्या उतारावर
तोल सावरत बसलेल्या घरांचे
एक गाव हवे आहे

चालेल चालेल
नदीच्या काठावरचे
हिरव्या मळ्यांचे
वडा पिंपळाचे
सूरपारंब्यांचे
शेणाने सरावलेल्या अंगणाचे
तुळशी वृंदावनाचे
काळ्या पडलेल्या तांब्याच्या बंबांचे
नांगराचे, जात्याचे, सुपाचे
एक गाव हवे आहे

नाही
मी हे स्वतःसाठी मागत नाही
मी तिथे क्षणभरही थांबणार नाही
मला गावातील लोकांचे भलेही करायचे नाही
त्यांना तर मी हुसकावून काढणार
नेसत्या वस्त्रानिशी
सरकार करेलच त्यांचे पुनर्वसन कोठेतरी
मला माणूस विरहित
पण मानववस्तीच्या सर्व खुणा
जिथे जपल्या गेल्या आहेत असे
एक गाव हवे आहे

मला या गावावर घट्ट
सिमेंटचा डोम उभारायचाय
त्यावर लोखंडाचा गिलाव द्यायचाय
मग माती टाकून खोल खोल
बुजवून, पुरून टाकायचं
लवकरात लवकर, त्यासाठी
एक गाव हवे आहे

मान्य खर्च खूप होईल
पण इतके तर आपण करायलाच हवे
आपल्याच नावासाठी, स्वार्थासाठी
आता वेळ तशी जवळच आलीय प्रलयाची
हे जग बुडेलच कधीकाळी भविष्यात
जे अटळ आहे ते कुणाला चुकलय ?
कधी  ?केव्हा  ?  आता यावर वाद नको
एक गाव हवे आहे

ही सगळी शहरे वाहून जातील
त्यांच्याच गटारातून
नवे जग पुन्हा प्रगटेल
कुठल्याश्या पिंपळपानावर बसून
किवां एखाद्या अमिबातून
त्यानंतर काही हजार वर्षे उलटल्यावर
एके दिवशी गळून पडेल
पुन्हा एकदा
माकडाची शेपटी
मग ते दोन पायावर चालेल
माणूस बनेल
खूप खूप प्रगती करेल
चंद्रावर जाईल
पुन्हा नवे शोध, नवे बोध
हे  सगळं सगळं दिसतंय मला
म्हणून मला घाई आहे
म्हणून मी केव्हाचा ओरडतोय
एक गाव हवे आहे

सगळी सगळी सुखे उपभोगल्यावर
नवा माणूसही घेऊ पाहिलं
पृथ्वीच्या अंतरंगाचा शोध
आपल्याला जसे सापडलेले
हरप्पा मोहिन्जदारो
तसेच कधीतरी त्याला
हे लपवलेले गाव सापडेल
मग तोही होईल चकित
हजारो युगांच्या आधी
त्याच्याच सारखे माकडाचे वंशज
या जगात होते या साक्षात्काराने
तोही होईल  सद्दगदित
हे गाव पाहून
म्हणेल पूर्वी कधीतरी माणूस
एक साधे, सोपे जीवन जगत होता
निसर्गाच्या मांडीवर बसून
कदाचित तो यातून बोध घेईल
किवां कदाचित घेणारही नाही
पण
त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात
आपल्या कधीकाळच्या सुसंस्कृतपणाची
एवढी एखादी तरी खूण उमटायलाच हवी
म्हणून एक पुरावा
मला मागे ठेवायचाय
तसे फार नाही हे मागणे
तुम्हीही  जरा लावा ना जोर
सांगा ना  मुख्यमंत्र्यांना
एक गाव हवे आहे
पुरण्यासाठी.
=================
अभिजित अत्रे

Wednesday, August 22, 2012

सत्ता आणि सुंदरी

सोंदर्य हस्तगत करण्याची
एक आदिम लालसा
नेहमीच लसलसते प्रत्येक सत्तेत
याच हव्यासापोटी
एखादा लंकाधीश
सोन्याच्या राजधानीसह जळून जातो
एखादा दु:शासन
शंभर पोरांच्या जन्मदात्रीस निपुत्रीक बनवतो

पण
आसीम सोंदर्यालाही असतोच
एक पुरातन शाप
त्यालाही मोजावी लागते किमंत
सत्तेच्या जवळ जाण्याची

म्हणूनच
कुरुक्षेत्रावरील विजयाच्या पताका
पांचालीच्या मुलांच्या रक्ताने भिजतात
आणि  अग्निपरीक्षा गाडल्या जातात
खोल खोल दुभंगणाऱ्या धरतीत 

चित्तौडच्या किल्ल्याबाहेर
घोड्यांच्या टापांचे आवाज वाढताच
केशरात  जपलेला एक सकवार  देह
विसर्जित होतो लालबुंद जौहरात
आणि, मुघल- ए- आझमच्या
विजयाची नौबत झडताच
राजप्रसादाच्या भिंतीत कळ्या गुदमरतात

युगांन युगे,
हे असेच चालू आहे
एखाद्या सनातन संगनमता सारखे
अनिच्छेने असो किवां इच्छेने
जेव्हा जेव्हा
सत्ता काबीज करू पाहते आसीम सोंदर्य
किवां सोंदर्य आवळते मखमली पाश तख्ताभोवती
तेव्हा तेव्हा
ते जळून दग्ध होताना पहिले आहे
सतयुगापासून कलियुगाने

म्हणूनच
मला नाही नवल वाटत
मी नाहीं कारण शोधत
गीतिका शर्माच्या फासाचे
फिझाच्या 'गूढ' मृत्यूचे
भंवरी देवीच्या हत्येचे
===============
अभिजित अत्रे

Thursday, August 9, 2012

जाब

ठाऊक आहे मला
एके दिवशी परत करायला लागेल
ज्याचे त्याला, हे शरीर
आणि मग कोण जाणे किती
नश्वर आवर्तने करून पुन्हा मी
जन्मीन, एक माणूस म्हणून
भीती मरणाची नाही
भीती ही आहे कि तेव्हाही मी
असाच बेसावध राहीन याची
आणि तसे झाले तर पुन्हा,
पुन्हा व्हावे लागेल निरुत्तर
जेव्हा विचारील ते टोकदार प्रश्न

तसा मी वाकबगार आहे उत्तरे देण्यात
बायकोला, साहेबाला, मित्रांना
अगदी वकिलाच्या नोटिशीचाही
मी भूगा भूगा करतो माझ्या
हजरजबाबी वाणीने आणि पेनाने
पण ते चालून येते माझ्यावर
सवालांचे अठराअक्षौहिणी सैन्य घेऊन
आणि एका क्षणांत चोळामोळा करते
माझ्या समर्थनांच्या बुजगावण्यांचा

तसे फार मोठे नाही ते
माझ्याच एवढे आहे
आणि जगेलही माझ्याच एवढे
अजून पाच.. दहा.. वीस .. तीस वर्ष
नक्की किती हे फक्त ते जाणून आहे
ते.... माझेच आयुष्य
ते विचारते मला जीवघेणे प्रश्न
माझ्या बिछान्या भोवती
दात कोरत उभे राहते ते रात्री
आणि मला विचारते जाब
मी वाया घालवलेल्या त्याच्या
वर्षांचा.
=================
अभिजित अत्रे

Monday, August 6, 2012

मुरलीधराची ऑबीच्यूरी

परवा भर दुपारी
खून झाला सदाशिव पेठेत
खुन्या मुरलीधराचा
नाही मूर्ती शाबूत आहे अजून
गाभारयासकट
तिचे देवत्व जपले आहे आम्ही
हेरीटेजचा ट्याग लावून
(साल, देवालापण हेरीटेजच्या यादीत
घालू शकतात माणसे, कमाल आहे)
तर सांगायचा मुद्दा हा की
मंदिर अजून जागेवर आहे
पण देवाच्या पोटातून
सळया गेल्यात आरपार
रक्त नाही आलेले
पण सिमेंट वाहतंय भळाभळा
पाटाच्या पाण्यासारखे
जीर्ण वाडे आणि
खोखो कबड्डीची मैदाने ओलांडून
लक्ष्मी रस्त्यापर्यंत पसरलेत
त्याचे ओघळ
पण कुठेच काही खबर नाही खुनाची
लोक म्हणतात
देव मरूच शकत नाही
जो अमर आहे
त्याचा कसा खून होईल?
जाऊदे..
आपणतरी कशासाठी गोळा करायचे
कोणीतरी, कधीतरी, कुठेतरी, मेल्याचे
पुरावे? आणि,
ज्यांनी खून केला ते छापतीलच
सगळ्याच पेपरात लवकरच
एक दहा-वीस मजली ऑबीच्यूरी
===============
अभिजित अत्रे

Wednesday, August 1, 2012

काही क्षणिका


एक झाड
==========================
टेकडी वरचा तो पर्णहीन पुरातन वृक्ष
तसा जिगरबाज
त्याने सोडली नव्हती आशा
नव्या हिरव्या पालवीची
अन धाडले होते मुळांना
खोल खोल
जेव्हा दगडच लागला
तेव्हा दिली होती साद
तेव्हा नाही दिले तू
हाकेला उत्तर
आत्ता दाटून येतंय तुला
पण आता वठलेल खोड
खराट्याच्या काड्या झालेले
हात उंचावून भिक मागतय
आता पाऊस नको...
...वीज पाठव
*****************
एक खासदार
******************************
सुखी माणसाकडे सदराच नसतो
हे समजल्यावर तो नागडाच
फिरायला लागला गावभर
लोक हसले, फिदीफिदी
मग त्याने त्याचे कातडेच
छिलून घेतले
आता तो मजेत आहे
गेंड्याची झूल पांघरून
हिंडतोय सुखाने
कधी राज्यसभेत
कधी लोकसभेत
***************
बिल्ल्यात डोकावताना...
******************
जनरलच्या कडक इस्त्री केलेल्या
ऑलिव्ह ग्रीनवर ऐटीत रूळलेल्या
शिस्तबद्ध ओळीत लगडलेल्या
रंगीबेरंगी रीबिनीत सजलेल्या
डझनभर पदकांपेक्षा
नेहमीच जास्त असते संख्या
युद्धात मारल्या गेलेल्या
जवानांची
म्हणूनच त्या चकचकीत बिल्ल्यात
मला प्रतिबिंबित होताना दिसतात
शिलाई मशीन समोर वाकलेली
पांढरी कपाळे
****************
अभिजित अत्रे
 

Saturday, July 28, 2012

गंमत गाणे: अनूकरण

दहाव्याच्या विधीसाठी जाताना
ओम्कारेश्वरापाशी वळताना
पहिला गुरुजींनी चालताना
डोश्याचा स्टॉल उघडताना

मालक म्हणाला गुरुजी काय घेणार
आम्ही हवी ती व्हरायटी देणार
मसाला डोसा - अमूल डोसा
शेजवान डोसा - म्हैसूर डोसा
स्पंज डोसा- लोणी डोसा
पेपर डोसा - रवा डोसा
कट डोसा - सेट डोसा
का घेता  आपला - साधाच डोसा?

परतल्यावर घाटावर गुरुजीना विचारले एकाने
दक्षिणेचा अंदाज सांगा जरा बेताने
गुरुजी म्हणाले -- वाचला नाही का फळा?
पिंडास पक्षी कोणता --शिउ दे बाळा
सफेद हवा -- का काळा?
पांढरा बगळा -- का गाणारी कोकीळा
डोमकावळा - का आपला साधाच कावळा?


आणि हवेत फिरत असतो आत्मा पितरांचा 
त्याला द्यायचा आपण मोक्ष कितीचा?
शंभरात प्रेतात्मा
दोनशेत मृतात्मा
तीनशेत सुखात्मा
चारशेत हुतात्मा
पाचशेत अंतरात्मा
दक्षिणे शिवाय -- भटकती आत्मा
============
अभिजित अत्रे

Monday, July 23, 2012

परीराणी

परीराणी परीराणी ---  का गं तुझ्या डोळा पाणी
पिंजलेल्या धुक्यातून --- का गं तुझी उदास कहाणी?


परीराणी परीराणी--- तुझा झगा कसा फाटला
जादूच्या छडीवरचा --- तारा कसा तुटला?


परीराणी परीराणी--- का गं तुझी मूक वाणी
चांदण्यात भिजलेली --- गेली कुठे तुझी गाणी?


परीराणी परीराणी--- तुझे पंख कुठे गेले
आकाशाला वेढणारे --- तुझे स्वप्नं कुठे गेले?


परीराणी परीराणी--- तुझे रंग का गं उडून गेले
परीराणी परीराणी--- तू लग्न का गं केले?
====================
अभिजित अत्रे

Wednesday, July 18, 2012

का येत नाही पाउस?

ते म्हणाले भक्ती आटलीय म्हणून...
आम्ही विठोबाला साकडे घातले

ते म्हणाले माणसा माणसात तेढ वाढलीय म्हणून...
आम्ही सर्वधर्मीय प्रार्थना म्हटली

ते म्हणाले प्रथा पाळल्या नाहीत म्हणून...
आम्ही बेडूक बेडकीचे लग्न लावले

ते म्हणाले लिकेजचे तळतळाट लागले म्हणून...
आम्ही बंद नळाच्या बंद योजना पुन्हा सुरु केल्या

ते म्हणाले पाणी वळवले नाही म्हणून...
आम्ही ब्रम्हपुत्रा-मुठा नदीजोड प्रकल्पाचे टेन्डर काढले

ते म्हणले  भ्रष्ट्राचार वाढला म्हणून...
आम्हीं सगळ्या धरणातला गाळ उपसून काढला

ते म्हणाले हार्वेस्टिंग केले नाही म्हणून...
आम्ही करमाफी जाहीर केली

ते म्हणाले झाडे लावली नाहीत म्हणून...
आम्ही वृक्ष प्राधिकरणास हाय कोर्टात खेचले

ते म्हणाले ग्लोबल वार्मिंग झाले म्हणून...
आम्ही निसर्गप्रेमींना रिओच्या समिटला पाठवले

ते म्हणाले कार्बन क्रेडीटस मिळवले नाहीत म्हणून....
आम्ही राज्यसभेत शोध मोहीम चालू केली

ते म्हणाले अडलेले पाणी जिरले नाही म्हणून...
अम्ही पद्मश्री, पद्मविभूषण आणि बरच काही बहाल केले

बंडूला मात्र एक कळेना
एवढं सग्गळ सग्गळ करूनही
हिंदी आणि अरबी महासागरात अजूनही
कमी व विचित्र अशा दाबाचे पट्टे
वायदेबाजारात गोदामातील धान्यावर 
जास्त भावाचे अन जास्त दाबाचे सट्टे
अन त्याच्या डोस्क्यावर अजूनही
चिंतेचे 'काले घने बादल'
============
अभिजीत अत्रे

Friday, July 13, 2012

तालिबान

पेपरात पानभर पसरलेले फोटो
पाठमोरी उकिडवी बसलेली स्त्री
मागे बंदूक रोखून उभा नवरा
सुटलेली गोळी
काहीच हालचाल नाही
ती मान वळवून पण पाहत नाही
आणि पळूनही जात नाही
ती तशीच बसलेली
दुसरी, तिसरी, चौथी गोळी
ती कोसळीय
थोडी धुगधुगी बाकी आहे
अजून गोळ्या
पाचवी.. सातवी.. नववी
ती शांत झालीय
भोवतालच्या गर्दीत जल्लोष
हे ही फ्रेम झालय

फोटो पाहून तिचे मन सैरभैर होऊन जाते
नवरयाच्या आठवणीने ती गलबलून जाते
दारू पिऊन रोज तिला मारणारा दादला
काल मध्यरात्री तिने दारच उघडले नाही
कुठे गेला असेल?
काय खाल्ले असेल?
रात्री बारानंतर भुर्जीची गाडी पण बंद होते
आपण भारतात, पुरोगामी महाराष्ट्रात जन्मलो
अफगाणिस्तानात नाही, नाहीतर...?

ती तशीच धावत सुटते शेजारच्या मंदिराकडे
मूर्तीच्या पायावर डोके टेकवून हंबरडा फोडते
तिच्या अश्रूंनमध्ये विरघळतात
तिच्या पाठीवरचे वळ आणि
अंगभर चिकटलेल्या बुभुक्षित नजरा
गर्दीतले चोरटे ओंगळ स्पर्श
ती अग्निपरीक्षा दिल्यासारखी
अंतर्बाह्य स्वछ होते, घराकडे वळते

पोटूशा बायकोला वनवासात पाठवणाऱ्या
देवालाही गहिवरून येते आपल्या
सनातन संस्कृतीच्या या दर्शनाने
मग तो स्वतःच स्वतःवर
फुले उधळून घेतो गाभाराभर
आणि आपल्या कृपाकटाक्षाने तो 
भरून टाकतो तिच्या घरातला रिता
घासलेटचा क्यान  
==============
अभिजित अत्रे
=============

Tuesday, July 10, 2012

पुलावरचे एस. एम. जोशी

एका दिवसाचा तर प्रश्न आहे
कुणाला काहीही कळणार नाही
मोहरांची थैलीच दिली आहे चित्रगुप्तास
किडानंदानी साहेबांनी
तुम्ही फक्त नक्की या
तुमच्याशिवाय काम होणार नाही
एस. एम.

फक्त हडपसर वरून नका येऊ
तुमची इच्छा होईल
तुमच्या नावाच्या शाळा विद्यालये पाहण्याची
पण आजूबाजूच्या टाउनशीपच्या गराड्यात
पार  हरवलीत ती, तुम्ही पण तसेच हरवाल,
रस्ता चुकाल, बायपासने भरकटाल
खराडी किवां कल्याणीनगरला पोचाल
खेंड नाही राहिले खराडी आता
मोठ्ठे आयटी हब झाले आहे
उगाच मराठीत पत्ता विचारात फिराल
तर नवी पिढी गावंढळ समजेल तुम्हाला
एस. एम.

मान्य, १९८९.. म्हणजे..इनमिन दोन तप
तशी फार वर्ष नाही झाली तुम्हाला जाऊन
पण या तेवीस वर्षात पुणे खूप खूप बदलय
पुलाखालून बरंच पाणी....अहो बरंच कसलं?
सगळंच पाणी वाहून गेलंय
खूप खूप प्रगती केलीय शहराने
सगळीकडे बऱ्यापैकी समानता प्रस्थापित झालीय
एस. एम

तुम्हाला तुमच्या जुन्नरचा शेळके आठवतो
फ्लोरा फाउंटनच्या १०५ मधला हुतात्मा
ज्याच्या पोराने कर्जबाजारी होऊन शेती विकली होती
आणि नंतर आत्महत्या केली होती, तो
त्याच्या नातवाचे आता खूप छान चाललंय
महिना दहा हजार पगार मिळतो त्याला
कॉलसेंटरच्या कॅबवर ड्रायव्हर आहे
शिवाय त्याची बायको एका आयटी फ्यामिलीकडे
फुलटाईम घरकाम करते
तिलाही मिळतात पाच हजार दरमहा
बावधनला मालकीची पत्र्याची शेड घेतलीय
सेकंडह्यांड रंगीत टीव्ही, टाटाची डिश आहे
सग्गळे सग्गळे च्यानल दिसतात घरात
हे समाजात समानता रुजण्याचेच लक्षण नाही का
एस. एम

याहून खूप अधिक प्रगती झाली असती
पण तुमचे काही साथी सुधारणांच्या आड येतात
आपली बुरसटलेली विचारसरणी टिकवू पाहतात
त्या हमाल पंचायतवाल्या आढावांचच पहाना
ते त्यांच्या कष्टाच्या भाकरीतच अडकले आणि
पुण्यात गल्लोगल्ली पिझ्झाहट्स उभ्या राहिल्या
झुणका भाकरीने फक्त पोट भरते
स्टेटस नाही मिळत, पिझ्झ्यासारखे
त्यांना हे तुम्ही सांगायला हवे
एस. एम


समृद्धी शाम्पेंनच्या बाटली सारखी
फसफसून वाहतेय पुण्याच्या रस्त्या रस्त्यावर
रेशनच्या दुकानासमोर रांगा नाही लागत आता
त्या लागतात दाजीकाकांच्या दुकानासमोर
सोने पण गोळ्या बिस्किटा सारखे खरेदी करतात लोक
चौका चौकात, काचेच्या उंचच उंच इमारतीतून भरभराट
मदिरेच्या शिगोशिग भरलेल्या पेल्यासारखी हिंदकळतीय
पण तुमचे काही मित्र अजूनही
कागद, काच व पत्राच चिवडत बसलेत
एस. एम

आहेत.. बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत अजून शहरात
एसआरे खाली किडानंदानी साहेब त्या डेव्हल्प करणार आहेत
हे झोपडपट्टीवाले आणि मध्यमवर्गीय एंक ब्लॉटच आहेत सिटीवर
ऐश्वर्याची एवढी गंगा वाहतेय पण हे दरिद्रीच राहिले
आता याला तुम्ही आम्ही तरी काय करणार?
त्यांना नाही आली संधी साधता
त्यांना नाही जमले हिसकवायला
त्यांना नाही आले ओरबाडता
शिकलेच नाहीत ते पुढेपुढे करायला
अहो, जाणीवा देखील बोथट नाही करता आल्या त्यांना
मग असे लोक मागेच पडणार नाहीत का?
त्यांच्यासाठी आपण किती काळ रडायचे?
एस. एम


या चिल्लर लोकांची चर्चा तरी कशाला?
आपले काम यापेक्षा खूप महत्वाचे आहे
तर मी सांगत होतो कि तुम्ही
हडपसरला न जाता थेट लकडीपुलावरच उतरा
कर्वेरोड ने गरवारे महाविद्यालयाकडे यायला लागा
थोडा धुराचा त्रास होईल, थोडे डोळे चूरचूरतील
पण धूर हा प्रगतीचा द्योतकच नाही का?
पूर्वी सोन्याचा निघायचा, आता गाडीचा
एवढाच काय तो फरक
एस. एम

तुम्ही गरवारे पासून डावीकडे वळा
नुकताच तिथे मोठ्ठा मॉल उभा केलाय
बाजूच्या संजीवन हॉस्पिटलला थोडा त्रास होणार
हे कळले होते, पण तुमच्या नावाचा पूल व हॉल
लोकांना लवकर सापडत नाही अशी तक्रार होती
त्यासाठी एक ल्यांडमार्क तयार करण्याची गरज होती
म्हणूनच पालिकेनी परवानगी दिलीय या मॉलला
केवळ तुमच्यासाठी
एस. एम

या मॉलच्या नाकावर टिच्चून किडानंदानी साहेबांना
त्याहूनही  मोठा मॉल व मल्टीप्लेक्स उभारायचाय
पालिकेनी ठोसरपागेची जागाही डिरिझर्व केलीय
पार्किंगची समस्या मात्र खूपच जटिल आहे
साहेबांचे म्हणणे आहे कि आपण तुमच्या नावचा पूल
दुमजली करू आणि फक्त पार्किंगसाठी वापरू
फुटपाथ पदच्यार्‍यानसाठी मोकळा ठेवायचा
नाही तरी तुमच्या हॉलवर येणारे लोक कुठे चारचाकी वापरतात?
एस. एम

पुलावरच्या पादचारी मार्गांवर छान प्रदर्शन लावायचे
गेल्या वीस वर्षात पुणे कसे बदलले याचे
आपण त्याला 'एस. एम जोशी हेरिटेज वॉक' असे नाव देवू
पुलाच्या तोंडावर आपण तुमचा एक बाकावर बसलेला
पुतळा इन्स्टॉल करू, मॅकडोनाल्डच्या बाहेर असतोना तसा
मान्य मान्य तुम्ही थोडे ऑड दिसाल
पण यंग जनरेशनला आवडते
ऑड लोकांबरोबर फोटो काढून फेसबूकवर लोड करायला
एस. एम

साहेबांचे प्रपोजल तुमच्या फायद्याचेच आहे
तुम्ही सग्गळ्या क्लासमधल्या लोकांच्या घराघरात पोचाल
पण तुमच्या ओल्ड जनरेशनच्या अनुयायींना हे नाही पटत
प्रगतीच्या आणि विकासाच्या ते नेहमीच आड येतात
त्यांना तुम्हीच समजावून सांगू शकता
किडानंदानी साहेब खास वेळ काढून मिटींगला येणार आहेत
त्यांच्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि समतेसाठी
नक्की यायच, एका दिवसाचा तर प्रश्न आहे
कुणाला काहीही कळणार नाही
एस.एम.
==========
अभिजित अत्रे
==========

Friday, July 6, 2012

थोडा टाइमपास: आदर्श वात्रटिका

(चाल: कोणत्याही आदर्श भोंडल्याची)

सुशीलकांता विलासकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
सासूसाठी बांधा म्हंटले एक न्यारा बंगला
फुक्कटच्या फ्ल्याटमध्ये जीव यांचा रंगला
इनामी नाही, बेनामी नाही, नावावर घेतला
नवखेपणा कसा यांच्या खुर्चीवर बेतला
सुशीलकांता विलासकांता असं कसं झालं?
==============
(चाल: अटक मटक चवळी चटक)

लाला फाटक... लाला फाटक
कशी टाळू.. मी आता अटक
फ्ल्याटवर पाणी सोड सोड
माझी सही खोड खोड
सही कोणी खोडेना
दारातली सीबीआय उठेना
============
(चाल: माझ्या मामाचे पत्र हरवले)

आदर्शची फाइल.. ऽ ऽ ऽ . हर ऽ ऽ वली
ती ऽ ऽ ऽ मला ऽ ऽ ऽ सा ऽ ऽ ऽ पडली
नको ती ऽ ऽ ऽ फाइल ज ऽ ऽ ऽ .ळाली
भानगड सग ऽऽ ळी क ऽऽऽ .ळाली
अब्रू धुळीला मि ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ळाली
====================
(चाल: एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू)

एक सदनिका घेऊ बाई दोन सदनिका घेऊ
दोन सदनिका घेऊ बाई तीन सदनिका घेऊ
तीन सदनिकांचा केला करार
सिंधी काका व्हा आता फरार
कशाला झालात यांचे चाकर
गोड गोड होती भगवी साखर
=======
(चाल: कोण म्हणतो मी टक्का दिला)

कोण म्हणतो मी परवानगी दिली?
सुशील म्हणतो तू परवानगी दिली
कारे सुशील मी परवानगी दिली?
कोण म्हणतो तू परवानगी दिली?
विलास म्हणतो तू परवानगी दिली
कारे विलास मी परवानगी दिली?
कोण म्हणतो तू परवानगी दिली?
अशोक म्हणतो मी परवानगी दिली
कारे अशोक.....
(बालपण आठवा.. हा न संपणारा खेळ आहे)======================
अभिजित अत्रे

Wednesday, July 4, 2012

गम्मतगाणे:: आयझ्याक न्यूटन आणि दिगंबर शहाणे

किव येते मला आर्यभट्टाची, पूर्वजांची, भारतीयांची
सरशी होऊ दिली त्यांनी त्या आयझ्याक न्यूटनची
मी नसती वाट पाहिली सफरचंद पडण्याची
गरज काय हो असल्या वेळखाऊ प्रचितीची?


असेच काहीतरी म्हणाला होता दिगंबर शहाणे
आकाशात दगड भिरकावून त्याने अगदी सहजपणे
सिद्ध केला होता नियम गुरुत्वाकर्षणाचा
आम्हीही केला होता तेव्हा गजर टाळ्यांचा


अशीच दाद दिली होती त्याला अख्या वर्गाने
जेव्हा दिगंबरने उचली होती शेंगांची टरफले नेटाने
आणि टिमवर्कचे महत्व समजावून सांगून खास
त्याने बाळ गंगाधर टिळकास केले होते नापास


तेव्हा वाटायचे दिगंबर खूप मोठा होणार
त्याच्याकडे पाहताना आपली टोपी पडणार
इतरांच्या टोप्याच उडवत राहिला तो आयुष्यभर
पण दिगंबर शहाणे नाही झाला मोठा वितभर


तेंडूलकरचे शंभरावे शतक पाहताना
तो पॉटिंगच्या आठवणीने गहिवरायचा
लताचा आर्त सूर ऐकताना
दिनानाथच्या पार्किगबद्दल बोलायचा


दिगंबर अजूनही विचारतो सर्वाना
किशोरकुमार सहनच कसा होतो लोकांना?
अमिताभला जर अभिनेता म्हणायचे
तर बेन किंग्सलेने काय करायचे?


दिगंबरला हापूस आंबे...आवडत नाहीत
दिगंबरला काजूही ...आवडत नाहीत
पानात वाढली पुरणपोळी जरी
तो  म्हणणार या पेक्षा पाणीपुरी बरी


दिगंबरची जमात पसरलीय खोलवर
भेटते ती शाळेत, कचेरीत, रस्त्यावर
सगळेच दिगंबर रोज थुंकतात एका सूर्यावर
आणि आपले वेगळेपण मिरवतात बघ्यांनवर


मी मात्र आता त्याच्या भोवतालच्या गर्दीत नसतो
दिगंबरचा चेहरा मला चिकट व गलिच्छ भासतो
मान वर करून जेव्हा तो सूर्यावर थुंकतो पचापचा
विसरतो तेव्हा तो न्यूटनचा नियम गुरुत्वाकर्षणाचा
==========
=============
ता.क: दिगंबर शहाणे हे नाव काल्पनिक आहे, पण व्यक्ती खरी आहे. खरे नाव सांगता येत नाही कारण दोन तीन शहाणे आजूबाजूलाच आहेत. असेच, काही अधिक- काही उणे, दिगंबर शहाणे तुमच्याही भोवती असतील. तुम्हाला ते जर भेटले नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात.----- अभिजित अत्रे
======

Thursday, June 28, 2012

शनिवारच्या आषाढी एकादशी निमित्त

विरक्तीच्या संगे  | आसक्तीचे दंगे
अजून खेळ रंगे । संसाराचा

जन्म फिटेना |  व्यवहार मिटेना
मोह सुटेना      |  प्रपंचाचा

म्हणून आज तुला | लावतो बोल
काळीज खोल | थरारते

उभी तुझ्या दारी | दुष्काळाची वारी
तरी का  पंढरी । कोरडीच

करतात चैन । ज्यांनी केला गुन्हा
कपिलेचा पान्हा । आटलेला

तुला का  येईना । आमचा कळवळा
मातीलाही उमाळा । फुटलेला

आम्हीच का नेहमी । द्यायची परीक्षा
करावी प्रतीक्षा । सुखाची

उभ्या दारिद्र्याचा । मागू आज जाब
ठेव थोडी आब । भक्तांची

नको नुसती भेट । थरारु दे विट
हो आता  प्रगट । पावसात

नाहीतर तोड । जगण्याचे पाश
पापणीआड आकाश । ओथंबले
==============
अभिजित अत्रे

Thursday, April 5, 2012

गम्मतगाणे: खूपच संध्याकाळी

पिसाटला हा वारा
गरुडांची पडली घरटी
वृद्ध भिक्षुकाच्या घरा
तृष्णेची धार चपटी ---१

गर्भार धरतीलाही
प्राजक्ताची पडली भूल
निष्पर्ण कदंबातून
पेटून उठे चूल --- २

संक्रमंणाच्या रात्री
चंद्र तुटून पडावा
उर्मिलेचा ओल्या नेत्री
उभा वनवास उलगडावा --- ३

मेणाचे दाखले खोटे
पाण्यात मिटे वीज
घनगर्द ढोलीतून
अनवट ओघळे चीज ----४


रानात थबकला आज
दगडांचा भिजला घोडा
मिटत्या काळोखात
दौडला तरीहा वेडा---- ५


काजव्यांनी उजळेल रात
मी घेतली बांग छीलून
कोम्बातून पसरली जाळी
कोरडी आतडी आंबवून---६


ती सरता काजळमाया
चिम्ब चिम्ब तो भिजला
मातीतून पुन्हा रुजाया 
बैरागी असे निजला--- ७
===================
समाप्त. तुम्हाला कविता कळली असेल तर पुढे वाचु नका


कवीने कवितेचाअर्थ सांगायचा नसतो


पण दुर्बोधतेचा शिक्का लागू नये म्हणून खाली अर्थ देतो आहे:-- ===================================
१ खूप थंडी आहे. मी ओल्डमौंक रमची क्वार्टर घेऊन घरी आलोय.


२ संध्याकाळी खाल्ले होते पण तरीही आत्ता खूप भूक लागलीय. घरी खायला काहीही नाही आहे.


३ मी पांढरया कांद्याच्या गड्डीतून दोन कांदे तोडलेत. चिरताना डोळ्यात पाणी येते आहे.


४ पावसाने लाईट गेले आहेत आणि मेणबत्ती पेटत नाहीय. बंद फ्रीज मधून मी विरघळलेले चीज बाहेर काढले आहे.


५ पार्किंगमध्ये पाणी आल्याने बाईक सुरु होत नाहीये. ही नेहमीचीच बोंब. दुकानदार किराण्याचे दुकान बंद करतोय म्हणून मी धावत धावत गेलोय.


६ हुश्श. सिगरेट मिळाली. रात्र काढता येईल. अंडी पण मिळाली. आंबलेले खायचे नाही, पण एखाद्यावेळेस ब्रेड चालतो.


७ दारू संपली. पिउन टाइट् झालोय. उद्या लवकर उठायचे आहे म्हणून कपडे न बदलताच झोपलोय. =========

Wednesday, March 28, 2012

रेषेखालची माणस

अठ्ठावीसचे तीस, तीसचे बत्तीस
व्याख्या बदलतात दरवर्षी बीपीएलच्या
पण दारिद्र्य संपत नाही

हे जरा आक्रीतच, विशेषतः
हस्तसामुद्रिकेच्या अभ्यासकांसाठी
इतक्या मोठ्या समूहाची भाग्यरेषा
सारखीच असेल, खुरटलेली?
तीस रुपयांच्या परिघावर
थोडी आत, थोडी बाहेर, थिजलेली?

बदला येतील रापलेल्या हातावरच्या
या खुज्या रेखा एकाच साच्यात?
प्रयत्न करायला काहीच हरकत नाही

विज्ञान सरळ करु शकते नटीचे नाक बटबटीत
म्हणून तोडून आणलेत मीही काही पंजे गुबगुबीत
ज्यांच्या बोटांना लगडले होते पिवळेजर्द पुष्कराज

आता फक्त रोपण करायचे आहे या गुलाबी त्वचेचे
समूहाच्या अभागी हातांवर
बदलायची आहेत फक्त बोटांची निबर पेर
त्याखालचे उंच निर्जीव घट्टे काळे
पुसायचे आहे तळहातावर खोल खोल रुतलेल,
सुरकुतलेल,भाग्यरेषांचे अभागी जाळे

पण हा प्लास्टिक सर्जन म्हणतोय
अशक्य आहे असे ग्राफटिंग करणे
या हस्तरेखा नाही पुसता येणार
कितीही घासल्या तरी त्या खरवडणे
कठीण आहे

कारण तळातांवर उमटले आहेत फक्त ठसे
मूळ भाग्यरेषा चिकटल्यात हाडालाच
जन्मल्यापासून
तशी रीतसर नोंदही झालीय
रेशन कार्डावर, बीपीएलच्या.
=================
अभिजित अत्रे

Monday, March 19, 2012

तो निसटलेला क्षण

वर्तमान रोजच चढवतो
एक नवे ओझे पाठीवर
नव्या नव्या ओळखींचे
नव्या नव्या बंधांचे
नव्या नव्या स्मृतींचे


जुनी माणसेही भेटतात
एक नवीन, न पटणारी
ओळख घेउन, रोजच
आपण स्व:ताला स्व:ताच
भेटतो नव्याने, सततच


वर्तमान घेऊन येतो
नवी नाती, नवी पैंजणे
नवे मित्र, नवे शत्रू
नव्या वाटा, नवे काटे
नवे हेवे, नवे दावे


आठवणी धूसर होतात
कैकदा सवडच होत नाही
भूतकाळाचे पदर सोलायची
वर्तमानही बदलतो स्वतःला
भूतकाळात, अविरत


दिवसागणिक वाढत जातो
एक एक पापुद्रा, धूसर धूसर
होत चाललेल्या आठवणींवर
बालपण, शाळा, मित्र, मैत्रिणी
मैदान, सहल, मास्तर


मागे पडत जाते जुने घर
जुने गाव, जुने झाड, बक्षीस
अपमान, सत्कार, तिरस्कार
पहिले प्रेम, पहिली नोकरी
पोराची शाळा, त्याचे मित्र


अगदी काल परवाची नवी गाडी,
कुणा अप्ताचे मरण, अपघात
सगळं सगळ जातं मागे मागे
पापुद्रे वाढतात दिवसागणिक
त्यांचे साठतात थर, दररोज


वर्तमान रोजच चढवतो
एक नवे ओझे पाठीवर
तर मग, खूप खूप पूर्वीच
हातून निसटलेल्या त्या क्षणांची
आठवण अजून इतकी ताजी कशी?


मी जाणीवपूर्वक जोपासतोय तो क्षण?
का  भूतकाळाच उगवतोय
नव्याने, माझ्या वर्तमानात?
मी वर्तमानातच आहे न?
छे..हे फार भयंकर आहे.
=============
अभिजित अत्रे
============

Monday, March 12, 2012

साम्य

संस्कृती रक्षकांनी विडा उचलला आहे
आणि आता ओतली जाणार आहे
काळी शाई, त्या संपादकाच्या चेहऱ्यावर
जमलच तर त्याच्या कुबट विचारांवर

तसा गुन्हा गंभीरच आहे त्या विद्वानाचा
दुखावल्या जाणारया सनातन भावनांचा
विचार न करता त्याने नको ते छापले
दोन घटनात म्हणे त्याला साम्य दिसले

पहिली घटना पनवेलची, रात्रीची, ओल्या पार्टीची,
मदहोश धुंदीची, डान्सबारची, गुंठा मंत्र्याची,
ज्याने उधळले काही करोड रुपये होऊन फिदा
नाचणाऱ्या बारबालेवर, जिच्या मधाळ होत्या अदा

दुसरी घटना पुराणाची, संस्कृतीची, देवांची,
राजा इंद्राची, अप्सरेची, महान साधूची
ज्याने ओवाळून टाकले त्याचे हजार वर्षाचे तप
त्या कामुक नर्तकीवर, जिने भंगले त्याचे जप

हा तर घोर अपमान आमच्या इतिहासाचा
ठेचायला हवा आता सडका मेंदू याचा
पण हाय, रस्ता पकडला त्यांनी घराचा
पटला त्यांना हा खुलासा संपादकाचा

"तुलना नाही केली मी पैशाची आणि तपाची
ठाऊक, गुंठा मंत्र्याला नाही सर विश्वामित्राची
दोस्तांनो, मला दिसलेले साम्य वेगळेच आहे
नाचणारी मेनका अजूनही शापितच आहे".
============
अभिजित अत्रे
===========

Friday, March 2, 2012

पारवे

कोणत्यातरी समरानंतर उडवली गेली होती
दोन शुभ्र कबुतरे, शांततेचा संदेश देणारी
बहुदा त्यांच्याच विजोड संभोगातून जन्माला
आलेत हे पारवे


त्यांचा वावर सिमित नाही राहिला
आता, दादरच्या कबुतरखान्या पुरता
घट्ट रोवले आहेत त्यांनी पंजे
आजूबाजूच्या चाळीत, वस्तीत, संस्थेत
गगनचुंबी इमारतीत, कचेरीत, दुकानात
आणि घराघरात


आत्ममग्न फिरत राहतात पारवे
कोनाड्या कोनाड्यातून, जोडीने,
कधी बसतात एका ओळीत, शिस्तीत,
टेलीफोनच्या वायरींवर, ठो आवाज झाला
कि दचकतात, सैरभैर उडतात, पुन्हा येवून बसतात
पूर्वीच्याच जागेवर, जसे बसले होते ते गेटवेवर,
बॉम्बस्फोटानंतर, पूर्वीप्रमाणेच प्रणयलीला करीत निरंतर,
आणि  प्रस्थापित केली होती त्यांनी स्फोटापेक्षाही 
भयंकर, शांतता

उगीचच दोन पावले चालतात
बसल्या जागेवरून बुड हलवतात,
पुन्हा बसतात, वाट पाहतात
नेमाने मिळणाऱ्या दाण्यांची,
बोल लावतात भाग्याला पण
बंड करीत नाहीत जेव्हा
किराणा दुकानदार फेकतो समोर
कुजके धान्य, टिपत राहतात, झुंडीने,
शिटत राहतात दिवसभर राहत्या जागांवर,
तिथच करतात मैथुन,
आणखी एक पिढी वाढवतात
ऐदी परव्यांचीच


काही पारवे चुकून जन्मही देतात गरुडांना
पण त्यातील बहुतेकांना छोटा भासतो
हिमालय, उडतात आल्प्सकडे,
तिकडून पाठवतात नवे चावीष्ठ दाणे,
फेडू पाहतात खुज्या संह्याद्रीचे ऋण, दुरूनच,
शिव्या घालतात इथल्या बुरशी आलेल्या
खुराड्याना, गुबगुबीत मान फिरवीत चर्चा
करतात चकचकीत मॉल्स मधील घरट्यांची,
तुपट संस्कृतीची, आणि टंच श्रीमंतीची
काही त्यालाही उबतात, उद्विग्न होतात,
लढतात, परततात, पण त्यांचे मोठे पंख
टोचतात पारव्याना


काही गरुड इथेच थाबतात, उभी करतात
काही आनंदवने, वाळवंटातल्या ओयासीस सारखी
पण त्यांची संख्या खूप खूप कमी
खूप खूप पंख फडफडायला लागतात त्यासाठी
आणि बांधावी लागतात घरटी
लस्टर विरहित कडे कपारीत
काही पारवेही करतात तसा प्रयत्न,
सोडून देतात, अर्धवट, 
नखे मोडतात इतरांच्या नावाने,
पंख मिटवून दाणे टिपत राहतात,
मेलेल्या पारव्याच्या नावाने,
देतात दोन चार दाणे, देणगी म्हणून,
ज्ञातीतील गरुडांना


उकिरडे पाहिलेकी डोळे मिटून घेतात
अंधार पडायच्या आधीच परतात, खुराड्यात
पकडलेच कुणा एकाला एखाद्या मांजरीने
तर चर्चा करतात, हळहळतात, नवस बोलतात, रडतात, मूक मोर्चा काढतात आणि असाह्य बसतात
चाळीतील वायरीवर, पण झुंडीने 
टोची मारत नाहीत मांजरीला,
घू घू करत पुन्हा घुमत राहतात आपल्याच नादात,
प्रस्थापित करतात एक फक्त कुजबुजणारी
वांझ शांतता


हीच अलिप्त नीरवता अभिप्रेत होती का
त्या गुलाबवाल्या काकांना?
 ज्यांनी उडवलेली ती दोन शुभ्र कबुतरे,
खरच ठाऊक नाही मला
पण  ह्या स्मशानशांततेने उन्मळून पडलाय
सरकारी कचेरीतून नागवलेला एक म्हातारा
खाल्ल्या मिठाची शपथ देत,
काठी आपटत, ओरडून सांगतोय तो मला
कि  या देशाला गरज आहे पुन्हा
एका युद्धाची!
==========
अभिजित अत्रे
========