Monday, September 3, 2012

एक गाव हवे आहे

प्रस्ताव खूप पूर्वीच पाठवलाय
मुख्यमंत्र्यांकडे
अजून उत्तराची वाट पाहतोय
तसे मागणे काही फार मोठे नाही
एक गाव हवे आहे

अगदी लहान, छोटेसे
वेंगुर्ला, चिपळूण, रत्नागिरीच्या
कोणत्याही वेसेला खेटलेले
थोडे आंबा फणसाच्या झाडांचे
ताडाचे, माडाचे, नारळीचे
कौलारू घरांचे
सताड उघड्या दारांचे
समुद्राची गाज ऐकत
पोफळीच्या बागेत
निवांत पहुडलेले
किवां ओसरीवरील
करकरत्या झोपाळ्यावर
संथपणे पाय हलवीत
सुपारी कातरत बसलेले
एक गाव हवे आहे

संह्याद्रीच्या कुशीतलेही चालेल
बोरी बाभळीच्या पायवाटेवरचे
करवंदीच्या  जाळीचे
शेळ्या मेंढ्यांच्या लेन्ड्यांचे
सुगरणीच्या खोप्याचे
शिळ घालणाऱ्या राघूचे
निळ्या जांभळ्या आकाशाचे
सदरा फडफडवणाऱ्या वाऱ्याचे
डोंगराच्या उतारावर
तोल सावरत बसलेल्या घरांचे
एक गाव हवे आहे

चालेल चालेल
नदीच्या काठावरचे
हिरव्या मळ्यांचे
वडा पिंपळाचे
सूरपारंब्यांचे
शेणाने सरावलेल्या अंगणाचे
तुळशी वृंदावनाचे
काळ्या पडलेल्या तांब्याच्या बंबांचे
नांगराचे, जात्याचे, सुपाचे
एक गाव हवे आहे

नाही
मी हे स्वतःसाठी मागत नाही
मी तिथे क्षणभरही थांबणार नाही
मला गावातील लोकांचे भलेही करायचे नाही
त्यांना तर मी हुसकावून काढणार
नेसत्या वस्त्रानिशी
सरकार करेलच त्यांचे पुनर्वसन कोठेतरी
मला माणूस विरहित
पण मानववस्तीच्या सर्व खुणा
जिथे जपल्या गेल्या आहेत असे
एक गाव हवे आहे

मला या गावावर घट्ट
सिमेंटचा डोम उभारायचाय
त्यावर लोखंडाचा गिलाव द्यायचाय
मग माती टाकून खोल खोल
बुजवून, पुरून टाकायचं
लवकरात लवकर, त्यासाठी
एक गाव हवे आहे

मान्य खर्च खूप होईल
पण इतके तर आपण करायलाच हवे
आपल्याच नावासाठी, स्वार्थासाठी
आता वेळ तशी जवळच आलीय प्रलयाची
हे जग बुडेलच कधीकाळी भविष्यात
जे अटळ आहे ते कुणाला चुकलय ?
कधी  ?केव्हा  ?  आता यावर वाद नको
एक गाव हवे आहे

ही सगळी शहरे वाहून जातील
त्यांच्याच गटारातून
नवे जग पुन्हा प्रगटेल
कुठल्याश्या पिंपळपानावर बसून
किवां एखाद्या अमिबातून
त्यानंतर काही हजार वर्षे उलटल्यावर
एके दिवशी गळून पडेल
पुन्हा एकदा
माकडाची शेपटी
मग ते दोन पायावर चालेल
माणूस बनेल
खूप खूप प्रगती करेल
चंद्रावर जाईल
पुन्हा नवे शोध, नवे बोध
हे  सगळं सगळं दिसतंय मला
म्हणून मला घाई आहे
म्हणून मी केव्हाचा ओरडतोय
एक गाव हवे आहे

सगळी सगळी सुखे उपभोगल्यावर
नवा माणूसही घेऊ पाहिलं
पृथ्वीच्या अंतरंगाचा शोध
आपल्याला जसे सापडलेले
हरप्पा मोहिन्जदारो
तसेच कधीतरी त्याला
हे लपवलेले गाव सापडेल
मग तोही होईल चकित
हजारो युगांच्या आधी
त्याच्याच सारखे माकडाचे वंशज
या जगात होते या साक्षात्काराने
तोही होईल  सद्दगदित
हे गाव पाहून
म्हणेल पूर्वी कधीतरी माणूस
एक साधे, सोपे जीवन जगत होता
निसर्गाच्या मांडीवर बसून
कदाचित तो यातून बोध घेईल
किवां कदाचित घेणारही नाही
पण
त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात
आपल्या कधीकाळच्या सुसंस्कृतपणाची
एवढी एखादी तरी खूण उमटायलाच हवी
म्हणून एक पुरावा
मला मागे ठेवायचाय
तसे फार नाही हे मागणे
तुम्हीही  जरा लावा ना जोर
सांगा ना  मुख्यमंत्र्यांना
एक गाव हवे आहे
पुरण्यासाठी.
=================
अभिजित अत्रे