Wednesday, March 28, 2012

रेषेखालची माणस

अठ्ठावीसचे तीस, तीसचे बत्तीस
व्याख्या बदलतात दरवर्षी बीपीएलच्या
पण दारिद्र्य संपत नाही

हे जरा आक्रीतच, विशेषतः
हस्तसामुद्रिकेच्या अभ्यासकांसाठी
इतक्या मोठ्या समूहाची भाग्यरेषा
सारखीच असेल, खुरटलेली?
तीस रुपयांच्या परिघावर
थोडी आत, थोडी बाहेर, थिजलेली?

बदला येतील रापलेल्या हातावरच्या
या खुज्या रेखा एकाच साच्यात?
प्रयत्न करायला काहीच हरकत नाही

विज्ञान सरळ करु शकते नटीचे नाक बटबटीत
म्हणून तोडून आणलेत मीही काही पंजे गुबगुबीत
ज्यांच्या बोटांना लगडले होते पिवळेजर्द पुष्कराज

आता फक्त रोपण करायचे आहे या गुलाबी त्वचेचे
समूहाच्या अभागी हातांवर
बदलायची आहेत फक्त बोटांची निबर पेर
त्याखालचे उंच निर्जीव घट्टे काळे
पुसायचे आहे तळहातावर खोल खोल रुतलेल,
सुरकुतलेल,भाग्यरेषांचे अभागी जाळे

पण हा प्लास्टिक सर्जन म्हणतोय
अशक्य आहे असे ग्राफटिंग करणे
या हस्तरेखा नाही पुसता येणार
कितीही घासल्या तरी त्या खरवडणे
कठीण आहे

कारण तळातांवर उमटले आहेत फक्त ठसे
मूळ भाग्यरेषा चिकटल्यात हाडालाच
जन्मल्यापासून
तशी रीतसर नोंदही झालीय
रेशन कार्डावर, बीपीएलच्या.
=================
अभिजित अत्रे

Monday, March 19, 2012

तो निसटलेला क्षण

वर्तमान रोजच चढवतो
एक नवे ओझे पाठीवर
नव्या नव्या ओळखींचे
नव्या नव्या बंधांचे
नव्या नव्या स्मृतींचे


जुनी माणसेही भेटतात
एक नवीन, न पटणारी
ओळख घेउन, रोजच
आपण स्व:ताला स्व:ताच
भेटतो नव्याने, सततच


वर्तमान घेऊन येतो
नवी नाती, नवी पैंजणे
नवे मित्र, नवे शत्रू
नव्या वाटा, नवे काटे
नवे हेवे, नवे दावे


आठवणी धूसर होतात
कैकदा सवडच होत नाही
भूतकाळाचे पदर सोलायची
वर्तमानही बदलतो स्वतःला
भूतकाळात, अविरत


दिवसागणिक वाढत जातो
एक एक पापुद्रा, धूसर धूसर
होत चाललेल्या आठवणींवर
बालपण, शाळा, मित्र, मैत्रिणी
मैदान, सहल, मास्तर


मागे पडत जाते जुने घर
जुने गाव, जुने झाड, बक्षीस
अपमान, सत्कार, तिरस्कार
पहिले प्रेम, पहिली नोकरी
पोराची शाळा, त्याचे मित्र


अगदी काल परवाची नवी गाडी,
कुणा अप्ताचे मरण, अपघात
सगळं सगळ जातं मागे मागे
पापुद्रे वाढतात दिवसागणिक
त्यांचे साठतात थर, दररोज


वर्तमान रोजच चढवतो
एक नवे ओझे पाठीवर
तर मग, खूप खूप पूर्वीच
हातून निसटलेल्या त्या क्षणांची
आठवण अजून इतकी ताजी कशी?


मी जाणीवपूर्वक जोपासतोय तो क्षण?
का  भूतकाळाच उगवतोय
नव्याने, माझ्या वर्तमानात?
मी वर्तमानातच आहे न?
छे..हे फार भयंकर आहे.
=============
अभिजित अत्रे
============

Monday, March 12, 2012

साम्य

संस्कृती रक्षकांनी विडा उचलला आहे
आणि आता ओतली जाणार आहे
काळी शाई, त्या संपादकाच्या चेहऱ्यावर
जमलच तर त्याच्या कुबट विचारांवर

तसा गुन्हा गंभीरच आहे त्या विद्वानाचा
दुखावल्या जाणारया सनातन भावनांचा
विचार न करता त्याने नको ते छापले
दोन घटनात म्हणे त्याला साम्य दिसले

पहिली घटना पनवेलची, रात्रीची, ओल्या पार्टीची,
मदहोश धुंदीची, डान्सबारची, गुंठा मंत्र्याची,
ज्याने उधळले काही करोड रुपये होऊन फिदा
नाचणाऱ्या बारबालेवर, जिच्या मधाळ होत्या अदा

दुसरी घटना पुराणाची, संस्कृतीची, देवांची,
राजा इंद्राची, अप्सरेची, महान साधूची
ज्याने ओवाळून टाकले त्याचे हजार वर्षाचे तप
त्या कामुक नर्तकीवर, जिने भंगले त्याचे जप

हा तर घोर अपमान आमच्या इतिहासाचा
ठेचायला हवा आता सडका मेंदू याचा
पण हाय, रस्ता पकडला त्यांनी घराचा
पटला त्यांना हा खुलासा संपादकाचा

"तुलना नाही केली मी पैशाची आणि तपाची
ठाऊक, गुंठा मंत्र्याला नाही सर विश्वामित्राची
दोस्तांनो, मला दिसलेले साम्य वेगळेच आहे
नाचणारी मेनका अजूनही शापितच आहे".
============
अभिजित अत्रे
===========

Friday, March 2, 2012

पारवे

कोणत्यातरी समरानंतर उडवली गेली होती
दोन शुभ्र कबुतरे, शांततेचा संदेश देणारी
बहुदा त्यांच्याच विजोड संभोगातून जन्माला
आलेत हे पारवे


त्यांचा वावर सिमित नाही राहिला
आता, दादरच्या कबुतरखान्या पुरता
घट्ट रोवले आहेत त्यांनी पंजे
आजूबाजूच्या चाळीत, वस्तीत, संस्थेत
गगनचुंबी इमारतीत, कचेरीत, दुकानात
आणि घराघरात


आत्ममग्न फिरत राहतात पारवे
कोनाड्या कोनाड्यातून, जोडीने,
कधी बसतात एका ओळीत, शिस्तीत,
टेलीफोनच्या वायरींवर, ठो आवाज झाला
कि दचकतात, सैरभैर उडतात, पुन्हा येवून बसतात
पूर्वीच्याच जागेवर, जसे बसले होते ते गेटवेवर,
बॉम्बस्फोटानंतर, पूर्वीप्रमाणेच प्रणयलीला करीत निरंतर,
आणि  प्रस्थापित केली होती त्यांनी स्फोटापेक्षाही 
भयंकर, शांतता

उगीचच दोन पावले चालतात
बसल्या जागेवरून बुड हलवतात,
पुन्हा बसतात, वाट पाहतात
नेमाने मिळणाऱ्या दाण्यांची,
बोल लावतात भाग्याला पण
बंड करीत नाहीत जेव्हा
किराणा दुकानदार फेकतो समोर
कुजके धान्य, टिपत राहतात, झुंडीने,
शिटत राहतात दिवसभर राहत्या जागांवर,
तिथच करतात मैथुन,
आणखी एक पिढी वाढवतात
ऐदी परव्यांचीच


काही पारवे चुकून जन्मही देतात गरुडांना
पण त्यातील बहुतेकांना छोटा भासतो
हिमालय, उडतात आल्प्सकडे,
तिकडून पाठवतात नवे चावीष्ठ दाणे,
फेडू पाहतात खुज्या संह्याद्रीचे ऋण, दुरूनच,
शिव्या घालतात इथल्या बुरशी आलेल्या
खुराड्याना, गुबगुबीत मान फिरवीत चर्चा
करतात चकचकीत मॉल्स मधील घरट्यांची,
तुपट संस्कृतीची, आणि टंच श्रीमंतीची
काही त्यालाही उबतात, उद्विग्न होतात,
लढतात, परततात, पण त्यांचे मोठे पंख
टोचतात पारव्याना


काही गरुड इथेच थाबतात, उभी करतात
काही आनंदवने, वाळवंटातल्या ओयासीस सारखी
पण त्यांची संख्या खूप खूप कमी
खूप खूप पंख फडफडायला लागतात त्यासाठी
आणि बांधावी लागतात घरटी
लस्टर विरहित कडे कपारीत
काही पारवेही करतात तसा प्रयत्न,
सोडून देतात, अर्धवट, 
नखे मोडतात इतरांच्या नावाने,
पंख मिटवून दाणे टिपत राहतात,
मेलेल्या पारव्याच्या नावाने,
देतात दोन चार दाणे, देणगी म्हणून,
ज्ञातीतील गरुडांना


उकिरडे पाहिलेकी डोळे मिटून घेतात
अंधार पडायच्या आधीच परतात, खुराड्यात
पकडलेच कुणा एकाला एखाद्या मांजरीने
तर चर्चा करतात, हळहळतात, नवस बोलतात, रडतात, मूक मोर्चा काढतात आणि असाह्य बसतात
चाळीतील वायरीवर, पण झुंडीने 
टोची मारत नाहीत मांजरीला,
घू घू करत पुन्हा घुमत राहतात आपल्याच नादात,
प्रस्थापित करतात एक फक्त कुजबुजणारी
वांझ शांतता


हीच अलिप्त नीरवता अभिप्रेत होती का
त्या गुलाबवाल्या काकांना?
 ज्यांनी उडवलेली ती दोन शुभ्र कबुतरे,
खरच ठाऊक नाही मला
पण  ह्या स्मशानशांततेने उन्मळून पडलाय
सरकारी कचेरीतून नागवलेला एक म्हातारा
खाल्ल्या मिठाची शपथ देत,
काठी आपटत, ओरडून सांगतोय तो मला
कि  या देशाला गरज आहे पुन्हा
एका युद्धाची!
==========
अभिजित अत्रे
========