Friday, June 7, 2013

दहावी नापास झालेल्यांसाठी

जगण्याला बोल लावावा
एवढा वार खोल नाही
मरणाचा विचार करावा
एवढे परीक्षेचे मोल नाही

शून्य टक्के शंभर टक्के
सब घोडे बारा टक्के
आयुष्याला लगाम घालावा
असा कोणताच निकाल नाही

आई बोलली बाबा बोलले
भाऊ बहीण असतील चिडले
पण तुझ्याशिवाय कुणासाठी
त्यांच्या आतड्यात ओंल नाही

तुझे प्रयत्न कमी पडले 
त्यात  इतके काय बिघडले ?
झोळी तुझी रितीच ठेवायला 
देव  काही  कंगाल  नाही 


जीवन हीच एक मोठी शाळा
श्रमाने फुलतो इथला मळा 
प्रगतीपुस्तकावर इथल्या
रंग घामाचा लाल नाही

मार्कशिटची ती काय किमंत? 
कागदात  मोजता येत नाही हिमंत
मुठी वळवून दाखव जगाला 
आयुष्य तुझे फोल नाही

जगण्याला बोल लावावा
एवढा वार खोल नाही…
========== 
अभिजित अत्रे

Saturday, January 19, 2013

प्रिय सुनीता,

प्रिय सुनीता,
तू खूप खूप दूर होतीस तेव्हा, हो बरोबर, तेंव्हाच
राजधानीत एक घृणास्पद घटना घडली
कदाचित तुझ्या वाचनात ती आता आली असेल
किवां नसेलही, महिना झाला आता त्याला
तेव्हापासून एक  उबग आणणारी चढाओढ सुरु आहे
तुला सुरक्षित ठेवण्याची

प्रशासनाने विडा उचलला आहे 
तुझ्या भोवती नव्या नव्या लक्ष्मणरेषा आखण्याचा
महापालिकेनीही घेतले आहे कंत्राट 
तुला जूडो-कराटे  शिकवायचे
परवा राजकीय पक्षाच्या महिला आघाड्यांनी
तिळगुळा सवे  तिखटाच्या पुड्या लुटल्या
संक्रांतीला, आणि
पोलीस कमिशनर स्वतः जातीनी वाटत आहेत
सहा इंचाहून कमी लांबीच्या सुऱ्या आणि कात्र्या
अगदी मोफत

चंद्रकळेच्या गाठीला असू दे
एखादा पेपर स्प्रे 
थोडे अवघडल्यासारखे होईल
पण स्प्रे बांधलेला पदर घट्ट ठेव
एकले नाहीस का? काय म्हणतात
औरंगाबादचे  न्यायमूर्ती आणि कुलगुरू
टाळी एका हाताने वाजत नाही, बाई

ज्यांच्या वाणीला तपश्चर्येचे अधिष्ठान नसते 
ते ऋषीं शाप देण्याचे सामर्थ्य  गमावून बसतात
म्हणून ते तुलाच मंत्र म्हणायला सांगत आहेत
पण तरीही लक्ष दे जरा त्यांच्याकडे 
तेवढा एक मंत्र पाठ कर
समोरच्याला इंपोXX करणारा
मोठ्याने सराव कर म्हणण्याचा
बावळटा सारखे तोंडातल्या तोंडात पुटपुटलीस
तर इफेक्ट नाही होत जपाचा
दातखीळ बसली असेल तरीही 
आठवायलाच हवे तुला
कोणाला कोणत्या नावाने बोलवायचे ते
भाऊ, दादा, काका, मामा
असे कितीतरी सोपे सोपे शब्द आहेत
तू एखादा सॉफ्ट स्किल कोर्स
का नाही करत हे शब्द शिकण्याचा?

नाही नाही
सरकारने तुझी जबाबदारी नाकारलेली नाही
गृह खाते स्वस्थ बसलेले नाही
परवाच मंत्रालयाने डेल कार्नेजी बरोबर करार केलाय
कॉपी आत्ताच बुक कर, ऑन लाईन
नवे पुस्तक लिहून देणार आहे तो
हाऊ टू विन स्टॉकर एण्ड इनफ्लूंस रेपिस्ट 

एक राहिलेच,
तुझ्या मोबाईलवर हे सॉफ्टवेयर डाउनलोड कर
तुझा ठावठिकाणा सांगणारे
आणि हो
उगाच गोंधळून जाऊ नकोस
स्प्रे, मोबाईल, मंत्र, कात्री, तिखट, कराटे 
यातले काय काय
कधी कधी
कसे कसे वापरायचे
शिक जरा मल्टीटास्किंग करायला

सुनीता
या देशात प्रत्येक गोष्टींचे मार्केटिंग होते
तुझे तर होणारच
ते बघ ते
नीतिमत्तेचे घाऊक ठेकेदार
ते रोज नवे नवे फर्मान सोडत आहेत
आणि पळी पळीने पाजू  पहात आहेत तुला
आपल्या प्राचीन संस्कृतीचे बोधामृत
मला गंमत वाटते कधी कधी
कोणती भारतीय संस्कृती?
आसुर्यस्पर्शा स्त्रीचा उदोउदो करून
तुला घरात कोंडून ठेवणारी?
की सतीची मंदिरे बांधणारी?
जुगारात बायकोला पणास लावणारी?
की गर्भवतीस रानात सोडणारी?

मान्य
याच संस्कृतीत जन्मास आला
रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडणारा राजा
गार्गी मैत्रयीचे गुणगान गाणारे एक यूग पहिले
याच संस्कृतीने
आणि इथेच घोड्यावर स्वार होऊन
लढली होती राणी लक्ष्मिबाई
ताराबाई आणि अहिल्यादेवी
पण हेच अंतिम सत्य नाही
आणि तू ते खास जाणतेस
खळ्यात, मळ्यात, शेतात,
चौकात, घरात, दारात
सर्वत्र
नुसत्या  नजरेने वस्त्र फेडणारे दुशा:सन
याचा संस्कृतीत घाऊकपणे  उभे राहिलेले
तू पहिले आहेस, वर्षानुवर्षे 

या कुबड आलेल्या संस्कृतीची
बासरी वाजवणाऱ्या कृष्णांनी
देवळात सोडलेल्या  मुरळीवर
पितांबर पांघरल्याचे ऐकिवात नाही
सावकाराच्या तिजोरीत बंद झालेल्या
यौवनांला आणि डाकबंगल्यात
घुसमटलेल्या अश्रूंना मुक्त करण्याचे
शाश्वत प्रयत्न कुठे झाले या संस्कृतीत?
काळानरूप ठिकाणे फक्त बदलत गेली
इतकेच, अग
एखाद दुसराच जाणता राजा
बाकी सगळा बेंडबाजा

सुनीता
सनातन मुल्यांची राख चोपडलेले पुजारी
तुझी दिशाभूल करायला टपून आहेत
ते तुला सत्यवान सावित्रीच्या कहाण्या ऐकवतील
आणि वडा भोवतीच्या दोऱ्यात गुरफटून टाकतील
विचार त्यांना
मातृसत्ताक देशात का मारल्या जातात मुली
जन्माला येण्या अगोदरच?
नाही नाही
सगळे  तसेच आहेत असे नाही
पण तरीही, दुर्देवाने
युगान मागून युगे जाऊनही
ही मातृसत्ताक संस्कृती अजून नसा नासात
भिनलेली नाही
सार्वत्रिक चित्र हेच आहे की
मांडवात  दुर्गेची पूजा करणारे
घरात चहाचा कपही विसळत नाहीत

सुनीता
तुलाही युगान युगांची सवय झाली आहे
वामांगीच उभे राहण्याची
आणि म्हणून मला राग आहे
तुला पुरातन काळापासून फसवत आलेल्या
या तत्वज्ञानाचा, ज्याच्या जीवनधारेवर
व्रतवैकल्यचि पुटे चढलीत
मलाही अभिमान आहे भारतीय संस्कृतीचा
पण माझी भारतीय संस्कृती पुराणाच्या 
पानात दडलेली नाही
तिला व्रतवैकल्यचि  कोळीष्टीके
चिकटलेली नाहीत
ती दिसते मला
जंतर मंतरच्या उत्स्फूर्त  स्फुलींगात
तुला समानहक्क मिळवून देणाऱ्या
नव्या कायद्याच्या उद्घोषात
तुझ्या मुक्त हास्यात
आणि हो,
रयाम्पवरच्या तुझ्या
धीट पदन्यासातही

सुनीता
सुनीता विल्यम्स
हो, विल्यम्स, तूच तेव्हा इथे नव्हतीस
आकाशावर स्वार होतीस, तब्बल १२७ दिवस
त्यांना तुझ्या अंतराळ भरारीचे मोल अद्याप कळलेले नाही
तुझ्या सामोसे खाण्याचेच त्यांना जास्त कौतुक
म्हणूनच ते अजून चाकू, कात्र्या आणि तिखटाच्या
पुड्या वाटत बसलेत, स्वत: कुठेही  न बदलता 

क्षितिजांच्या लक्ष्मणरेषा ओलांडून
आकाशगंगेवर तू एक उर्जस्वल चित्र रेखाटलेस
आदिशक्तीच्या अंगभूत सामर्थ्याचे
पण ते पाहण्याची  हिम्मत निर्माण व्हायची आहे
इथल्या म्हाताऱ्या घोडेछाप झापडबंद डोळ्यांत

सुनीता 
तू माझ्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहेस
अशी संस्कृती जी उभी आहे
समतेच्या तीरावर, विज्ञानाचे पंख लेवून 
म्हणून तुला सोपवू पाहतोय मी
माझ्या मुलीचा हात
या नव्या वाटेवर
ती सप्तपदी चालू शकली नाही
तरी चालेल
पण तिचे यान
सप्तऋषींचा तारका पुंज शिवून येईल
चाळणी आडून चंद्र पाहायचे संस्कार
ती विसरली तरी चालेल
ती चंद्रावर पाय रोवायला शिकेल! 

सुनीता
कदाचित मी खूप काही मागतोय
कदाचित मी नको इतका आशावादी आहे
पण काय करू?
मला नव्या अभ्युदयाची आस आहे
कारण माझी मुलगी, माझा श्वास आहे.
============
अभिजित अत्रे

Wednesday, December 26, 2012

वैकुंठातला निवारा

हा वृद्धाश्रम इथे कसा?
स्मशानास खेटून
मृत्यूच्या फलाटावरच्या
एखाद्या वेटिंगरूम सारखा
बोलवा, बोलवा
त्या संस्था चालकांना
नगर नियोजकांना, सिटी इंजिनियरना
.................................
ते बघा
बघा ते, पाय खरडत खरडत
चाललेले आजोबा
ते रोज दिसतात
गेले कित्येक दिवस,
महिने, वृद्धाश्रमातून निघतात
आणि जाऊन बसतात
स्मशानाच्या दरातील बाकावर
'राम नाम सत्य' चा गजर झाला
कि उठून उभे राहतात
एकटक बघत राहतात अंतयात्रेकडे
काहीतरी मोजतात
स्वत:शीच पुटपुटतात
मान हलवतात
पुन्हा बसतात
पुढच्या प्रेतयात्रेची वाट पाहतात  
कातरवेळी जेव्हा दिशा उदास होतात
आणि खांदे पडलेल्या चाकरमानी सावल्या
घोळक्याने घरी सरकत असतात
तेव्हा ते असे एकटे बसलेले बघून
मलाच गलबलून येते
या पेक्षा ते मेलेले बरे, असे वाटते
संध्याछाया दाटून येताना
त्यांनी का दिवस मोजत बसायचे
तेही स्मशानाच्या दारात?
अरे, कोणीतरी हा वृद्धाश्रम
हलवा ना येथून
......................
अहो पत्रकार
काहीतरी गैरसमज होतोय तुमचा
तो म्हातारा चांगला धीट आहे
डोक्यावर थोडा परिणाम झालाय
बायको गेल्या पासून, इतकंच
दोन्ही पोर अमेरिकेत असतात
कोथरूडचा बंगला भाड्याने देऊन
स्व:खुषीने इथे राहतोय
मरणाची भीती नाही त्याला
त्याला हेवा वाटतो
मढ्या भोवतालच्या गर्दीचा
एके काळी मोठा गोतावळा होता
त्याला आता चिंता आहे
त्याची तिरडी उचलायला
चार जण असतील की नाही याची
येडा साला
तो दिवस नाही मोजत स्वतःचे
माणसे मोजतो, अंतयात्रेतील माणसे
...............
तरी पण हा मानसिक छळच त्यांचा
हा वृद्धाश्रम इथे नसता तर
तर.. नाही..नाही..वृद्धाश्रम नव्हे
हे स्मशानच इथे नसते तर
हे स्मशान इथे कसे?
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
माणसाच्या जगण्याच्या
जगण्यासाठीच्या संघर्षाच्या
सर्व खुणा आजूबाजूला
त्यात हे स्मशान कसे?
हे गावाबाहेर हवे
दूर दूर, खूप दूर
या शहराच्या सीमेबाहेर
नगर नियोजकांना
काही अक्कल आहे की नाही?
..................
बरोबर आहे तुमचे
पण हे स्मशान हद्दीबाहेरच होते
वाहत्या नदीकाठावर
गावातल्या कोलाहलापासून दूर
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
स्मशानावरच उभे आहे
पूर्वी इथे सगळीकडे स्मशानच होते
आम्ही तरी काय करणार
शहरच विस्तारत गेले
स्मशानास येउन भिडले
कसा थोपवायचा हा विकास?
हे फक्त या शहरातच घडतंय
असेही नाही, सर्वत्र हीच परिस्थिती
आता अपरिहार्य आहे
शहर आणि स्मशाना मधील
हद्दी पुसल्या जाणे
=================
अभिजित अत्रे

Friday, December 14, 2012

गझल:-- ग्यांगवॉर

प्रेमावर अनेकांनी खूप गझल लिहिल्या आहेत. दोस्त म्हणाला तू  एखाद्या रुक्ष विषयावर-- पुण्यात , पिंपरीत, मुंबईत होणाऱ्या टोळीयुद्ध, मारामारी, इत्यादी.. इत्यादी विषयांवर -- गझल लिही. त्याच्यासाठी.... 
==============================
गंजून गेले भाले, म्यान तलवार झाली
जरीपटके झाले ओले, आज कोयत्यास धार झाली

बूरूज ढासळून पडले, तोफ आता गार झाली
दगडी चाळीत जे दडले, त्यांचीच चर्चा चिकार झाली

पुस्तकात  लपवलेल्या  पिस्तूलाची, कहाणी आता बेकार झाली
काल मावळात गावठी कट्ट्यांची, विक्री बेसूमार झाली

ही वाट काळोखाची, जिंदगी जूगार झाली
ही न युद्धे वीरांची, गल्लीत शिकार झाली

संगे कोणी ना आला, गर्दी हुशार झाली
थोडा अंधार काय झाला, सावलीही पसार झाली

या शहरातील पांडवांची, वस्ती का लाचार झाली?
इथे शमीच्या झाडांची, कत्तल फार  झाली  
==========
अभिजित अत्रे

Monday, December 3, 2012

नकार

कडेलोटाचे फर्मान निघाले तेव्हाही
शाबूत होते माझ्या बेसावध डोळ्यात
एक इंद्रधनुष्य, त्याच्या सप्तछटांनसकट
आता हे रंगहीन अस्तित्व कोसळत आहे
एका तीव्र उतारावरून, खोल खोल
तळ नसलेल्या काळोख्या दरीत
एखाद्या उंच पर्वताच्या शिखरावरून
निसटलेल्या दिशाहीन पत्थरा प्रमाणे
आता अटळ आहे
ठिकऱ्या होऊन विखरून पडणे
पण
अजूनही तुझ्या शब्दांवरचा माझा विश्वास
तसूभरही कमी झालेला नाही
आठवते?, पाठ वळवून निघताना
तू म्हणाली होतीस की तसे
माझे काही बिघडणार नाही फारसे
तुझ्या नकाराने 
==========
अभिजित अत्रे

Monday, November 5, 2012

एका गुंठा मंत्र्याची कैफ़ियत

भिंतीला ओल आली की
बुरशी धरते, पोपडे पडतात
मोड येत नाहीत, मातीसारखे
तरीही परवानगी दिलीत
एन.ए. ला, गुंठेवारीला
धरणीशी जोडलेली नाळ
अशी एका फटक्यात तोडलीत?
विचारले एकदा पत्रकारांनी मंत्र्यांना, खाजगीत
तेव्हा ते हसले, म्हणाले, भलेबहाद्दर
आता तुम्ही जाब विचारणार आम्हाला?
आमच्या सगळ्याच पिढ्या बरबाद झाल्या की
शेतीच करता करता, तेव्हा कुठे होता तूम्ही?
आम्हीही लहानपणापासून एकत आलो
भारत एक कृषी प्रधान देश आहे
पण कृषी करणारा कधीच प्रधान झाला नाही
फक्त आज्या - पणज्याच्या हातावरच्या
कमनशिबी रेषाच उमटत राहिल्या अवजारांवर
आयुष्य सलत राहिले पायात रुतलेल्या
बांधावरच्या बाभळीच्या काट्या सारखे
कणसात कधी दाणे भरलेच नाहीत असे नाही
पण जास्त करून दारिद्र्यच पिकले
कॉंग्रेसच्या गवतासारखे, वर्षानु वर्षे
आणि पिढ्यानां सवय झाली
अंधाराने घर सारवायची
अशी सवय मोडणे खूप कठीण
तुमच्यापेक्षा जास्त आमचा बाप चिडला होता
दोन दिवस जेवला नाही, बोलला नाही
त्याला जबरदस्तीने उचलून
इथे या फ्ल्याट मध्ये थांबवले
आता त्यालाही कळतय
तळ बुडालेल्या विहिरीतून पाणी शेंदण्यापेक्षा
खूप सोपे असते फ्लशचे बटण दाबणे
निर्णय घेताना माझेही  डोळे  भरून  आले  होते
पण काळी आईच कंटाळली होती
म्हणाली, असे अर्धवट भिजून
कुणाचेच कल्याण होत नाही
एकदाच काय ते
सिमेंटने न्हाऊ माखू घाल
बळी राजाचे राज्य नाही आले या देशात
गुंठामंत्र्यांचे तरी येऊ दे!
================
अभिजित अत्रे

Friday, October 19, 2012

मर्जर

आदेशाप्रमाणे मंत्र्यांच्या
अठ्ठावीस गावे शहराच्या
हद्दीत समाविष्ट करण्याच्या
प्रस्तावावर सही करून
विश्लेषणाचे तक्ते डकवून
पाणी पुरवठ्याचे गाजर दाखवून
अनधिकृत बांधकामांची भीती घालून
मेगासिटीची झालर लावून
आणि
सिग्नेचरचे दोन पेग रिचवून
जरा उशीराच रात्री घरी
जेव्हा परत आला टाऊनप्लॅनर

तेंव्हा त्याची बायको
मुलाला झोपवता झोपवता
मांडीवर डोके थोपटता थोपटता
एक गोष्ट सांगत असते
ईसापनीतीची
बैल बनू पाहणाऱ्या
मोठे मोठे पोट फुगवणाऱ्या
फुगवता फुगवता फुटणाऱ्या
फुगून फुटून मरणाऱ्या
बेड्कीची
===========
अभिजित अत्रे

Wednesday, October 10, 2012

दगडूशेठ

आठवते तुला? 
वाड्यात रंगलेला लपाछपीचा खेळ
कधी कधी जोगेश्वरीचा बोळ ओलांडायचा
तेव्हा येऊन दडायचो गाभारयात, बिनदिक्कत
कधी कधी, सकाळी सकाळी, सगळ्यांच्या नकळत
आज्जी पाठवायची तपकीर आणायला
तेव्हा येता जाता पारोशानेच शिरायचो देवळात
खोबऱ्याचे तुकडे टाकायचो तोंडात, बिनधास्त

वाडा इतिहासजमा झाला
तपकिरीचे दुकान, आणि आज्जीही
तू पण किती बदलास
परवा आलो होतो, ऐन उत्सवात, रात्रीचा
पोराने हट्ट धरला, म्हणून निघालो गर्दीचा

मंदिराच्या खूप अलीकडेच, रस्त्यावर
मोठ्या मोठ्या प्रवेशद्वारांच्या कमानी
हे नवीन, बाकी जुनेच,
तोच गोंधळ व तीच धक्काबुक्की
मी वाट काढत पुढे सरकतो
फोन वाजतो...वडील बोलत होते ...
कुठे आहात? दगडूशेठला
कशाला घेऊन जातोस नातवाला गर्दीत
चुकला, हरवला, काही झाले तर..तर काय?
.. मी हसतो..त्यांचा जन्म गेला या गल्ली बोळात
अति काळजी, मी फोन कट करतो
पोराच्या मनगटावरची पकड मात्र घट्ट होते..

बाबा मंदिरात मूर्तीच नाही
अरे ती समोर, मांडवात हलवतात
एवढी मोठी मूर्ती कशी उचलतात
अरे ती आतून पोकळ असते
बाबा देव पोकळ असतो?
देव नाही रे.. मूर्ती
...............

बाबा तो फुलवाला कुठे बसतो
कोणता फुलवाला?
तो, ज्याने ती बॉम्बची ब्याग ठेऊ दिली नाही.. तो
...(बापरे.. पोरगा पेपर वाचतो कि काय?)
...फालतू प्रश्न विचारू नकोस
समोर बघ, तो बघ रंगीबेरंगी महाल
.........
त्या मचाणावर सोल्जर का आहेत मशीनगन घेऊन?
बाप्पाचे संरक्षण करायला
पण बाप्पा आपले रक्षण करतो ना
मग पोलीस कसे करणार त्याचे रक्षण?
...
पोरगा मशीनगनकडे एकटक पाहतोय
मला लोकांच्या हातातला नारळ हँण्डग्रेनेड भासतोय
हसू नकोस, ....तुझे बरे आहे बाप्पा
तुझा विमा काढलाय पन्नास कोटींचा
आम्हा भक्तांचे काय?
(माणसाने किती प्रगती केली बघ बाप्पा
देवाचा पण विमा काढू शकतो माणूस)

.....नाही रे..मी अजिबात घाबरलेलो नाही
काहीतरीच काय.. आणि तू असताना कसली भीती
त्यात हा माझ्याच घराचा परिसर
भीती नाही रे .. खरे सांगू.. मी वैतागलोय
पोलीस शिट्ट्या वाजवतोय, कंटाळलेला कार्यकर्ता
पुढे चला, पुढे चला, चा घोष करतोय....

तू समोर दिसतोयस, कोणीतरी जुनी ओळखही देतोय
पण मेटल डिटेक्टरच्या कमानीतून पुढे जावत नाहीए
मी उजवीकडे, लक्ष्मीरस्त्यावर वळतोय
.. ..
इथे बरेच शांत आहे ..विशेष गर्दीही नाही
अगदी आम्हा तिघांच्या चालण्याचा
आवाजही ऐकू येतोय
माझ्या चपलेचा, पोराच्या बुटाचा
आणि हळू हळू सरपटणाऱ्या
दहशतीचा
......
होईल होईल
या सोबतीचीही सवय होईल
पुढल्या वर्षी नक्की येईन!
==========
अभिजित अत्रे

Monday, September 3, 2012

एक गाव हवे आहे

प्रस्ताव खूप पूर्वीच पाठवलाय
मुख्यमंत्र्यांकडे
अजून उत्तराची वाट पाहतोय
तसे मागणे काही फार मोठे नाही
एक गाव हवे आहे

अगदी लहान, छोटेसे
वेंगुर्ला, चिपळूण, रत्नागिरीच्या
कोणत्याही वेसेला खेटलेले
थोडे आंबा फणसाच्या झाडांचे
ताडाचे, माडाचे, नारळीचे
कौलारू घरांचे
सताड उघड्या दारांचे
समुद्राची गाज ऐकत
पोफळीच्या बागेत
निवांत पहुडलेले
किवां ओसरीवरील
करकरत्या झोपाळ्यावर
संथपणे पाय हलवीत
सुपारी कातरत बसलेले
एक गाव हवे आहे

संह्याद्रीच्या कुशीतलेही चालेल
बोरी बाभळीच्या पायवाटेवरचे
करवंदीच्या  जाळीचे
शेळ्या मेंढ्यांच्या लेन्ड्यांचे
सुगरणीच्या खोप्याचे
शिळ घालणाऱ्या राघूचे
निळ्या जांभळ्या आकाशाचे
सदरा फडफडवणाऱ्या वाऱ्याचे
डोंगराच्या उतारावर
तोल सावरत बसलेल्या घरांचे
एक गाव हवे आहे

चालेल चालेल
नदीच्या काठावरचे
हिरव्या मळ्यांचे
वडा पिंपळाचे
सूरपारंब्यांचे
शेणाने सरावलेल्या अंगणाचे
तुळशी वृंदावनाचे
काळ्या पडलेल्या तांब्याच्या बंबांचे
नांगराचे, जात्याचे, सुपाचे
एक गाव हवे आहे

नाही
मी हे स्वतःसाठी मागत नाही
मी तिथे क्षणभरही थांबणार नाही
मला गावातील लोकांचे भलेही करायचे नाही
त्यांना तर मी हुसकावून काढणार
नेसत्या वस्त्रानिशी
सरकार करेलच त्यांचे पुनर्वसन कोठेतरी
मला माणूस विरहित
पण मानववस्तीच्या सर्व खुणा
जिथे जपल्या गेल्या आहेत असे
एक गाव हवे आहे

मला या गावावर घट्ट
सिमेंटचा डोम उभारायचाय
त्यावर लोखंडाचा गिलाव द्यायचाय
मग माती टाकून खोल खोल
बुजवून, पुरून टाकायचं
लवकरात लवकर, त्यासाठी
एक गाव हवे आहे

मान्य खर्च खूप होईल
पण इतके तर आपण करायलाच हवे
आपल्याच नावासाठी, स्वार्थासाठी
आता वेळ तशी जवळच आलीय प्रलयाची
हे जग बुडेलच कधीकाळी भविष्यात
जे अटळ आहे ते कुणाला चुकलय ?
कधी  ?केव्हा  ?  आता यावर वाद नको
एक गाव हवे आहे

ही सगळी शहरे वाहून जातील
त्यांच्याच गटारातून
नवे जग पुन्हा प्रगटेल
कुठल्याश्या पिंपळपानावर बसून
किवां एखाद्या अमिबातून
त्यानंतर काही हजार वर्षे उलटल्यावर
एके दिवशी गळून पडेल
पुन्हा एकदा
माकडाची शेपटी
मग ते दोन पायावर चालेल
माणूस बनेल
खूप खूप प्रगती करेल
चंद्रावर जाईल
पुन्हा नवे शोध, नवे बोध
हे  सगळं सगळं दिसतंय मला
म्हणून मला घाई आहे
म्हणून मी केव्हाचा ओरडतोय
एक गाव हवे आहे

सगळी सगळी सुखे उपभोगल्यावर
नवा माणूसही घेऊ पाहिलं
पृथ्वीच्या अंतरंगाचा शोध
आपल्याला जसे सापडलेले
हरप्पा मोहिन्जदारो
तसेच कधीतरी त्याला
हे लपवलेले गाव सापडेल
मग तोही होईल चकित
हजारो युगांच्या आधी
त्याच्याच सारखे माकडाचे वंशज
या जगात होते या साक्षात्काराने
तोही होईल  सद्दगदित
हे गाव पाहून
म्हणेल पूर्वी कधीतरी माणूस
एक साधे, सोपे जीवन जगत होता
निसर्गाच्या मांडीवर बसून
कदाचित तो यातून बोध घेईल
किवां कदाचित घेणारही नाही
पण
त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात
आपल्या कधीकाळच्या सुसंस्कृतपणाची
एवढी एखादी तरी खूण उमटायलाच हवी
म्हणून एक पुरावा
मला मागे ठेवायचाय
तसे फार नाही हे मागणे
तुम्हीही  जरा लावा ना जोर
सांगा ना  मुख्यमंत्र्यांना
एक गाव हवे आहे
पुरण्यासाठी.
=================
अभिजित अत्रे

Wednesday, August 22, 2012

सत्ता आणि सुंदरी

सोंदर्य हस्तगत करण्याची
एक आदिम लालसा
नेहमीच लसलसते प्रत्येक सत्तेत
याच हव्यासापोटी
एखादा लंकाधीश
सोन्याच्या राजधानीसह जळून जातो
एखादा दु:शासन
शंभर पोरांच्या जन्मदात्रीस निपुत्रीक बनवतो

पण
आसीम सोंदर्यालाही असतोच
एक पुरातन शाप
त्यालाही मोजावी लागते किमंत
सत्तेच्या जवळ जाण्याची

म्हणूनच
कुरुक्षेत्रावरील विजयाच्या पताका
पांचालीच्या मुलांच्या रक्ताने भिजतात
आणि  अग्निपरीक्षा गाडल्या जातात
खोल खोल दुभंगणाऱ्या धरतीत 

चित्तौडच्या किल्ल्याबाहेर
घोड्यांच्या टापांचे आवाज वाढताच
केशरात  जपलेला एक सकवार  देह
विसर्जित होतो लालबुंद जौहरात
आणि, मुघल- ए- आझमच्या
विजयाची नौबत झडताच
राजप्रसादाच्या भिंतीत कळ्या गुदमरतात

युगांन युगे,
हे असेच चालू आहे
एखाद्या सनातन संगनमता सारखे
अनिच्छेने असो किवां इच्छेने
जेव्हा जेव्हा
सत्ता काबीज करू पाहते आसीम सोंदर्य
किवां सोंदर्य आवळते मखमली पाश तख्ताभोवती
तेव्हा तेव्हा
ते जळून दग्ध होताना पहिले आहे
सतयुगापासून कलियुगाने

म्हणूनच
मला नाही नवल वाटत
मी नाहीं कारण शोधत
गीतिका शर्माच्या फासाचे
फिझाच्या 'गूढ' मृत्यूचे
भंवरी देवीच्या हत्येचे
===============
अभिजित अत्रे

Thursday, August 9, 2012

जाब

ठाऊक आहे मला
एके दिवशी परत करायला लागेल
ज्याचे त्याला, हे शरीर
आणि मग कोण जाणे किती
नश्वर आवर्तने करून पुन्हा मी
जन्मीन, एक माणूस म्हणून
भीती मरणाची नाही
भीती ही आहे कि तेव्हाही मी
असाच बेसावध राहीन याची
आणि तसे झाले तर पुन्हा,
पुन्हा व्हावे लागेल निरुत्तर
जेव्हा विचारील ते टोकदार प्रश्न

तसा मी वाकबगार आहे उत्तरे देण्यात
बायकोला, साहेबाला, मित्रांना
अगदी वकिलाच्या नोटिशीचाही
मी भूगा भूगा करतो माझ्या
हजरजबाबी वाणीने आणि पेनाने
पण ते चालून येते माझ्यावर
सवालांचे अठराअक्षौहिणी सैन्य घेऊन
आणि एका क्षणांत चोळामोळा करते
माझ्या समर्थनांच्या बुजगावण्यांचा

तसे फार मोठे नाही ते
माझ्याच एवढे आहे
आणि जगेलही माझ्याच एवढे
अजून पाच.. दहा.. वीस .. तीस वर्ष
नक्की किती हे फक्त ते जाणून आहे
ते.... माझेच आयुष्य
ते विचारते मला जीवघेणे प्रश्न
माझ्या बिछान्या भोवती
दात कोरत उभे राहते ते रात्री
आणि मला विचारते जाब
मी वाया घालवलेल्या त्याच्या
वर्षांचा.
=================
अभिजित अत्रे

Monday, August 6, 2012

मुरलीधराची ऑबीच्यूरी

परवा भर दुपारी
खून झाला सदाशिव पेठेत
खुन्या मुरलीधराचा
नाही मूर्ती शाबूत आहे अजून
गाभारयासकट
तिचे देवत्व जपले आहे आम्ही
हेरीटेजचा ट्याग लावून
(साल, देवालापण हेरीटेजच्या यादीत
घालू शकतात माणसे, कमाल आहे)
तर सांगायचा मुद्दा हा की
मंदिर अजून जागेवर आहे
पण देवाच्या पोटातून
सळया गेल्यात आरपार
रक्त नाही आलेले
पण सिमेंट वाहतंय भळाभळा
पाटाच्या पाण्यासारखे
जीर्ण वाडे आणि
खोखो कबड्डीची मैदाने ओलांडून
लक्ष्मी रस्त्यापर्यंत पसरलेत
त्याचे ओघळ
पण कुठेच काही खबर नाही खुनाची
लोक म्हणतात
देव मरूच शकत नाही
जो अमर आहे
त्याचा कसा खून होईल?
जाऊदे..
आपणतरी कशासाठी गोळा करायचे
कोणीतरी, कधीतरी, कुठेतरी, मेल्याचे
पुरावे? आणि,
ज्यांनी खून केला ते छापतीलच
सगळ्याच पेपरात लवकरच
एक दहा-वीस मजली ऑबीच्यूरी
===============
अभिजित अत्रे

Wednesday, August 1, 2012

काही क्षणिका


एक झाड
==========================
टेकडी वरचा तो पर्णहीन पुरातन वृक्ष
तसा जिगरबाज
त्याने सोडली नव्हती आशा
नव्या हिरव्या पालवीची
अन धाडले होते मुळांना
खोल खोल
जेव्हा दगडच लागला
तेव्हा दिली होती साद
तेव्हा नाही दिले तू
हाकेला उत्तर
आत्ता दाटून येतंय तुला
पण आता वठलेल खोड
खराट्याच्या काड्या झालेले
हात उंचावून भिक मागतय
आता पाऊस नको...
...वीज पाठव
*****************
एक खासदार
******************************
सुखी माणसाकडे सदराच नसतो
हे समजल्यावर तो नागडाच
फिरायला लागला गावभर
लोक हसले, फिदीफिदी
मग त्याने त्याचे कातडेच
छिलून घेतले
आता तो मजेत आहे
गेंड्याची झूल पांघरून
हिंडतोय सुखाने
कधी राज्यसभेत
कधी लोकसभेत
***************
बिल्ल्यात डोकावताना...
******************
जनरलच्या कडक इस्त्री केलेल्या
ऑलिव्ह ग्रीनवर ऐटीत रूळलेल्या
शिस्तबद्ध ओळीत लगडलेल्या
रंगीबेरंगी रीबिनीत सजलेल्या
डझनभर पदकांपेक्षा
नेहमीच जास्त असते संख्या
युद्धात मारल्या गेलेल्या
जवानांची
म्हणूनच त्या चकचकीत बिल्ल्यात
मला प्रतिबिंबित होताना दिसतात
शिलाई मशीन समोर वाकलेली
पांढरी कपाळे
****************
अभिजित अत्रे
 

Saturday, July 28, 2012

गंमत गाणे: अनूकरण

दहाव्याच्या विधीसाठी जाताना
ओम्कारेश्वरापाशी वळताना
पहिला गुरुजींनी चालताना
डोश्याचा स्टॉल उघडताना

मालक म्हणाला गुरुजी काय घेणार
आम्ही हवी ती व्हरायटी देणार
मसाला डोसा - अमूल डोसा
शेजवान डोसा - म्हैसूर डोसा
स्पंज डोसा- लोणी डोसा
पेपर डोसा - रवा डोसा
कट डोसा - सेट डोसा
का घेता  आपला - साधाच डोसा?

परतल्यावर घाटावर गुरुजीना विचारले एकाने
दक्षिणेचा अंदाज सांगा जरा बेताने
गुरुजी म्हणाले -- वाचला नाही का फळा?
पिंडास पक्षी कोणता --शिउ दे बाळा
सफेद हवा -- का काळा?
पांढरा बगळा -- का गाणारी कोकीळा
डोमकावळा - का आपला साधाच कावळा?


आणि हवेत फिरत असतो आत्मा पितरांचा 
त्याला द्यायचा आपण मोक्ष कितीचा?
शंभरात प्रेतात्मा
दोनशेत मृतात्मा
तीनशेत सुखात्मा
चारशेत हुतात्मा
पाचशेत अंतरात्मा
दक्षिणे शिवाय -- भटकती आत्मा
============
अभिजित अत्रे

Monday, July 23, 2012

परीराणी

परीराणी परीराणी ---  का गं तुझ्या डोळा पाणी
पिंजलेल्या धुक्यातून --- का गं तुझी उदास कहाणी?


परीराणी परीराणी--- तुझा झगा कसा फाटला
जादूच्या छडीवरचा --- तारा कसा तुटला?


परीराणी परीराणी--- का गं तुझी मूक वाणी
चांदण्यात भिजलेली --- गेली कुठे तुझी गाणी?


परीराणी परीराणी--- तुझे पंख कुठे गेले
आकाशाला वेढणारे --- तुझे स्वप्नं कुठे गेले?


परीराणी परीराणी--- तुझे रंग का गं उडून गेले
परीराणी परीराणी--- तू लग्न का गं केले?
====================
अभिजित अत्रे