Friday, June 7, 2013

दहावी नापास झालेल्यांसाठी

जगण्याला बोल लावावा
एवढा वार खोल नाही
मरणाचा विचार करावा
एवढे परीक्षेचे मोल नाही

शून्य टक्के शंभर टक्के
सब घोडे बारा टक्के
आयुष्याला लगाम घालावा
असा कोणताच निकाल नाही

आई बोलली बाबा बोलले
भाऊ बहीण असतील चिडले
पण तुझ्याशिवाय कुणासाठी
त्यांच्या आतड्यात ओंल नाही

तुझे प्रयत्न कमी पडले 
त्यात  इतके काय बिघडले ?
झोळी तुझी रितीच ठेवायला 
देव  काही  कंगाल  नाही 


जीवन हीच एक मोठी शाळा
श्रमाने फुलतो इथला मळा 
प्रगतीपुस्तकावर इथल्या
रंग घामाचा लाल नाही

मार्कशिटची ती काय किमंत? 
कागदात  मोजता येत नाही हिमंत
मुठी वळवून दाखव जगाला 
आयुष्य तुझे फोल नाही

जगण्याला बोल लावावा
एवढा वार खोल नाही…
========== 
अभिजित अत्रे

Saturday, January 19, 2013

प्रिय सुनीता,

प्रिय सुनीता,
तू खूप खूप दूर होतीस तेव्हा, हो बरोबर, तेंव्हाच
राजधानीत एक घृणास्पद घटना घडली
कदाचित तुझ्या वाचनात ती आता आली असेल
किवां नसेलही, महिना झाला आता त्याला
तेव्हापासून एक  उबग आणणारी चढाओढ सुरु आहे
तुला सुरक्षित ठेवण्याची

प्रशासनाने विडा उचलला आहे 
तुझ्या भोवती नव्या नव्या लक्ष्मणरेषा आखण्याचा
महापालिकेनीही घेतले आहे कंत्राट 
तुला जूडो-कराटे  शिकवायचे
परवा राजकीय पक्षाच्या महिला आघाड्यांनी
तिळगुळा सवे  तिखटाच्या पुड्या लुटल्या
संक्रांतीला, आणि
पोलीस कमिशनर स्वतः जातीनी वाटत आहेत
सहा इंचाहून कमी लांबीच्या सुऱ्या आणि कात्र्या
अगदी मोफत

चंद्रकळेच्या गाठीला असू दे
एखादा पेपर स्प्रे 
थोडे अवघडल्यासारखे होईल
पण स्प्रे बांधलेला पदर घट्ट ठेव
एकले नाहीस का? काय म्हणतात
औरंगाबादचे  न्यायमूर्ती आणि कुलगुरू
टाळी एका हाताने वाजत नाही, बाई

ज्यांच्या वाणीला तपश्चर्येचे अधिष्ठान नसते 
ते ऋषीं शाप देण्याचे सामर्थ्य  गमावून बसतात
म्हणून ते तुलाच मंत्र म्हणायला सांगत आहेत
पण तरीही लक्ष दे जरा त्यांच्याकडे 
तेवढा एक मंत्र पाठ कर
समोरच्याला इंपोXX करणारा
मोठ्याने सराव कर म्हणण्याचा
बावळटा सारखे तोंडातल्या तोंडात पुटपुटलीस
तर इफेक्ट नाही होत जपाचा
दातखीळ बसली असेल तरीही 
आठवायलाच हवे तुला
कोणाला कोणत्या नावाने बोलवायचे ते
भाऊ, दादा, काका, मामा
असे कितीतरी सोपे सोपे शब्द आहेत
तू एखादा सॉफ्ट स्किल कोर्स
का नाही करत हे शब्द शिकण्याचा?

नाही नाही
सरकारने तुझी जबाबदारी नाकारलेली नाही
गृह खाते स्वस्थ बसलेले नाही
परवाच मंत्रालयाने डेल कार्नेजी बरोबर करार केलाय
कॉपी आत्ताच बुक कर, ऑन लाईन
नवे पुस्तक लिहून देणार आहे तो
हाऊ टू विन स्टॉकर एण्ड इनफ्लूंस रेपिस्ट 

एक राहिलेच,
तुझ्या मोबाईलवर हे सॉफ्टवेयर डाउनलोड कर
तुझा ठावठिकाणा सांगणारे
आणि हो
उगाच गोंधळून जाऊ नकोस
स्प्रे, मोबाईल, मंत्र, कात्री, तिखट, कराटे 
यातले काय काय
कधी कधी
कसे कसे वापरायचे
शिक जरा मल्टीटास्किंग करायला

सुनीता
या देशात प्रत्येक गोष्टींचे मार्केटिंग होते
तुझे तर होणारच
ते बघ ते
नीतिमत्तेचे घाऊक ठेकेदार
ते रोज नवे नवे फर्मान सोडत आहेत
आणि पळी पळीने पाजू  पहात आहेत तुला
आपल्या प्राचीन संस्कृतीचे बोधामृत
मला गंमत वाटते कधी कधी
कोणती भारतीय संस्कृती?
आसुर्यस्पर्शा स्त्रीचा उदोउदो करून
तुला घरात कोंडून ठेवणारी?
की सतीची मंदिरे बांधणारी?
जुगारात बायकोला पणास लावणारी?
की गर्भवतीस रानात सोडणारी?

मान्य
याच संस्कृतीत जन्मास आला
रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडणारा राजा
गार्गी मैत्रयीचे गुणगान गाणारे एक यूग पहिले
याच संस्कृतीने
आणि इथेच घोड्यावर स्वार होऊन
लढली होती राणी लक्ष्मिबाई
ताराबाई आणि अहिल्यादेवी
पण हेच अंतिम सत्य नाही
आणि तू ते खास जाणतेस
खळ्यात, मळ्यात, शेतात,
चौकात, घरात, दारात
सर्वत्र
नुसत्या  नजरेने वस्त्र फेडणारे दुशा:सन
याचा संस्कृतीत घाऊकपणे  उभे राहिलेले
तू पहिले आहेस, वर्षानुवर्षे 

या कुबड आलेल्या संस्कृतीची
बासरी वाजवणाऱ्या कृष्णांनी
देवळात सोडलेल्या  मुरळीवर
पितांबर पांघरल्याचे ऐकिवात नाही
सावकाराच्या तिजोरीत बंद झालेल्या
यौवनांला आणि डाकबंगल्यात
घुसमटलेल्या अश्रूंना मुक्त करण्याचे
शाश्वत प्रयत्न कुठे झाले या संस्कृतीत?
काळानरूप ठिकाणे फक्त बदलत गेली
इतकेच, अग
एखाद दुसराच जाणता राजा
बाकी सगळा बेंडबाजा

सुनीता
सनातन मुल्यांची राख चोपडलेले पुजारी
तुझी दिशाभूल करायला टपून आहेत
ते तुला सत्यवान सावित्रीच्या कहाण्या ऐकवतील
आणि वडा भोवतीच्या दोऱ्यात गुरफटून टाकतील
विचार त्यांना
मातृसत्ताक देशात का मारल्या जातात मुली
जन्माला येण्या अगोदरच?
नाही नाही
सगळे  तसेच आहेत असे नाही
पण तरीही, दुर्देवाने
युगान मागून युगे जाऊनही
ही मातृसत्ताक संस्कृती अजून नसा नासात
भिनलेली नाही
सार्वत्रिक चित्र हेच आहे की
मांडवात  दुर्गेची पूजा करणारे
घरात चहाचा कपही विसळत नाहीत

सुनीता
तुलाही युगान युगांची सवय झाली आहे
वामांगीच उभे राहण्याची
आणि म्हणून मला राग आहे
तुला पुरातन काळापासून फसवत आलेल्या
या तत्वज्ञानाचा, ज्याच्या जीवनधारेवर
व्रतवैकल्यचि पुटे चढलीत
मलाही अभिमान आहे भारतीय संस्कृतीचा
पण माझी भारतीय संस्कृती पुराणाच्या 
पानात दडलेली नाही
तिला व्रतवैकल्यचि  कोळीष्टीके
चिकटलेली नाहीत
ती दिसते मला
जंतर मंतरच्या उत्स्फूर्त  स्फुलींगात
तुला समानहक्क मिळवून देणाऱ्या
नव्या कायद्याच्या उद्घोषात
तुझ्या मुक्त हास्यात
आणि हो,
रयाम्पवरच्या तुझ्या
धीट पदन्यासातही

सुनीता
सुनीता विल्यम्स
हो, विल्यम्स, तूच तेव्हा इथे नव्हतीस
आकाशावर स्वार होतीस, तब्बल १२७ दिवस
त्यांना तुझ्या अंतराळ भरारीचे मोल अद्याप कळलेले नाही
तुझ्या सामोसे खाण्याचेच त्यांना जास्त कौतुक
म्हणूनच ते अजून चाकू, कात्र्या आणि तिखटाच्या
पुड्या वाटत बसलेत, स्वत: कुठेही  न बदलता 

क्षितिजांच्या लक्ष्मणरेषा ओलांडून
आकाशगंगेवर तू एक उर्जस्वल चित्र रेखाटलेस
आदिशक्तीच्या अंगभूत सामर्थ्याचे
पण ते पाहण्याची  हिम्मत निर्माण व्हायची आहे
इथल्या म्हाताऱ्या घोडेछाप झापडबंद डोळ्यांत

सुनीता 
तू माझ्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहेस
अशी संस्कृती जी उभी आहे
समतेच्या तीरावर, विज्ञानाचे पंख लेवून 
म्हणून तुला सोपवू पाहतोय मी
माझ्या मुलीचा हात
या नव्या वाटेवर
ती सप्तपदी चालू शकली नाही
तरी चालेल
पण तिचे यान
सप्तऋषींचा तारका पुंज शिवून येईल
चाळणी आडून चंद्र पाहायचे संस्कार
ती विसरली तरी चालेल
ती चंद्रावर पाय रोवायला शिकेल! 

सुनीता
कदाचित मी खूप काही मागतोय
कदाचित मी नको इतका आशावादी आहे
पण काय करू?
मला नव्या अभ्युदयाची आस आहे
कारण माझी मुलगी, माझा श्वास आहे.
============
अभिजित अत्रे