Friday, July 13, 2012

तालिबान

पेपरात पानभर पसरलेले फोटो
पाठमोरी उकिडवी बसलेली स्त्री
मागे बंदूक रोखून उभा नवरा
सुटलेली गोळी
काहीच हालचाल नाही
ती मान वळवून पण पाहत नाही
आणि पळूनही जात नाही
ती तशीच बसलेली
दुसरी, तिसरी, चौथी गोळी
ती कोसळीय
थोडी धुगधुगी बाकी आहे
अजून गोळ्या
पाचवी.. सातवी.. नववी
ती शांत झालीय
भोवतालच्या गर्दीत जल्लोष
हे ही फ्रेम झालय

फोटो पाहून तिचे मन सैरभैर होऊन जाते
नवरयाच्या आठवणीने ती गलबलून जाते
दारू पिऊन रोज तिला मारणारा दादला
काल मध्यरात्री तिने दारच उघडले नाही
कुठे गेला असेल?
काय खाल्ले असेल?
रात्री बारानंतर भुर्जीची गाडी पण बंद होते
आपण भारतात, पुरोगामी महाराष्ट्रात जन्मलो
अफगाणिस्तानात नाही, नाहीतर...?

ती तशीच धावत सुटते शेजारच्या मंदिराकडे
मूर्तीच्या पायावर डोके टेकवून हंबरडा फोडते
तिच्या अश्रूंनमध्ये विरघळतात
तिच्या पाठीवरचे वळ आणि
अंगभर चिकटलेल्या बुभुक्षित नजरा
गर्दीतले चोरटे ओंगळ स्पर्श
ती अग्निपरीक्षा दिल्यासारखी
अंतर्बाह्य स्वछ होते, घराकडे वळते

पोटूशा बायकोला वनवासात पाठवणाऱ्या
देवालाही गहिवरून येते आपल्या
सनातन संस्कृतीच्या या दर्शनाने
मग तो स्वतःच स्वतःवर
फुले उधळून घेतो गाभाराभर
आणि आपल्या कृपाकटाक्षाने तो 
भरून टाकतो तिच्या घरातला रिता
घासलेटचा क्यान  
==============
अभिजित अत्रे
=============

1 comment:

Vijay Vasve said...

नमस्ते सर,
नेहमीप्रमाणे मला कविता समजायला जरा वेळ लागतो.. दोन-चारदा वाचल्याशिवाय कवितेमध्ये log-in केल्यासारखे वाटतच नाही. पण एकदा का डोक्यात शिरली की विचारुच नका.. त्या तरंगांमधे मी स्वत:ला झोकुन देतो.. आणि कवितेतील शब्द्खेळांचा जसजसा अर्थ उलगडत जातो.. तसतसा मी. भावनीक होऊ लागतो..
अतिशय छान जमली आहे ही कविता..
पण यातल्या आशयाने गहीवरुन आले...