Wednesday, December 26, 2012

वैकुंठातला निवारा

हा वृद्धाश्रम इथे कसा?
स्मशानास खेटून
मृत्यूच्या फलाटावरच्या
एखाद्या वेटिंगरूम सारखा
बोलवा, बोलवा
त्या संस्था चालकांना
नगर नियोजकांना, सिटी इंजिनियरना
.................................
ते बघा
बघा ते, पाय खरडत खरडत
चाललेले आजोबा
ते रोज दिसतात
गेले कित्येक दिवस,
महिने, वृद्धाश्रमातून निघतात
आणि जाऊन बसतात
स्मशानाच्या दरातील बाकावर
'राम नाम सत्य' चा गजर झाला
कि उठून उभे राहतात
एकटक बघत राहतात अंतयात्रेकडे
काहीतरी मोजतात
स्वत:शीच पुटपुटतात
मान हलवतात
पुन्हा बसतात
पुढच्या प्रेतयात्रेची वाट पाहतात  
कातरवेळी जेव्हा दिशा उदास होतात
आणि खांदे पडलेल्या चाकरमानी सावल्या
घोळक्याने घरी सरकत असतात
तेव्हा ते असे एकटे बसलेले बघून
मलाच गलबलून येते
या पेक्षा ते मेलेले बरे, असे वाटते
संध्याछाया दाटून येताना
त्यांनी का दिवस मोजत बसायचे
तेही स्मशानाच्या दारात?
अरे, कोणीतरी हा वृद्धाश्रम
हलवा ना येथून
......................
अहो पत्रकार
काहीतरी गैरसमज होतोय तुमचा
तो म्हातारा चांगला धीट आहे
डोक्यावर थोडा परिणाम झालाय
बायको गेल्या पासून, इतकंच
दोन्ही पोर अमेरिकेत असतात
कोथरूडचा बंगला भाड्याने देऊन
स्व:खुषीने इथे राहतोय
मरणाची भीती नाही त्याला
त्याला हेवा वाटतो
मढ्या भोवतालच्या गर्दीचा
एके काळी मोठा गोतावळा होता
त्याला आता चिंता आहे
त्याची तिरडी उचलायला
चार जण असतील की नाही याची
येडा साला
तो दिवस नाही मोजत स्वतःचे
माणसे मोजतो, अंतयात्रेतील माणसे
...............
तरी पण हा मानसिक छळच त्यांचा
हा वृद्धाश्रम इथे नसता तर
तर.. नाही..नाही..वृद्धाश्रम नव्हे
हे स्मशानच इथे नसते तर
हे स्मशान इथे कसे?
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
माणसाच्या जगण्याच्या
जगण्यासाठीच्या संघर्षाच्या
सर्व खुणा आजूबाजूला
त्यात हे स्मशान कसे?
हे गावाबाहेर हवे
दूर दूर, खूप दूर
या शहराच्या सीमेबाहेर
नगर नियोजकांना
काही अक्कल आहे की नाही?
..................
बरोबर आहे तुमचे
पण हे स्मशान हद्दीबाहेरच होते
वाहत्या नदीकाठावर
गावातल्या कोलाहलापासून दूर
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
स्मशानावरच उभे आहे
पूर्वी इथे सगळीकडे स्मशानच होते
आम्ही तरी काय करणार
शहरच विस्तारत गेले
स्मशानास येउन भिडले
कसा थोपवायचा हा विकास?
हे फक्त या शहरातच घडतंय
असेही नाही, सर्वत्र हीच परिस्थिती
आता अपरिहार्य आहे
शहर आणि स्मशाना मधील
हद्दी पुसल्या जाणे
=================
अभिजित अत्रे

Friday, December 14, 2012

गझल:-- ग्यांगवॉर

प्रेमावर अनेकांनी खूप गझल लिहिल्या आहेत. दोस्त म्हणाला तू  एखाद्या रुक्ष विषयावर-- पुण्यात , पिंपरीत, मुंबईत होणाऱ्या टोळीयुद्ध, मारामारी, इत्यादी.. इत्यादी विषयांवर -- गझल लिही. त्याच्यासाठी.... 
==============================
गंजून गेले भाले, म्यान तलवार झाली
जरीपटके झाले ओले, आज कोयत्यास धार झाली

बूरूज ढासळून पडले, तोफ आता गार झाली
दगडी चाळीत जे दडले, त्यांचीच चर्चा चिकार झाली

पुस्तकात  लपवलेल्या  पिस्तूलाची, कहाणी आता बेकार झाली
काल मावळात गावठी कट्ट्यांची, विक्री बेसूमार झाली

ही वाट काळोखाची, जिंदगी जूगार झाली
ही न युद्धे वीरांची, गल्लीत शिकार झाली

संगे कोणी ना आला, गर्दी हुशार झाली
थोडा अंधार काय झाला, सावलीही पसार झाली

या शहरातील पांडवांची, वस्ती का लाचार झाली?
इथे शमीच्या झाडांची, कत्तल फार  झाली  
==========
अभिजित अत्रे

Monday, December 3, 2012

नकार

कडेलोटाचे फर्मान निघाले तेव्हाही
शाबूत होते माझ्या बेसावध डोळ्यात
एक इंद्रधनुष्य, त्याच्या सप्तछटांनसकट
आता हे रंगहीन अस्तित्व कोसळत आहे
एका तीव्र उतारावरून, खोल खोल
तळ नसलेल्या काळोख्या दरीत
एखाद्या उंच पर्वताच्या शिखरावरून
निसटलेल्या दिशाहीन पत्थरा प्रमाणे
आता अटळ आहे
ठिकऱ्या होऊन विखरून पडणे
पण
अजूनही तुझ्या शब्दांवरचा माझा विश्वास
तसूभरही कमी झालेला नाही
आठवते?, पाठ वळवून निघताना
तू म्हणाली होतीस की तसे
माझे काही बिघडणार नाही फारसे
तुझ्या नकाराने 
==========
अभिजित अत्रे