पैशाकडे पाठ फिरवून कष्टकरयांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या
समाजातील खऱ्या श्रीमंत मत्रांसाठी आणि पोलिसांनी केलेले बलात्कार, बांधकाम व्यावसायिक व पुढारी यांचे साटेलोटे, शेतकऱ्यांचे हाल आणि शिक्षणसम्राटांच्या पदरी बांधलेल्या विद्वानांकडे पाहून ज्यांचे मन उद्वेगाने भरते त्या माझ्या समविचारी मराठी पत्रकार मित्रांनसाठी हे एक नवेकोरे "नवक्रांतीचे गाणे".
प्रतिक्रिया तर द्याच पण जमले तर एक चाल ही द्या.
=====================
नवक्रांतीचे गाणे
===========
पिचणाऱ्या मनगटाच्या
मुठी आता वळू दे
गोठणाऱ्या नसा नसातून
आता वीज वाहू दे || धृ ||
उन्मत्त फार झाले
राजाचे हे शिपाई
कोवळ्या कळीस डसले
हे शिशुपाल, हे कसाई
यांच्या पापाचा घडा आता भरू दे
वचन आता मोडू दे, आता सुदर्शन सुटू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||
प्रल्हादाच्या शिवाराचे
तुटले बान्ध कारे
इमले इमारतींचे
रक्षिती हिरण्यकश्यपू सारे
खांबा खांबाना येथल्या आता तडा जाऊ दे
उंबरठे आता माखू दे, आता नृसिंह प्रकटू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||
दबा धरून बसल्या आहेत
अजुनी झुंडी गिधाडांच्या
महाराष्ट्राला लुटत आहेत
फौजा दिल्लीतील यवनांच्या
सह्याद्रीच्या कड्याकपारीतून आता वादळ धुमसू दे
आता शिवबाची भवानी पुन्हा तळपू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ||
शिल्लक ना चार नाणी
आणि घरी मुलीचे कार्य
विहिरीत नाही पाणी
अणि झारीत शुक्राचार्य
माझ्या या शेतकरयचे हे दैन्य आता संपू दे
आता बलरामासवे कुबेर नांगर धरू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||
शिक्षणसम्राटांची फिरते इथे टोळी
दारात आर्यभट्ट, घेउन उभे झोळी
लाचार पंडित हे, करतात आता दलाली
यांनी सरस्वतीचीही लावली इथे बोली
आता या अभिमत द्वारका बुडू दे
सांदीपनीच्या आश्रमात पुन्हा सुदामा शिकू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||
कैदेत रावणाच्या का
आहेत अजुनी सीता
जळणार कश्या या लंका
हनुमान पहारा देता
आता प्रत्यन्च्यावर ब्रम्हास्त्र चढू दे
वनवास आता संपू दे, आता राम जिंकू दे
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||
आजचे हे राज्य कलीचे
उद्या टिकणार नाही
सूर्य येथल्या तरुणाईचे
अंधारात बुडणार नाही
कष्टकऱ्यांच्या अंगारातून विष्णू अवतरू दे
युद्ध आता होऊ दे, आता रक्त सांडू दे||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ||
===========
अभिजित अत्रे
=========
3 comments:
अत्रे जोरात आहे... पत्रक़ार संघात लावा...
Sahitya Sammelanat vachaila havi. 'Aryabhatta ....zoli' hi line tar farch masta!! Manjiri
साहित्यिक नवक्रांती आहे ही..
Post a Comment