Thursday, March 25, 2010

मला जाऊद्या ना घरी - आता वाजले की बारा

==========================
चांदीचे ताट मांडलेले आहे. ताटा भोवती सुंदर रांगोळी आहे. देवासमोर लावलेल्या धुपाचा मोहित करणारा सुगंध खोलीभर दरवळतोय. बिस्मिल्लांच्या सनईच्या सुरांनी घरातले वातावरण मंगलमय झाले आहे. चारीबाजूने प्रसन्नतेचा शिडकावा होतो आहे. साक्षात अन्नपूर्णा वाढायला उभी आहे. भोजन सुग्रास आहे. भूक ही लागली आहे. पण घशाखाली एकही घास जात नाहियय.

अहो जेवायला कुठून सुरवात करायची हेंच कळेनासे झाले आहे. ताटाच्या आत व बाहेर वाट्यांची चळत आहे. पंच नव्हे तर पन्नास पक्वाने आहेत. गुलाबजामच्या शेजारी रसमलई व रसगुल्ला आहे. श्रीखंडाच्या जोडीला आम्रखंड व कलाकंद आहे. बसुंदीच्या शेजारी शेवयाची खीर आणि सीताफळ रबडी आहे. गाजर हलवा, मुग हलवा, दुधी हलवा आणि जोडीला जिलेबी आहे. पुरणपोळी, गुळपोळी आणि खावा पोळी वाढून झाली आहे आणि अन्नपूर्णा विचारीत आहे " काय आणायचे?"

काय सांगावे ? काय खावे? किती खावे? मी बावचळून गेलो आहे.
सध्या पुणेकर मराठी रसिकांची अवस्था कहीशी अशीच आहे.

पुणे तिथे काय उणे? हे मान्य. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, हे ही तितकेच खरे. पण गेले दोन अडीच महिने पुण्याच्या मराठी रसिकांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचा भडीमार होतो आहे. विएंतनामवर जसा बॉम्ब आणि गोळ्यांचा हल्ला होत होता तसा पुण्यात गेले दोन महिने सांस्कृतिक कार्यक्रमांचा हल्लाबोल चालू आहे. एक चांगला कार्यक्रम झाला नाही कि लगेच दुसरा. एक चांगला सिनेमा बघून होत नाही तर दुसरा त्याहूनही चांगला. जरा उसंत नाही. जर्मन बकेरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या काळातही हे सांस्कृतिक अग्निहोत्र चालूच होते.

पुण्यात आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीने पुण्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेची पार वाट लावली आहे. सुरवात झाली ती सवाई गंधर्व मोह्त्सावापासून. एरवी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणारा हा संगीत जलसा. याला काही जण वधू-वर सोहळा असेही म्हणतात. वाघ-सिंह हे जसे रात्री सुळे आणि नख्या पराजत शिकारीला बाहेर पडतात तसे शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नसणारी अनेक उपवर मुले-मुली रात्री शाल पांघरून इथे जमतात. आपला जोडा कुणाशी जुळतोय याचा शोध घेतात.

जरा विषयांतर होईल (ब्लॉग आपलाच आहे त्यामुळे तुम्ही माफ करालच) पण एक घडलेला किस्सा सांगतो. मागे एकदा सवाईतील बटाटावड्याच्या गाडीपाशी मी सिगरेट ओढत उभा असताना त्याच गाडीपाशी एका होऊ घातलेल्या जोडप्याच्या सवाई गप्पा कानावर आल्या.
तो:  छान झाले ना गाणे.  भैरवी म्हणजे पंडितजींचा हातचा मळ. किराणा घराण्याचे हे वैशिष्ट्यच.
(मुर्खा कार्यक्रमाचे हे पहिले गाणे आहे. भैरवी कशी असेल. आईला कधी किराणाच्या दुकानातून साधे पोहे आणून दिले नाहीस तू आणि घराण्याची वैशिष्ठ सांगतोयस. गेली तुझी विकेट-- मी मनात).
पण विकेट जात नाही. त्याच्या शालीच्या झिरमिळ्यात बोटे गुंफून
ती: " राजा. आपल्या प्रेमाची सुरवात अशीच भैरवीने होईल ना रे? (भैरवीने सुरवात? बोंबला.. मी मनात.)
पण दोघांनाही गाणे कळत नसल्याने त्यांचे सूर छान जमले. अशा 'शालीन' लग्नांना मी तेव्हापासून 'शालजोडीतील लग्न' किवा 'सवाई लग्न' असे संबोधतो.

असो. विषयांतर पुरे. सवाईवर एक वेगळा लेख लिहिता येईल. सांगायचं मुद्दा कि स्वाईनफ्लू मुळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणारा सवाई जानेवारीत घेण्यात आला आणि त्यांनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक झंझावाताच पुण्यात सुरु झाला. तो अजून चालूच आहे. सर्व कार्यक्रम दर्जेदार. नाव ठेवायला जागा नाही. सवाई संपत नाही कि राहुल देशपांडे- कम-नाना पाटेकरांचा वसंतोत्सव. त्यात आजोबांची कट्यार नातू पहिल्यांदा चालवणार म्हटल्यावर हा कार्यक्रम चुकवून कसे चालणार?
मग अंतर्नाद, अजय अतुल, रवी शंकर, झाकीर हुसैन, फिल्म फेस्टिवल, शनिवारवाडा नृत्य मोहोत्सव , सोलो जसराज, आर्या आंबेकर आणि बालचमू, शिवकुमार शर्मा, आणि...... ही यादी संपणारी नाही.
यातले निम्म्याहून जास्त कार्यक्रम आमच्या आणि पुण्यातील इतर वृतपत्रानी आयोजित केलेले. हल्ली वृतपत्रांचा मुख्य धंदा पेपर काढणे नसून इव्हेट मॅनेज्मेंट आहे कि काय अशी शंका येते.

हे कमी होते कि काय म्हणून याच काळात अनेक दर्जेदार मराठी सिनेमे झळकले. गाभ्रीचा पाऊस, हरीश्चान्द्राची फॅक्टरी, नटरंग, रिंगा रिंगा, जोगवा आणि काही पा सारखे हिंदी ही. त्यात लिमयेना राष्ट्रीय पुरस्कार. त्याचा सत्कार. एफटीआयची पन्नास वर्षे. प्रमुख पाहुणा देवानंद. ( तो परत रात्री माझ्या ऑफिस मध्ये गप्पा मारायलाही आला होता. सत्त्यांशिव्या वर्षीही सडपातळ. नाहीतर आम्ही. फुटबॉल. हस्तोलंदन करतानाही लाज वाटली स्वता:ची). आमचे आवडते दिग्दर्शक-कम-पोलीस इन्स्पेक्टर सतीश राजवाडे यांचा नाशिकच्या वाड्यात रोज नवीन धुमाकूळ चालूच आहे. अग्निहोत्रासारखा अखंड.

असो. हे सर्व कार्यक्रम आणि सिनेमे पाहता पाहता खऱ्या पुणेकर रसिकांचा खिसा पार रिकामा झालाय. अनेक कामे खोळंबलीत. त्यात परत मार्च महिना. हा महिना सुरु होण्याआधीच माझ्यासह अनेक पगारदार रसिकांचा खिसा साफ झालेला असतो. आता तरी हा सांस्कृतिक हल्ला थांबेल अशी अपेक्षा रसिक करत होते. पण तसे होणे नाही. उद्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू होतंय.

आपल्या सर्वांचे मित्र आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवून जेवणाबरोबर आग्रहाने निमंत्रण दिले आहे. तरी काही जणांना राग आहे कि घरी येवून आमंत्रण का दिले नाही. साहित्यिक सुद्धा कधी कधी अतीच करतात. तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात का सचिन तेंडूलकर, घरी येवून निमंत्रण द्यायला? या सगळ्या टीका- खुलाशात इतका वेळ वाया गेला कि चियर गर्ल्सना संमेलनास आणायचे राहून गेले. पुणेकर रसिक खरेच एका अभिनव कार्यक्रमास मुकले.

कल्पना करा. कवी कट्ट्यावर काही कवी त्यांच्या कवितेचे काही स्वप्नील शेर म्हणतायत आणि प्रत्येक शेर झाल्यावर चियर गर्ल्स नाचत आहेत. संमेलनाला एक नवी दिशा मिळाली असती. पेपरवाल्यांचे काही कळत नाही. नवीन काही केले कि म्हणायचे हे प्रथेला धरून नाही आणि प्रथेप्रमाणे कार्यक्रम ठरवले की म्हणायचे '' तेच ते आणि तेच ते".

"तरी तुम्हाला विचारले होते. सल्ला मागितला होता कि काय कार्यक्रम ठेवू. तेव्हा नाही हा ब्लॉग साहित्य विषय आठवला," एक आयोजक मला उद्विग्न होऊन सांगत होते. नाही कळत आम्हाला. (चला कबूल करत आहेत हे ही नसे थोडके.)

संमेलन चांगले पार पडो. अहो शेवटी आपल्या पुण्यात होते आहे. फार वस्त्रहरण केले तर आपल्याच शहराची अब्रू जायची. फार नका खोदू राव, आता दिली आहेत ना सूत्र त्यांच्याकडे. पुण्यात नदीकाठच्या एका रस्त्याचे टेंडर २०० कोटीच्या वर गेले आहे. सरस्वतीच्या बाजारात लक्ष्मी फिरून फिरून किती फिरणार? एखादी पेटी इकडे तिकडे. जरा दुर्लक्ष करा राव.

तर मित्रानो आमचे पुढचे तीन दिवस संमेलनात जाणार आहेत. पण माझ्याच नाही तर अनेक पुणेकर रसिकांच्या मनात प्रश्न आहे " घरी काय सांगायचे?" . गेले दोन महिने हे असेच चालू आहे. रोज एक नवा कार्यक्रम, रोज नवा सिनेमा. संमेलनानंतर तरी हे काही काळ थांबेल ना?

हे सर्व कार्यक्रम दर्जेदार आहेत यात काही शंका नाही. नवीन मराठी सिनेमाही पूर्वीच्या तमाशाप्रधान सिनेमांपेक्षा खूप खूप वेगळा आणि अदभूत अनुभव देतो आहे. संमेलनही चांगलेच होईल.
पण त्यानंतर तरी हा सांस्कृतिक भडीमार काही काळ थांबवा. अहो, एखादी चांगली गोष्ट आणि सौदर्य उपभोगायालाही वेळ हवा. भोजन कितीही सुग्रास असले तरी अपचन झाल्यावर काय खाणार?

दर्जेदार कार्यक्रमांची ऐश्वर्या रोज रात्रीच पुणेकर रसिकांना खुणावते आहे. हात धरून बैठकीला बसण्याचे निमंत्रण देते आहे. पण कातावलेला पुणेकर रसिक तिचा नाजूक हात आता बाजूला करतोय आणि अजीजीने म्हणतोय : "मला जाऊद्या ना घरी.... आता वाजले की बारा,".
===============
अभिजित अत्रे
=====

Monday, March 22, 2010

नवक्रांतीचे गाणे

पैशाकडे पाठ फिरवून कष्टकरयांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या
समाजातील खऱ्या श्रीमंत मत्रांसाठी आणि पोलिसांनी केलेले बलात्कार, बांधकाम व्यावसायिक व पुढारी यांचे साटेलोटे, शेतकऱ्यांचे हाल आणि शिक्षणसम्राटांच्या पदरी बांधलेल्या विद्वानांकडे पाहून ज्यांचे मन उद्वेगाने भरते त्या माझ्या समविचारी मराठी पत्रकार मित्रांनसाठी हे एक नवेकोरे "नवक्रांतीचे गाणे". 
प्रतिक्रिया तर द्याच पण जमले तर एक चाल ही द्या.
=====================
नवक्रांतीचे गाणे
===========
पिचणाऱ्या मनगटाच्या
मुठी आता वळू दे
गोठणाऱ्या नसा नसातून
आता वीज वाहू दे || धृ ||  

उन्मत्त फार झाले
राजाचे हे शिपाई
कोवळ्या कळीस डसले
हे शिशुपाल, हे कसाई
यांच्या पापाचा घडा आता भरू दे
वचन आता मोडू दे, आता सुदर्शन सुटू दे || 
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||

प्रल्हादाच्या शिवाराचे
तुटले बान्ध कारे
इमले इमारतींचे
रक्षिती हिरण्यकश्यपू सारे
खांबा खांबाना येथल्या आता तडा जाऊ दे
उंबरठे आता माखू दे, आता नृसिंह प्रकटू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||  

दबा धरून बसल्या आहेत
अजुनी झुंडी गिधाडांच्या
महाराष्ट्राला लुटत आहेत
फौजा दिल्लीतील यवनांच्या
सह्याद्रीच्या कड्याकपारीतून आता वादळ धुमसू दे
आता शिवबाची भवानी पुन्हा तळपू दे || 
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ||  

शिल्लक ना चार नाणी
आणि घरी मुलीचे कार्य
विहिरीत नाही पाणी
अणि झारीत शुक्राचार्य
माझ्या या शेतकरयचे हे दैन्य आता संपू दे
आता बलरामासवे कुबेर नांगर धरू दे ||
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ || 

शिक्षणसम्राटांची फिरते इथे टोळी
दारात आर्यभट्ट, घेउन उभे झोळी
लाचार पंडित हे, करतात आता दलाली
यांनी सरस्वतीचीही लावली इथे बोली
आता या अभिमत द्वारका बुडू दे
सांदीपनीच्या आश्रमात पुन्हा सुदामा शिकू दे ||  
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ ||

कैदेत रावणाच्या का
आहेत अजुनी सीता
जळणार कश्या या लंका
हनुमान पहारा देता
आता प्रत्यन्च्यावर ब्रम्हास्त्र चढू दे
वनवास आता संपू दे, आता राम जिंकू दे
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ || 

आजचे हे राज्य कलीचे
उद्या टिकणार नाही
सूर्य येथल्या तरुणाईचे
अंधारात बुडणार नाही
कष्टकऱ्यांच्या अंगारातून विष्णू अवतरू दे
युद्ध आता होऊ दे, आता रक्त सांडू दे||  
मुठी आता वळू दे-- आता वीज वाहू दे || धृ||  
===========
अभिजित अत्रे
=========

Wednesday, March 17, 2010

कविता:-- ते चार मृत्यू

ते चार मृत्यू 
===============
ठरवले होते मेल्यावर
एकदा बसायचे चित्रगुप्ताबरोबर
चाळायची त्याची चोपडी
सोडवायची ती कोडी
मृत्यूची.

ते चार मृत्यू
मनास सतत सलणारे
डोक्यात पिंगा घालणारे
तर्क वितर्क जाळणारे
प्रश्नचिन्हातच उरणारे
ते चार मृत्यू

ठरवले होते
विचारायचे त्याला

असा कसा तो धुमसला वारा
आभाळातून ढळला तारा
खरेच का ते विमान पडले
का आझाद साधू बनून दडले?

ठरवले होते
विचारायचे त्याला

का झोकाळाला आसमंत सारा
विझला कसा जय जवान जय किसानचा नारा
खरेच हृदयाचा ठोका बंद झाला
का ताश्कंदमध्ये होता विषाचा पेला?

ठरवले होते
विचारायचे त्याला

का टाकली फुलराणीने उडी
का थांबली नाही ती आगीनगाडी
कशी तुडवलीस रूळावरती तू तरी
हरिततृणांची मखमल सारी?


ठरवले होते
विचारायचे त्याला

असे कसे धजावले गुरुजींचे मन
का घेतले त्यांनी मृत्यूचे महाचुंबन
किती साधना अन राष्ट्रभाषा
मग कोणती होती निराशा ?


ठरवले होते
विचारायचे त्याला
पण नाही विचारणार आता

अनेक सुभाषचंद्र कोसळलेत
मिग विमानांच्या शवपेटीत
काळाच्या खोल खोल गर्तेत

लालबहादूर शास्त्रींच्या मागे चाललेत
शेतकऱ्यांचे तांडे, भांबावलेले
मरूनसुद्धा पाशात लटकलेले

निशब्द झाली आहेत बडबडगीते
भारत इंग्लिशस्कूलच्या सहलीची (*)
फुरसुंगीच्या रुळांवर विखुरलीत
पाने बालकवींच्या कवितेची

आणि या साने गुरुजींच्या भूमीत
हे झाले आहे रोजचे
एक श्याम आईचे बोट सोडतोय, कायमचे

ठरवले होते
विचारायचे त्याला
पण नाही विचारणार आता
चित्रगुप्ता
मी तरी किती किती कहाण्या ऐकणार
आणि तू तरी काय काय लिहून ठेवणार
========
अभिजित अत्रे
============

(*):-- साधारण पंधरा वर्षापूर्वी फुरसुंगीच्या रेल्वेफटकातून जाताना शिवाजीनगरच्या भारत इंग्लिशस्कूलची सहलीवरून परतणारी एक बस रुळावर फसली. भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने ही बस उडवली. पाचावी सहावीच्या मुलांची सत्तावीस किवा जास्तच प्रेते मी त्या दिवशी पहिली. आठवले कि अजून अंगावर काटा येतो. पिवळे तांबूस उन कोवळे म्हणणरे, फुराणीला जोजवणारे बालकवीही वयाच्या २८व्या वर्षी असेच रेल्वेखाली पडून गेले. ती आत्महत्या होती कि अपघात हे मराठी कवितेला कधीही न सुटनारे कोडे.
===========

गम्मत गाणी (भाग -- २)

गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
नाही बट्टा, थोडी थट्टा
थोडी मस्करी, नाही कुस्करी
गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
(भाग -२ )
=======================
मंडई ते अनिल पानवाला
बंद झाले कट्टे
ओंस पडले पार
लग्नानंतरही का सोसवेना
यांना जागरणाचा भार?

स्वारगेटची भेळ
आणि ऑफिसची वेळ
याचा म्हणे आता
जमत नाही मेळ

पाव सॅंपलने  म्हणे आता
असिडिटी होते फार
खिमापाव ही आता
यांना तिखट लागतो यार

भेटले कि लगेच यांना
घरी जाण्याची घाई
म्हणतात उशीर झालाकी
दार उघडत नाही बाई

चाळिशी झाली तरी
बायकोची वाटते भीती
रिंग वाजली की
पळापळ होते किती

याची वाढलीय शुगर
त्याची बिघडली फिगर
कारणे काही संपत नाहीत
मैत्रीची राहिली ना  कदर

मंडईच्या काट्यावर
भरायची एक शाळा
पुण्यातील अफवांचा
पिकायचा तिथे मळा

जेव्हापासून बंद झाला
खन्नांचा तो रात्रीचा चहा
डेक्कनचा अनिल घेतो
पूना मसाल्याचे दहा!
====
प्रेस ते बँक: इकच दुख:
पेरलेल्या रोपाचे        
झाले मोठे झाड
गड्या तरी सांगितलेले    
वेळेवर पाड
'अलर्ट' नाही राहिले    
त्यांची बंद झाली फाइल
अनेकांच्या चेहऱ्यावरचे        
आज लोपले 'स्माइल' !
=====

अध्यक्ष
संघाचा तो प्रतिष्ठित वस्तरा
त्याने आवरला आपला बिस्तरा
त्याला म्हणाली एक उजेड कात्री
काय येणारका  निवडणूकीच्या रात्री
देते अध्यक्षपदाची खात्री
नको म्हणाला वस्तरा
आता तुमचे तुम्हीच निस्तरा
======

कसब्याचा गडकरी
कसब्याचा किल्लेदार
मोठा हुशार
गडाकडेला बसून
चाकुला लावतो धार
विरोधकांनी जेव्हा पत्करला
'बाळा-टू' बनण्याचा विडा
नारायणपेठेच्या सरदाराने
जवळ केला राजवाडा
=======

दारूचे  पुणे
दारूवाला पूल ते बाटलीवाला गार्डन
हा रस्ता नसे थेट
माडीवाले कॉलोनीतून
दिसेल कसे क्वॉर्टरगेट?
सभ्य सुसंस्कृत पुणेकरांना
चालतो ताडीवाला रोड
मला मात्र सांगतात
आता दारू सोड 
=====
अभिजित अत्रे
========

Saturday, March 13, 2010

गम्मत गाणी (भाग--१)

मित्रानो,

हा आहे एंक (अ)काव्य प्रयोग.
थोडी कविता आणि थोडी गम्मत.
मिसळ हो.
बघा आवडते का.
आणखी एंक.
यात कुणाची टिंगल नाही.
हि आहेत गम्मतगाणी.
वाचा आणि विसरा. 
आमचे एंक पुण्याचे श्रीमंत मित्र आहेत. रोज ते नवा नवा कोट घालतात.
रोज एंक पार्टी. रोज नवा कोट. पण, आतला सदरा तोच.
त्यांच्यावरचे हे पहिले गम्मतगाणे.

वैधानिक सूचना: इतरकोणाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!.
======================================
गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
नाही बट्टा, थोडी थट्टा
थोडी मस्करी, नाही कुस्करी
गम्मत गाणी गम्मत गाणी
थोडी बासरी बाकी पिपाणी
==============
गाणे पहिले:
===============
खरा कर्ण
झर झर झरल्या श्रावणधारा
टप टप पडल्या मोतियाच्या गारा
चिंब चिंब आसमंत सारा


तरीही याचा तोच सदरा !


धुंध धुंध करी मृदुगंधित वारा
गर्जत गर्जत बरसती जलधारा
नाच नाचती मोर लेवून नवा पिसारा


तरीही याचा तोच सदरा !


भिरभिर भिरभिर फिरला वारा
सरसर सरसर चढला पारा
चिकचिक चिकचिक घामाच्या धारा


तरीही याचा तोच सदरा !


देवही आज खजील जरा
म्हणती आमचे चुकलेच जरा
कर्णापेक्षा याने बरा


सांभाळला असता कवचकुंडलांचा भारा!


आली नसेल का आज बाई ?
का झाली असेल खूप घाई ?
वाशिंगमशीनचा का उडाला फ्युज़ ?
का हा होता खूप कंनफ्युज़ ?


सुटता सुटेना हे कोडे
गुपित हे सोडवना गडे
प्रश्नाचे हो पडती सडे
खंडोबाला घातले साकडे


एके दिवशी झाला येळकोट
उत्तर सापडले सरळसोट
मिळतो याला रोज नवानवा कोट
का बदलेल मग तो बुशकोट !
=============
अभिजित अत्रे
=============

Tuesday, March 2, 2010

अत्रे म्हणे: अप्रेझलचे अभंग शो(श्लो)क

रीसेशन आले | सेन्सेक्स पडले
राजू घरी गेले | शिक्षामात्र मला || १||

पगार कापला | भत्ताहि छाटला
करहि वाढला |  अपरीमित || २||

चाले हप्त्यांचा नांगर |  वाढे कर्जाचा डोंगर
मित्रहि उधार |  देईनात || ३||

काळोख दाटे |  खिसा माझा फाटे
महिना वाटे  |  खूप मोठा || ४ ||

मालक भुंकती | जमा खर्च मांडती
पिंकस्लीपची भीती |  सदोदित || ५||

वर्ष आले-गेले | चैतन्य लोपले
ब्यालंस संपले | बँकेतले || ६||  

तरी केले काम |  घाळला घाम
मुखातही राम | ठेवियला || ७||

अंगी नाना कळा | पण धाडसनाही बाळा
पुन्हा मालकाचाच मळा | फुलवला || ८||  

शेअर वाढले |  अप्रेझल आले
मोर नाचले |  मनी थुईथुई || ९||

देवाला साखर |  साहेबाला मखर
कामाची पाखर |  परि वायागेली || १०||

बंगाली लॉबी |  मल्लू बॉबी
मराठी डाळ-कोबी | इथे शिजेचनां || ११ ||

दाखवली तळमळ | केली पळापळ
तरी माझा परिमळ |  दरवळेचनां || १२||


आधीच जो वेलपेड |  त्यालाच वरची ग्रेड
आमची तडफड  | जाणवेचना || १३ ||

अत्रे म्हणे आता:--

काढू नको गळा | कोणा न कळवळा
नोकरी कैवल्यसोहळा | समज आता || १४||

जाळ मोहाची लंका |  वाजव परमार्थाचा डंका
भवितव्याची शंका | धरू नको || १५||

ज्याने दिली चोच |  तोच देईल रे चारा
विठ्ठलावर भार सारा |  टाक आता || १६ ||  
====================
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
=========
पुणेकर बुवा तळटीप लिहित नाहीत. पाटी लिहितात. पुण्याबाहेरील वाचकांसाठी हि पुणेरी पाटी:
"टाक आता" हा जरी सर्व दुखण्यान्वरचा जालीम व अक्सीर इलाज असला तरी त्याला प्रायोजक लागतो. नाहीतर आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था व्हायची. प्रायोजक नसल्यास या शब्दाचा वेगळा अर्थ काढू नये. आधीच्या ओळीशी जुळवून वाचा-- अत्रे म्हणे)
=======