एका दिवसाचा तर प्रश्न आहे
कुणाला काहीही कळणार नाही
मोहरांची थैलीच दिली आहे चित्रगुप्तास
किडानंदानी साहेबांनी
तुम्ही फक्त नक्की या
तुमच्याशिवाय काम होणार नाही
एस. एम.
फक्त हडपसर वरून नका येऊ
तुमची इच्छा होईल
तुमच्या नावाच्या शाळा विद्यालये पाहण्याची
पण आजूबाजूच्या टाउनशीपच्या गराड्यात
पार हरवलीत ती, तुम्ही पण तसेच हरवाल,
रस्ता चुकाल, बायपासने भरकटाल
खराडी किवां कल्याणीनगरला पोचाल
खेंड नाही राहिले खराडी आता
मोठ्ठे आयटी हब झाले आहे
उगाच मराठीत पत्ता विचारात फिराल
तर नवी पिढी गावंढळ समजेल तुम्हाला
एस. एम.
मान्य, १९८९.. म्हणजे..इनमिन दोन तप
तशी फार वर्ष नाही झाली तुम्हाला जाऊन
पण या तेवीस वर्षात पुणे खूप खूप बदलय
पुलाखालून बरंच पाणी....अहो बरंच कसलं?
सगळंच पाणी वाहून गेलंय
खूप खूप प्रगती केलीय शहराने
सगळीकडे बऱ्यापैकी समानता प्रस्थापित झालीय
एस. एम
तुम्हाला तुमच्या जुन्नरचा शेळके आठवतो
फ्लोरा फाउंटनच्या १०५ मधला हुतात्मा
ज्याच्या पोराने कर्जबाजारी होऊन शेती विकली होती
आणि नंतर आत्महत्या केली होती, तो
त्याच्या नातवाचे आता खूप छान चाललंय
महिना दहा हजार पगार मिळतो त्याला
कॉलसेंटरच्या कॅबवर ड्रायव्हर आहे
शिवाय त्याची बायको एका आयटी फ्यामिलीकडे
फुलटाईम घरकाम करते
तिलाही मिळतात पाच हजार दरमहा
बावधनला मालकीची पत्र्याची शेड घेतलीय
सेकंडह्यांड रंगीत टीव्ही, टाटाची डिश आहे
सग्गळे सग्गळे च्यानल दिसतात घरात
हे समाजात समानता रुजण्याचेच लक्षण नाही का
एस. एम
याहून खूप अधिक प्रगती झाली असती
पण तुमचे काही साथी सुधारणांच्या आड येतात
आपली बुरसटलेली विचारसरणी टिकवू पाहतात
त्या हमाल पंचायतवाल्या आढावांचच पहाना
ते त्यांच्या कष्टाच्या भाकरीतच अडकले आणि
पुण्यात गल्लोगल्ली पिझ्झाहट्स उभ्या राहिल्या
झुणका भाकरीने फक्त पोट भरते
स्टेटस नाही मिळत, पिझ्झ्यासारखे
त्यांना हे तुम्ही सांगायला हवे
एस. एम
समृद्धी शाम्पेंनच्या बाटली सारखी
फसफसून वाहतेय पुण्याच्या रस्त्या रस्त्यावर
रेशनच्या दुकानासमोर रांगा नाही लागत आता
त्या लागतात दाजीकाकांच्या दुकानासमोर
सोने पण गोळ्या बिस्किटा सारखे खरेदी करतात लोक
चौका चौकात, काचेच्या उंचच उंच इमारतीतून भरभराट
मदिरेच्या शिगोशिग भरलेल्या पेल्यासारखी हिंदकळतीय
पण तुमचे काही मित्र अजूनही
कागद, काच व पत्राच चिवडत बसलेत
एस. एम
आहेत.. बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत अजून शहरात
एसआरे खाली किडानंदानी साहेब त्या डेव्हल्प करणार आहेत
हे झोपडपट्टीवाले आणि मध्यमवर्गीय एंक ब्लॉटच आहेत सिटीवर
ऐश्वर्याची एवढी गंगा वाहतेय पण हे दरिद्रीच राहिले
आता याला तुम्ही आम्ही तरी काय करणार?
त्यांना नाही आली संधी साधता
त्यांना नाही जमले हिसकवायला
त्यांना नाही आले ओरबाडता
शिकलेच नाहीत ते पुढेपुढे करायला
अहो, जाणीवा देखील बोथट नाही करता आल्या त्यांना
मग असे लोक मागेच पडणार नाहीत का?
त्यांच्यासाठी आपण किती काळ रडायचे?
एस. एम
या चिल्लर लोकांची चर्चा तरी कशाला?
आपले काम यापेक्षा खूप महत्वाचे आहे
तर मी सांगत होतो कि तुम्ही
हडपसरला न जाता थेट लकडीपुलावरच उतरा
कर्वेरोड ने गरवारे महाविद्यालयाकडे यायला लागा
थोडा धुराचा त्रास होईल, थोडे डोळे चूरचूरतील
पण धूर हा प्रगतीचा द्योतकच नाही का?
पूर्वी सोन्याचा निघायचा, आता गाडीचा
एवढाच काय तो फरक
एस. एम
तुम्ही गरवारे पासून डावीकडे वळा
नुकताच तिथे मोठ्ठा मॉल उभा केलाय
बाजूच्या संजीवन हॉस्पिटलला थोडा त्रास होणार
हे कळले होते, पण तुमच्या नावाचा पूल व हॉल
लोकांना लवकर सापडत नाही अशी तक्रार होती
त्यासाठी एक ल्यांडमार्क तयार करण्याची गरज होती
म्हणूनच पालिकेनी परवानगी दिलीय या मॉलला
केवळ तुमच्यासाठी
एस. एम
या मॉलच्या नाकावर टिच्चून किडानंदानी साहेबांना
त्याहूनही मोठा मॉल व मल्टीप्लेक्स उभारायचाय
पालिकेनी ठोसरपागेची जागाही डिरिझर्व केलीय
पार्किंगची समस्या मात्र खूपच जटिल आहे
साहेबांचे म्हणणे आहे कि आपण तुमच्या नावचा पूल
दुमजली करू आणि फक्त पार्किंगसाठी वापरू
फुटपाथ पदच्यार्यानसाठी मोकळा ठेवायचा
नाही तरी तुमच्या हॉलवर येणारे लोक कुठे चारचाकी वापरतात?
एस. एम
पुलावरच्या पादचारी मार्गांवर छान प्रदर्शन लावायचे
गेल्या वीस वर्षात पुणे कसे बदलले याचे
आपण त्याला 'एस. एम जोशी हेरिटेज वॉक' असे नाव देवू
पुलाच्या तोंडावर आपण तुमचा एक बाकावर बसलेला
पुतळा इन्स्टॉल करू, मॅकडोनाल्डच्या बाहेर असतोना तसा
मान्य मान्य तुम्ही थोडे ऑड दिसाल
पण यंग जनरेशनला आवडते
ऑड लोकांबरोबर फोटो काढून फेसबूकवर लोड करायला
एस. एम
साहेबांचे प्रपोजल तुमच्या फायद्याचेच आहे
तुम्ही सग्गळ्या क्लासमधल्या लोकांच्या घराघरात पोचाल
पण तुमच्या ओल्ड जनरेशनच्या अनुयायींना हे नाही पटत
प्रगतीच्या आणि विकासाच्या ते नेहमीच आड येतात
त्यांना तुम्हीच समजावून सांगू शकता
किडानंदानी साहेब खास वेळ काढून मिटींगला येणार आहेत
त्यांच्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि समतेसाठी
नक्की यायच, एका दिवसाचा तर प्रश्न आहे
कुणाला काहीही कळणार नाही
एस.एम.
==========
अभिजित अत्रे
==========