Tuesday, September 4, 2018

नटसम्राट टाईमपास

नटसम्राट टाईमपास/© अभिजीत अत्रे/ पुणे/ ४/९/२०१८

To eat or not to eat between meals that is the question...

दोन वेळाच जेवाव की दर दोन तासाने जेवाव हा एकच सवाल आहे

करीनाची मधाळ झिरो फिगर आठवत चराव
दर दोन तासांंनी लाचार डूकरा सारखे, का
नागपुरच्या जिचकरांच्या पदव्या स्मरुन मारावा
अडवा हात, दिवसांतून दोनदाच
आणि एकदमच पाडावा फडशा सगळ्याचा
बिस्कीटांंचा, प्याटिसचा आणि पोळीभाजीचा
५५ मिनिटे संपण्याआधी भात असा चापावा
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..

पण मग त्या
निद्रेतही ईंन्शूलीन पाझरु लागले तर?
ग्लूक्यागाँन बाहेर पडलाच नाही तर?
तर…तर…इथेच मेख आहे, इथेच
ईंन्शूलीनसारखी ग्लूक्यागाँनची ईंजेंक्शन मिळत नाहीत
म्हणुन आम्ही सहन करतो ही ऊपासमार
सहन करतो गाळलेले ताक, काळ्या चहाच्याच कपात
बेशरमपणे सारतो प्रसादाचे पेढे पँन्टच्या खिशात
आणि तरीही हा गोपाळकाला जेवताना, गळून पडतो घास
कुणीतरी जेव्हा बाचकवते "अब तक छप्पन्न" म्हणत

आणि अखेर सहापुडी डब्यांंचा  कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेन पुन्हा 
करीनाच्याच दारात
तोडतो लचके दर दोन तासांनी, कोवळ्या सफरचंदाचे
मध्यरात्री दचकून जाग आली की स्वःताच्याच घरात
चोरुन खातो चार बदाम आणि तिन मनूका, अंधारात

अहो डायटिशीयन्स, तुम्ही ईतके कठोर का झालात?
एका बाजुला दिवेकर तूम्ही मेट्याबाँलीझम स्लो
होण्याची रिस्क सांगता आणि दुस-या बाजुला 
दिक्षीत तुम्ही ग्लूक्यागाँनची भीती घालता

हे आमच्या पोटाच्या विधात्यांनो
तुम्ही तुमच्यात काही सु्वर्णमध्य सांधू शकाल का?
दर दोन तासांनी ५५ मिनिटे जेवलेले चालेल का?
किंवा दर ५५ मिनिटांंनतर दोन वेळा जेवावे का?
का?..का?...
फेकून देऊ सर्व ताट वाट्या आणि सहा पुडाचे डबे 
ऊकिरड्यावर, आणि टोचून घेऊ कायमचे 
एक सलाईन
पण नको.. नकोच ते
सलाईन दर दोन तासाने लावावे का दिवसातून दोनदा 
हा नवाच सवाल ऊभा राहील

त्या पेक्षा... 
हे दिवाकरा, तू  दिक्षीतांना दिक्षा दे
हे जग्ग़ननाथा, तू थोडी ऋजुता दाखव
नाही तर...
पोटावरील विस्कटलेल्या वळ्या घेउन
आम्ही ढेरपोट्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? 
कोणाच्या पायावर ? कोणाच्या ? 
कोणाच्या???
.......© अभिजीत अत्रे/ पुणे/ ४/९/२०१८

11 comments:

Unknown said...
This comment has been removed by the author.
प्रज्ञा said...

मस्त रचना.नुकताच त्यावार एक उपहासात्मक लेख वाचला होता. मजा आली

Sneha T said...

अप्रतिम लिहिलंयत ...अगदी नेमकं! आणि हसून हसून पुरेवाट झाली

Unknown said...

चांगले काम करताना नेहमीच असा विरोध होत असतो. हातात लेकणी आली आणि लेखन स्वातंत्र्य असले म्हणून असे उपरोधिक लिहणे योग्य नाही

mannoo said...

omg....correct expression of words...Atre surname sarth kelat tumhi...keval apratim...

atre-uvach said...

thanks everyone for kind words

Keshav said...

लोकं येवढं शिरियशली का घेतात ? इतकी मस्त कविता लिहिलीये तुम्ही! आद्य विडंबनकार प्रल्हाद केशव यांचे तुम्ही कोणी लागता का ?

Rahul said...

खूपच अप्रतिम, अगदी सर्वांच्या मनातलं लिहिलंय.

Unknown said...

अत्रे साहेब, तुमची ही विडंबनात्मक पोस्ट हल्ली सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे या अनुषंगाने...
डाॅ जगन्नाथ दीक्षितांच्या अभियानात लाखो मधुमेही आणि वजन जास्त असणारे चाहते सहभागी झाले आहेत. त्यांनी सुचवलेली जीवनशैली अनुकरण केल्यामुळे त्यांच्यामध्ये काही दिवसातच सकारात्मक बदल झाले आहेत. डाॅ दिक्षित हे स्वतः वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य असून त्यामागे त्यांचे भरपूर संशोधन आहे. विशेष म्हणजे ही सेवा ते निःशुल्क करीत आहेत. अत्रे साहेब, मी देखील माझ्या मित्राने जेव्हा डॉ दीक्षितांच्या जीवनशैली विषयी सांगितले तेव्हा हसलो होतो. परंतु मी माझ्या स्थूल मित्राला जवळपास दोन महिन्यानी भेटलो तेव्हा त्याची शरीरयष्टी पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याचे वजन तब्बल ८ किलोने कमी झाले होते. सद्ध्या मी देखील डाॅ दीक्षितांच्या अभियानात सहभागी झालो असून कसलाही त्रास न होता सकारात्मक बदल अनुभवत आहे. आपल्यासाठी आणि आपल्या असंख्य वर्गासाठी डाॅ दिक्षितांच्या भाषणाची आणि मुलाखतीची लिंक पाठवित आहे... https://youtu.be/4YF-zLpGSaA https://www.facebook.com/abpmajha/videos/238916283435138/ नक्की पहा.

Anonymous said...

मस्तच
मला असं वाटतं कोणाच्याही चांगल्या कामावर केलेली ही टीका नाही उलट अनेकदा मनात संभ्रम असतो , अनेक प्रश्न असतात की नक्की काय करायचं, कोणतं डाएट करावं ,डाएट करताना भूक तर खूप लागते, त्या बद्दल जो मनात गोंधळ उडतो त्यावर केलेली ही एक गंमतीशीर वात्रटिका आहे ..

bipinchandra said...

दीक्षित सरांबद्दल आपण लिहिलेले खूप खरे आहे