Monday, September 28, 2020

अक्कलकोट

 अक्कलकोट

--------------------

आसक्तीच्या पलीकडे

धुक्यात हरवलेल्या वाटेवर 

लागते त्याचे गाव,

हे कळतं, पण वळत नाही.. 


गाठतो नवे नवे  गाभारे, ठेचकाळतो उंबरठ्यावर, 

मूर्तीचे दर्शन होते, 

पण भेट होत नाही, 

प्रदक्षिणेच्या चकव्यातच थिजतात पाय

कळस दिसतो, 

पण दिशा सापडत नाही

काय चुकतं, तेच कळत नाही 


घंटा वाजवून वर्दी देतो तो हमखास त्याच्या आगमनाची

नंदीच्या दोन कानांच्या बरोबर 

मध्ये टेकवतो हनुवटी, 

आणि सरळ रेषेत पाहतो शिवलिंगाकडे, वाईला.


मनातली रुखरुख प्रथम उघड करतो मूषकाच्या कानात,  गणपतीपुळ्याला. 

जपतो चालताना विष्णू मंदिरात, पाय पडायला नको कासवावर

(साली उगाच नसती आफत) 


परवडत असताना 

उतरतो भक्तनिवासात, स्वरूपानंदाच्या पावसला. 

आवडीने भुरकतो आमटी भाताचा महाप्रसाद,

घटकाभर ध्यानस्थही  

होतो गोंदवल्याला तळघरात,

थेट समाधीला खेटून


मान्य, 

प्रत्येकवेळी सगळं चोख 

होतंच असं नाही

एकदा शेगांवी, महाराजांच्या पादुकांवर डोके टेकवताना, 

त्याला आठवलेल्या त्याच्या चपला, स्टँड बाहेर काढलेल्या

केवढा शरमला होता 

तेव्हा तो, चरफडला होता स्वतःवर

चपलांची आसक्ती सुटत नाही, संसाराची काय सुटणार


असाच एकदा कडेलोट  

झाला होता दापोलीला

रात्री चिकन आणि कोंबडीवडे खाताना,‌जेव्हा बायको म्हणाली‌ 

"आज चतुर्थी..

सकाळी आंजर्ल्याला गणपतीचं दर्शन घेतलं होतं". 


आणि कसनुसा झाला होता जेव्हा वाडीला त्याने केला होता त्रागा, 

बासुंदीची बंद दुकानं बघून, वरमला होता नंतर

"घरी काय दूध आटवता येत नाही का?"..ऐकल्यावर. 


पण हे कधीतरी, क्वचितच.

( देवाने पण थोडे समजून घ्यायला हवे ना राव.. ) 


एरवी तो चोख वागतो,

बालाजीचे कापूर वासाचे 

बुंदीचे लाडू, आठवणीने 

वाटतो सर्वांना कार्यालयात


रात्रभर उभा राहतो 

धक्के खात रेल्वेत,

पण तीन दिवसात 

पिठापूर करूनच परततो


देणगी देतो नियमित अन्नछत्रास

आणि जपून ठेवतो, 

अभिषेकाच्या

धुरकटलेल्या पावत्या, 

दुमडलेल्या अंगाऱ्यासकट


एकदा एका गुरुंचे 

पाय धरून पहिले त्याने,  

धुक्यातील वाट नाही दिसली, चिखल दिसला तळव्याखाली


असाच उदास बसला होता

त्या दिवशी दुपारी

धांडोळा घेत,हातातून निसटलेल्या संचिताचा

स्वतःलाच विचारत टोकदार प्रश्न.


तेव्हा आज्जी घेऊन आली पुढ्यात, 

पोस्टाने आलेला लिफाफा


 हू....

रांजणगावच्या अभिषेकाची पोचपावती,

गेल्या रविवारच्या त्याच्या 

नगर ट्रिपचे प्रमाणपत्र

चार खडीसाखरेचे दाणे, 

पाकिटावर प्लास्टिक मध्ये स्टेपल केलेले


ते  काढत ती म्हणाली, 

यांना देऊन येते

"परवा तासभर बसले होते,  महागणपतीच्या आणि स्वामींच्या फोटो पुढे, 

तुझ्यामुळे त्यांचा नमस्कार पोचला रे, देवापाशी". 


खरं, खोटं.. देवच जाणे

पण त्याला भरून येत

डोळे पुसत तो दोस्ताला 

फोन लावतो


"संज्या.. 

या शनिवारी साडेपाचला स्टार्टर मारतोय गाडीला, तयार रहा.

या वीकएन्डला..अक्कलकोट बरं का.... 

अक्कलकोट".

 ==================

अभिजीत अत्रे २८/०९/२०२०