कोणीच गात नाही अजून भूपाळी कशी
सूर्य उगवूनही पहाट अजून काळी कशी
अंधार पिऊन सारा विझतो रोज एक तारा
राजधानीत चालली अजून दिवाळी कशी
धान्न्याने तुंबलेली कोठारे सडून गेली
वंचितांना चिंता पोटाची अजून जाळी कशी
त्यांच्या भरझारी वस्त्रांसाठी झालो आम्ही नागडे
कोणीच इथे पेटवेना अजून होळी कशी
शिक्षा शिरच्छेदाची केव्हाच ठोठावाली त्यांना
वाजेना तरी राजाची अजून टाळी कशी
गल्लोगल्लीतून फिरती रॅंडचे वंशज सारे
बंदुकीतून सुटली नाही अजून गोळी कशी
मुजोर गार्द्यानी खूप पूर्वीच वार केले
तख्तातून नारायणाची अजून किंकाळी कशी
सिंहासना भोवती घुटमळती ही कुत्री कशी
फोडली नाही वाघाने अजून डरकाळी कशी
======
अभिजित अत्रे
======