(लोकेशन: मुंबईचा राजवाडा. वेळ: नेहमीचीच, टळून गेलेली. महाराज दिवाणखान्यात येराझारा घालत आहेत. प्रधानाने नुकताच प्रवेश केला आहे)
महाराज: प्रधानजी
प्रधान:जी.. जी. जी. जीर जी. जीर जी. जी जीर जी जीर जी..
महाराज:गाणी काय म्हणताय?. इथे माझा जीव चाललाय.
प्रधान:काय झाल राजाजी?
महाराज: काय झाले? महिना झाला. कुठे आंदोलन नाही. कुठे तोडफोड नाही. अशाने पक्ष कसा वाढणार?
प्रधान:आता म्या काय बोलनार? तुम्ही फकस्त हुकूम कराजी. मी लगोलग मोहिमेवर निघतो. पोरांना सांगून दोन चार शिन्माची पोस्टर फाडतो.
महाराज: हेच.. हेच चुकते तुमचे. तीच तीच आंदोलने. मेंदूत भूस्सा भरलाय तुमच्या.
प्रधान:पण राजाजी माझ्या टकुर्यात का पाहता? माझी बॉडी बघा ना. बॉडी बघा.चार जनांसी अजुन्बी एका टायमला हाणू शकतो मी.
महाराज:अरे रे.काय हे विचार......एक काम करा.आपले पत्रकार मित्र जाजू ना फोन लावा.त्याला सांगा आम्हाला मराठी अस्मितेचा एखादा नवीन पण ज्वलंत विषय सांग. (स्वगत) भाषणे देवू. सभा जिंकू. उभा महाराष्ट्र दणाणून सोडू...
प्रधान:लई भारी.
महाराज:थांबा. निट एका. जाजूला सुचत नसेल तर XXX फोन करा. त्यालाही नाही सुचला तर XXX फोन करा. पण आंदोलनाचा नवीन विषय घेऊनच इथे परत या.
प्रधान:व्हयंजी
( प्रधान जातो. राजा झोपतो. लोकेशन तेच. दुपारच्या चहाची वेळ. प्रधान पळत पळत महालात येतो)
प्रधान:महा राजाजी... सुरेखा... सुरेखा..
महाराज:सुरेखा उणेकर? इथे. अजून त्यांच्या व्हीसाचे काम झाले नाही? काय ही कलाकारांची परवड. प्रधानजी मी मदत करणार. शेवटी लोक कलावंतां इथे कोण वाली?. मीच. फक्त मीच वाली.
प्रधान:राजाजी तुम्ही वाली नव्ह. वाली होण्याचा हक्क फकस्त थोरल्या राजाजींचा. तुम्ही सुग्रीव. तुम्ही धाकलं.
महाराज: खामोश. जीभ छाटून टाकीन.
प्रधान: चिडू नकाजी. पन राजाजी शेवटला सुग्रीवानेच राज्य केलत.
महाराज: ठीक आहे. धाकल्या राणींना सांगा त्या सुरेखाचे चहा पाण्याचे पाहायला. आम्ही आलोच.
प्रधान: च्या-पाणी? राजाजी कोन बी आलेला नाय.
महाराज: मग तुम्ही का बोंबलत होता आग लागल्या सारखे?.
प्रधान:ते व्हयं. ते मी म्हण म्हणालो.
महाराज: म्हण?
प्रधान:व्हयं जी. तुमच्या संगत राहून म्या बी दोन चार बुके वाचले.
महाराज: बुके नाही हो. बुक. पुस्तके.
प्रधान:तेच व्हो. त्यात एका बुकेत लिवलंय कि इंग्लिश माणसाला काय बी नवं गावल कि तो युरेका युरेका अस वारडतो. म्या त्याचे भाषांतर केल.. सुरेखा सुरेखा.
महाराज: (कपाळाला हात लावतात).. बर काय शोध लावला तुम्ही.
प्रधान:तेच सांगतोय कवा धरून. तुमच्या जाजूला एक्बी नवीन विषय सुचेना. माझी करभारीन मला म्हणाली रद्दी टाकून या. म्हणून रद्दीच्या दुकानात गेल्तो. तिथे मला नवीन ईशाय मिळाला. राजाजी तुम्ही कधी गेलाय रद्दी टाकाया?.
महाराज: मी रद्दी टाकायाला? मुर्खा राजा कधी रद्दी टाकतो का?
प्रधान:(स्वगतं: यांना फक्त टाकायचं माहिती.. सकाळ नाही.. रात्र नाही.. कसा वाढणार पक्ष). न्हाय.. पण जाव राजाजी. रद्दीची पिशवी उचलून बॉडी पन भारी होते. माझी बॉडी बघा. अजुन्बी एका टायमाला...
महाराज: प्रधानजी. विषयाचे बोला. तुमची बॉडी गेली तेल लावत.
प्रधान:तेच सांगून राहिलोय. आंवो रद्दीच्या दुकानात मला मराठी भाषेवर होनारा लई घोर अन्याय दिसला.
महाराज: घोर अन्याय?
प्रधान: व्ह्ययजी. लई भारी विषय. स्मिता टिकायच पाहिजे आसा.
महाराज: स्मिता नाही हो. मराठी अस्मिता.. एके दिवशी फास लावाल तुम्ही आमच्या गळ्याला.
प्रधान:राजाजी कोन्च्याबी रद्दीच्या दुकानात मराठी पेपरचा भाव इंग्लिश पेक्षा कमी असतोय. हाय कि नाही घोर अन्याय? अन हा अन्याय हजारो वर्षापासून चालू हाय.
महाराज:अरे पेपर चालू होऊन दोनशे वर्ष पण झाली नाहीत अजून. हजारो वर्ष कसा होईल अन्याय? आणि इंग्लिश पेपर मी घेतो. त्याचा कागत गुळगुळीत असतो.
प्रधान:समदा नव्हे. फकस्त रविवारी. म्या पण घेतो इंग्लिश पेपर. रविवारच्या दिवशी. दोनचार गुळगुळीत कागद असत्यात. लक्स साब्नावाणी. पन राजाजी ह्यो गुळगुळीत कागद कोनी रद्दीत टाकतच नाय.
महाराज: मग त्याचे काय करतात?
प्रधान:त्या कागदावर काय बाय फोटो असल तर ते म्या आन समदे सरदार आनी मर्द जनता ते लपवून ठेवतो. आन नसल तर माझी आन सर्वांची कारभारीन ते कागुद कपाटात कपड्यांखाली किवां ब्यागेत ठेवाया वापरते.
महाराज: जर इंग्लिश पेपरचा गुळगुळीत कागद रद्दीत जात नसेल आणि तरीही मराठी राद्दीस कमी भाव मिळत असेल तर मग आहे हा आंदोलनांचा विषय.इतके वर्ष कुणाच्याही हे लक्षात कसे आले नाही?पूर्वी असे आंदोलन झाले आहे का?थोरले महाराजांनी असे आंदोलन केले होते काय?
प्रधान:अजिबात नाय. माझ्या पोरांनी गुग्गळ का काय असतना त्या पन पायल. जाऊ का राजाजी. दोन चार दुकान आज जाळतो. पेट्रोलचीबी गरज न्हाय. कागुदाचे दुकान. भस भस पेटलं बघा.
महाराज: थांबा. घाई करू नका. सगळ्या मराठी पेपर मधील आपल्या लोकांची एंक मीटिंग घ्या. जातीने हजार रहा. त्यांचा काय विचार आहे ते बघा. त्यांचा पाठींबा घेऊनच परत या.
( स्थळ: तेच. वेळ: दुपारची. महाराज येरझारया घालत आहेत. प्रधान जड पावले टाकत येतो).
महाराज: या. या प्रधानजी. सगळे तयार आहेत न पाठींबा द्यायला?
प्रधान: नाय. आंदोलन क्यान्सल.
महाराज: क्यान्सल? काय झाले?
प्रधान:भांडान.
महाराज: भांडण? कुणाचे? त्यांना सांगा शत्रूला घाबरू नका. मी आहे.
प्रधान: शत्रू? अवो कोन शत्रू? आव आपलीच लोक एकमेकात भांडली.
महाराज: म्हणजे?
प्रधान:एका पेपरवाल्याचे म्हणणे अशे पडले कि मराठी मराठीत वेगवेगळे भाव हवे, पेपरच्या किमती नुसार. तीन रुपयाच्या पेपरचा भाव तोच आनी एक रुपयाच्या पेपरचा भाव तोच, हे बराबर नाय.
महाराज: आणी?
प्रधान:दुसरा म्हणाला आमचा पेपर प्रिंटींग प्रेसमधून थेट रद्दीत जातो म्हणूनशान आम्हाला जास्त भाव हवा. त्यांच्या पेपरची घडी पन मोडलेली नसते. लग्नात आहेरात मिळालेल्या साडीवानी कोराच असतो त्यो.
महाराज: आणि?
प्रधान: तिसरा म्हणाला फकस्त आमच्याच पेपर मध्ये नव्या बातम्या असतात आन एक्बी जाहिरात नसते.
चौथा म्हणाला कि शुद मराठी फकस्त आमच्याच पेपरमंदी.
महाराज: शेवटी काय ठरले?
प्रधान:प्रत्येकाला येग्ला येग्ला भाव हवा. आन तो भाव तुम्ही ठरवावा असे म्हतात. त्यो भाव ठरल्यावर मंग इंग्लिश पेपेरचे पहा आसा सगळ्यांचा हुकुम हाय.
महाराज: मी भाव ठरवायचे? बापरे. हे एक धर्मसंकटच आहे. काय हे. इथे महाराष्ट्र चुकतो. आपसात भांडतात. एकत्र येवून यवनांशी लढायच्या वेळेलाच दुही माजवली जाते. दुर्देव आणि काय?
प्रधान:राजाजी. साद बोलाकी. कॉंग्रेस आन यानशीपी. परवाही तुमी यवन यवन म्हणाला आन लोकांना वाटले बाबासाहेब पुरांद्रेच बोलत्यात. उगा पुढच्या टायमाला गणपतीत भाषणाला बोल्व्त्याल.
महाराज: अरे रे. हाही विषय गेला. आता काय? तुम्ही कोठे चालला प्रधानजी?
प्रधान: म्या? घरी चाललो. अन्गोलीला.
महाराज: अंघोळीला? दुपार झाली तरी तुमची अंघोळ झाली नाही?
प्रधान: सकाळच्याला केलती. पुन्यांदा करतो.
महाराज: खामोश. इथे मयत झाली नाही कुणाची. थांबा इथे. नवीन विषय शोधायचा आहे.
प्रधान:आवो म्या त्यासाठीच चाललो हाय. राजाजी तुमच्या इथे टब हाय का टब?
महाराज: टब?
प्रधान: नसेल तर बसवून घ्या. मी बशिव्लाय.
महाराज: टब? तो कशाला?
प्रधान: टब मध्ये बसा आनी सुरेखा सुरेखा म्हणा. कायतरी नवीन सूचल बघा पटदिशी.
(प्रधान जातो. पडदा पडतो)
============
अभिजित अत्रे
================