जर्मन बेकरी आणि माणुसकीचे कलेवर
13 फेब्रुवरी 2010. पुण्याच्या इतिहासातला आणखी एक काळा दिवस. आणखी एक यासाठी म्हणतोय कारण की हा जरी पुण्यावरचा पहिला दहशतवादी हल्ला असला तरी पुण्याने असे खूप आघात पचवले आहेत.
या शहरावर खूप आक्रमणे झाली. प्रत्येकाचे स्वरूप वेगवेगळे होते ईतकेच. 19व्या शतकाच्या सुरवातीस इन्फ्लुयेन्ज़ाच्या साथीने शहरात थैमान घातले आणि नंतर प्लेगच्या साथीत इंग्रजांनी.
शाईस्तेखानं आणि मुघलांचे हल्ले हे त्या काळातील दहशतवादीच हल्ले. पानशेतच्या पुरात वाहून गेलेले संसार पुण्याने पाहिले आणि स्वाइन फ्लूने घेतलेले 185 बळी ही.नारायणराव पेशवे, जोशी अभ्यंकर, राठी यांचे खून पाहिले आणि जनरल वैद्याना आलेले वीरमरण ही पहिले. अहो, फार कशाला, अगदी गाढवाचा नांगर देखील फिरला होता या शहरावर.
पण या सर्वातून पुणे सावरले.
सोन्याचा नांगर फिरवून हिंदवी स्वराज्याची मु-हुर्तमेढ ही याच शहरात रोवली गेली.
सार्वजनिक गणेशोत्सववाची सुरवात इथेच झाली. विद्येचे माहेरघर ही ओळख ही पुण्यानेच निर्माण केली. देशाच्या नेतृत्वाचे वैचारिक अधिष्ठान कायम पुण्याकडेच राहिले. त्यामुळे जर्मन बेकरी वरील हल्ल्याचे दुख: पुणे पचवेल.
पुन्हा नव्या जोमाने उभे राहील. याची मला खात्री आहे.
पण दुख: पचवणे वेगळे आणि दुख: न होणे वेगळे.
गेल्या पाच दिवसात मी जसे माणुसकीचे झरे पहिले तसे कोरडे पाषाण ही पहिले.
हॉस्पिटल बाहेर रक्तदात्यांच्या रांगा पहिल्या आणि चित्रपटगृहाबाहेर सिनेरसिकांच्या.
मुलाच्या प्रेता समोर उन्मळून पडलेले आई वडील पहिले आणि पब्स मधील उचंबळून आलेली गर्दीही.
क्षणाची विश्रांती नं घेता धावाधाव करणारे पोलीस- फायरमन पहिले आणि ड्रम्सच्या कलकलाटावर थिरकणारी तरुणाइ ही पहिली.
गाव दुखा:त आहे हे उमजून ठरलेले सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणारे दाजी पहिले आणि जल्लोष करणारे पाजी ही पहिले.
प्रेतानवरचे हार पहिले आणि व्यालेनटाइनच्या गुलाबांची देवाणघेवाण ही पहिली.
माणुसकीचा गहिवर पहिला अन माणुसकीचे कलेवरहि.
मनावर आघात करणारी अनेक प्रसंग कानावर आले. दिसले. दोन तीनच सांगतो.
आमचा पत्रकार मित्र मिहीर टांकसाळे ससूनच्या डेडहॉउस मध्ये गेला होता. बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या भावा बहिणीचे देह तिथे ठेवलेले होते. आई वडिलांचा आक्रोश चालू होता. तेथील ऑफिसरने मिहिरला अडवले. म्हणाला:
"मी तुम्हाला त्यांना भेटून देतो पण त्या आधी तुम्ही मला त्या गाण्याचा कार्यक्रमाचा पास आणून द्यायची व्यवस्था करा,"
अंगावर काटा आला.
माणूस एवढा कोडगा होऊ शकतो?
प्रसंग दुसरा:
आमच्या ऑफिस समोर पुण्याचे प्रसिद्ध महाविद्यालय आहे. वर सांगितलेल्या प्रसंगातील बहिण याच महाविद्यालयात बी एं च्या वर्गात शिकत होती. तिच्या अकाली निधनाची आणि तिच्या आईच्या शोकाची बातमी सर्व पेपरमध्ये त्यादिवशी पहिल्या पानावर आली होती. ऑफिसला येताना मला महाविद्यालयाच्या दारात मुलींची खूप गर्दी दिसली. मला वाटले कि बहुतेक हि गर्दी श्रद्धाजली सभेसाठीची असावी. माझ्या पत्रकार मैत्रीण स्नेहलला मी त्या मुलींकडे पाठवले. ती सांगत आली "तुम्हाला वाटले होते तसे काही नाही. मुलींच्या वस्तीगृहाकडे जाणारा रस्ता नव्याने केला आहे. त्याच्या उद्घाटनास आमदार XXX येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली आहे,".
हे सर्व स्फोटाच्या तिसरया दिवशी.
सुन्न झालो
प्रसंग तिसरा:
त्याच दिवशी कोरेगाव पार्क मध्ये ( जर्मन बेकरीच्या जवळच) एक श्रद्धाजली सभा होती. आमची स्वाती सभेला गेली होती. तेथील सर्व रहिवासी मेणबत्या घेऊन प्रार्थना म्हणणार होते. बराच वेळ झाला पण ती बातमी कळवत न्हवती म्हणून तिला फोने केला. स्वाती म्हणाली " अजून इथे लोकच आलेले नाहीत. फक्त पंधरा माणसे आहेत. फोटोग्राफरला सांगितले आहे कि फोटो लांबून घेऊ नको. जवळून घे. काहीतरी गर्दी दिसेल हो.,". (तिलाच काळजी होती कि किमान इतरांना कळू नये कि लोक श्रद्धाजली सभेस फिरकले सुद्धा नाहीत.).
या ठिकाण पासून एक फर्लांगावर मोठे चित्रपटगृह आहे. घरी जाताना स्वाती तिथे डोकावली. "माय नेम इज खानं" चा शो हाउसफुल होता!
मनावर चरा उमटवणारे असे खूप प्रसंग सांगता येतील.
माझे सगळे शहर असे वागले असे नाही म्हणत मी.
असे अनेकजण आहेत कि ज्यांचे पोट हातावर आहे. त्यांना भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी रोजच संघर्ष करायला लागतो. या चाकरमान्यांना दुख: करायची हि सवड नाही. त्यांचे वागणे मी समजू शकतो. त्यांच्या बोलण्यात झाल्या प्रसंगाबद्दल हळहळ होती. वागण्यात जल्लोष न्हवता. नजरेत संताप होता...अणि हतबलताही.
पण " अगा काही झालेच नाही" अशा थाटात वावरणारी खूप माणसे दिसली. त्यांचा कोडगेपणा आणि अलिप्तता खूप बोचली. हे लोक मला माझे नाही वाटले. परकीय वाटले. माझ्या शहराशी यांची नाळ जुळलेली नव्हती. पण माझ्या दुर्देवाने त्यांची संख्या मूठभर न्हवती. अपेक्षेपेक्षा खूप खूप मोठी होती. त्यातले कितीतरी लोक पुण्याचेच होते.
एकाला विचारले: " कारे तुम्हे असे कसे?. तुम्हाला दुख: नाही झाले?
त्याने ताम्बेंची कविता ऐकवली: "जन पळभर म्हणतील हाय हाय.... मी जाता राहील कार्य काय?,"
युक्तिवाद मान्य,? त्याने विचारले.
मी युक्तिवाद करण्याच्या मनस्थितीच नव्हतो. नाही तर त्याला सांगितले असते कि मला हि तेच सांगायचे आहे की
" पळभर तरी तू हाय हाय म्हण मग लाग न तुझ्या कार्यास,".
त्याला मी वृत्तपत्रात आलेला एका मुलाच्या आई वडिलांचा फोटो दखवला. त्यांचा फुटबोल खेळणाऱ्या मुलाचे दोन्ही
पाय कापायला लागले होते. तरीही शेवटी मुलगा वाचला नाही. आई वडिल त्याच्या हॉस्टल रूममधे त्याची प्रत्येक
वस्तु कुर्वाळत होते. त्यात त्याला शोधत होते. नाही सापडला.
"ठीक आहे. वाईट गोष्ट झाली. पण मी रडल्याने त्यांचा मुलगा परत येणार आहे का? माझे सोड. फोटा पहा. आई रडते आहे. पण वडील बघ. डोळ्यात पाण्याचा थेंब तरी आहे का? तांबे म्हणतात ना कोणी कुणासाठी थांबत नाही," तो म्हणाला .
खरच फोटोत वडील रडताना दिसत नव्हते. चेहरा करारी होता. डोळ्यात पाणी नव्हते. पण त्यांचे ते स्थिर डोळे शून्यात काहीतरी शोधत होते. त्या डोळ्यांकडे पाहून कळत होते की हा माणूस उद्धव्स्त झाला आहे. फक्त त्या माउली समोर आपली वेदना तो लपवतो आहे. तो न रडणारा करारी बाप आतून किती आक्रंदत असेल याची कल्पनाही करवत नाही.
ताबेंच्या खूप आधी समर्थानी म्हटले आहे:--
" मरे एंक त्याचा --------दुजा शोक वाहे
अकस्मात तोही ---------पुढे जात आहे,".
काही लोकांनी यातले फक्त "अकस्मात पुढे जायचे" आत्मसात केले. पण पुढे जाण्याअगोदर दुजाने शोक वहायाचा असतो हे ते सोयीस्कर रित्या विसरले.
पुर्वी, खेड्यात एकाजरी घरी मृत्यू झाला तरी सगळा गाव सुतक पाळायचा.
“आज गावात चूल पेटली नाही” असे वर्णन केले जायचे.
माझ्याही शहराच्या पोटात अशी खूप खूप माया होती.
ती आज मला कमी झालेली दिसली.
लुप्त झाली असे नाही म्हणणार मी. आहेत.. मदतीला धावणारे शेकडो हात अजून आहेत. अहो, त्यावरच तर हे गाव तरले आहे. पण या वेळेला जल्लोष करणारे ही खूपजण भेटले. अलिप्त आणि स्वय:म्केंद्रित.
त्यांना विनंती आहे.
तुमची चूल बंद ठेवा असे नाही सांगणार मी. रडायला तर मुळीच सांगत नाही. अहो, शेवटी दुख: मनापासून वाटले तर ते खरे. नाही तर तो राजकीय दुख:वटा साप्ताह व्हायचा. इतरांचे दुख: स्वता:चे वाटले असते तर आपण संतपदी पोहोचलो असतो. त्यामुळे तुम्ही नका काही वाटुन घेऊ. तुमची चूलही चालूच ठेवा. जीवनाचा आनंद लूटा.. अगदी जुरूर लूटा.
पण थोडा वेळ थांबा. अहो फार नाही मागत मी.
फक्त थोडा तुमच्या जल्लोषाला आवर घाला.. थोडे थांबा हो प्लिज.
अहो... किमान दहावा तरी होऊ द्यात हो.
=============================================
अभिजित अत्रे
===============================================
5 comments:
स्पर्धेचा धावात माणुसकी विर्घलुन चालली आहे... किमान माणुसकीचा विचार तर करावा लोकांनी ... too good sir
नाही कैवल्याची कळा, मृत्यु सर्वांग सोहळा...!
(क्या बात है सर.... करुण रस ! )
sphot zhala tya divashi kuthetari ek festival suru zhala hota...to chaluch ahe athavada bhar...
very well sir .. u hit the right nerve !
i recall few lines...on human coldness.
Like the dull sand and the blue of deserts,
Both of them unfeeling toward human suffering,
Like the long web of the ocean's billows,
they unfurl themselves with unconcern....!
Post a Comment