Wednesday, February 20, 2019

करपलेलं नंदनवन

आत्मघाताच्या बेलगाम
वा-यावर
स्वार झालेला तुझा अश्व
जेव्हा आदळलास बेसावध रथावर,
तेव्हा दाटून आला
काळोख...
जो पाझरला थेट
नंदनवना पासून माझ्या मातीत...बुलढाण्या पर्यंत
झिरपला सर्वदूर...

कुणाचा दादा,  दादला, दिर...
परतला घरी,  छिन्नविछिन्न अवशेषात,  तिरंग्यात लपेटून...

तुझ्या जनाज्यासाठी
जमलेल्या यारांना,
कदाचित जाणवली नसेल
या चितांची धग..

खरे आहे तूझे
उभा देश कळवळला..
पण कोलमडला नाही,
आणि कोलमडणारही नाही
तो कधीच...

आठवते तुला,
तुझ्या माझ्या पणजोबांचा
दोस्त म्हणाला होता,
गाझियोंमे बू रहेगी
जब तलक इमान कि,
तख्ते लंदन तक चलेगी
तेग हिंदुस्तानकि...

आम्ही तुझ्यात
तो जफ़र शोधतो आहे..
आणि तू मात्र
चालला आहेस
प्रहरोप्रहर गडद होत
जाणा-या अंधाराकडे...

मागे फिर, आत्ताच, लगेच, ताबडतोब...

आणि हो,
पेपरमधे तिचे रडणारे
फोटो  पाहून, 
जश्न मनवणा-या तुझ्या यारांना सांग,
यातून विजयाचा अन्वयार्थ
काढू नका...
कदाचित त्यांना ऐकू येत असेल
आत्ता फक्त आक्रोश,
पण मी पाहिला आहे,
तिच्या  नजरेतला अंगार
जो सहज वितळवू शकतो,
हा बर्फाळ भूभाग...

हो, खरे आहे  तुझे
तिनेही केले आहे प्रेम
या धरतीवरील जन्नतवर,

लग्नानंतर इथेच कुठेतरी
त्याने आणि तिने
घेतल्या होत्या, 
प्रेमाच्या आणाभाका,
तिच्याही पापणीआड आहेत
तीच चिनारची झाडे,
त्याच हसीं वादिंया, आणि
तेच फूरसदचे रातदिन...

पण तिने आता उतरवला आहे
तो साजशृंगार,
तोडून  फेकला आहे
माळलेला गजरा,
आणि केला आहे धारण
त्याचा गणवेश....

तुला वाटत असेल की
तु संपवलेस त्याला..
पण तो संपला नाही रे
तो उगवतोय...

तो उगवतोय तिच्या
वज्रचुडेमंडित रूपातून..
तिची करंगळी पकडून
चालणा-या बाळकृष्णातून...
आणि नांगर बाजूला ठेवून
भरतीस निघालेल्या
शेकडो लक्ष्मणातून...

तो कधीच संपणार नाही
तो उगवत राहील
इथल्या अणूरेणूतून...
अवतरेल अविरत
दिशा-दिशातून
पुन्हा पुन्हा...

अंधाराच्या अवर्तनात
फिरणा-या
तुझ्या यारांना सांग...

मागे फिरा, आत्ताच, लगेच, ताबडतोब..
उद्या कदाचित
खूssप उशीर झाला असेल...

अभिजीत अत्रे
१४/२/२०१९