आठवते तुला?
वाड्यात रंगलेला लपाछपीचा खेळ
कधी कधी जोगेश्वरीचा बोळ ओलांडायचा
तेव्हा येऊन दडायचो गाभारयात, बिनदिक्कत
कधी कधी, सकाळी सकाळी, सगळ्यांच्या नकळत
आज्जी पाठवायची तपकीर आणायला
तेव्हा येता जाता पारोशानेच शिरायचो देवळात
खोबऱ्याचे तुकडे टाकायचो तोंडात, बिनधास्त
वाडा इतिहासजमा झाला
तपकिरीचे दुकान, आणि आज्जीही
तू पण किती बदलास
परवा आलो होतो, ऐन उत्सवात, रात्रीचा
पोराने हट्ट धरला, म्हणून निघालो गर्दीचा
मंदिराच्या खूप अलीकडेच, रस्त्यावर
मोठ्या मोठ्या प्रवेशद्वारांच्या कमानी
हे नवीन, बाकी जुनेच,
तोच गोंधळ व तीच धक्काबुक्की
मी वाट काढत पुढे सरकतो
फोन वाजतो...वडील बोलत होते ...
कुठे आहात? दगडूशेठला
कशाला घेऊन जातोस नातवाला गर्दीत
चुकला, हरवला, काही झाले तर..तर काय?
.. मी हसतो..त्यांचा जन्म गेला या गल्ली बोळात
अति काळजी, मी फोन कट करतो
पोराच्या मनगटावरची पकड मात्र घट्ट होते..
बाबा मंदिरात मूर्तीच नाही
अरे ती समोर, मांडवात हलवतात
एवढी मोठी मूर्ती कशी उचलतात
अरे ती आतून पोकळ असते
बाबा देव पोकळ असतो?
देव नाही रे.. मूर्ती
...............
बाबा तो फुलवाला कुठे बसतो
कोणता फुलवाला?
तो, ज्याने ती बॉम्बची ब्याग ठेऊ दिली नाही.. तो
...(बापरे.. पोरगा पेपर वाचतो कि काय?)
...फालतू प्रश्न विचारू नकोस
समोर बघ, तो बघ रंगीबेरंगी महाल
.........
त्या मचाणावर सोल्जर का आहेत मशीनगन घेऊन?
बाप्पाचे संरक्षण करायला
पण बाप्पा आपले रक्षण करतो ना
मग पोलीस कसे करणार त्याचे रक्षण?
...
पोरगा मशीनगनकडे एकटक पाहतोय
मला लोकांच्या हातातला नारळ हँण्डग्रेनेड भासतोय
हसू नकोस, ....तुझे बरे आहे बाप्पा
तुझा विमा काढलाय पन्नास कोटींचा
आम्हा भक्तांचे काय?
(माणसाने किती प्रगती केली बघ बाप्पा
देवाचा पण विमा काढू शकतो माणूस)
.....नाही रे..मी अजिबात घाबरलेलो नाही
काहीतरीच काय.. आणि तू असताना कसली भीती
त्यात हा माझ्याच घराचा परिसर
भीती नाही रे .. खरे सांगू.. मी वैतागलोय
पोलीस शिट्ट्या वाजवतोय, कंटाळलेला कार्यकर्ता
पुढे चला, पुढे चला, चा घोष करतोय....
तू समोर दिसतोयस, कोणीतरी जुनी ओळखही देतोय
पण मेटल डिटेक्टरच्या कमानीतून पुढे जावत नाहीए
मी उजवीकडे, लक्ष्मीरस्त्यावर वळतोय
.. ..
इथे बरेच शांत आहे ..विशेष गर्दीही नाही
अगदी आम्हा तिघांच्या चालण्याचा
आवाजही ऐकू येतोय
माझ्या चपलेचा, पोराच्या बुटाचा
आणि हळू हळू सरपटणाऱ्या
दहशतीचा
......
होईल होईल
या सोबतीचीही सवय होईल
पुढल्या वर्षी नक्की येईन!
==========
अभिजित अत्रे