Saturday, April 24, 2010

सूर्य

खोल खोल दरीतील काताळावर
बसले होते काही कवि काजवे
चर्चा करीत होते मिळालेल्या टाळ्यांची
आणि न मिळालेल्या राज्य पुरस्कारांची

मीही झालो त्यात सामील
आणखी एक काजवा होऊन
आमच्यात झाले काही गट
पडले काही वैचारिक तट

माझ्या गटातल्या एकाला
दुसरा "'यमक्या" म्हणाला
आणि सुरु झाले भांडण
एक न संपणारे कांडण

अंधार बुडल्या दरीत
जेव्हा मिटले आमचे प्रकाश
त्येव्हा तो आला
त्याच्या सात घोड्यांवरून उतरून
मनुष्यरुपात.

"तुम्ही कुठे होता?
आमचे प्रकाश संपले ना?," आम्ही
"मी इथेच होतो मित्रानो
तुम्ही माझे बोट सोडलेत" तो म्हणाला.

"भांडू नका बाळानो
अजून दरी पार करायची आहे
मग डोंगर, मग हिमालय
मग जमले तर आकाश
खूप सूर्य आहेत तिथे
माझ्याहून ही मोठे
तुमच्या देहू आळंदी इतके जुने
थोडे त्यांच्याकडे पहायाला शिका
इतके नका आत्ममग्न होऊ,"

एवढे सांगून तो उठला
एक अग्निगोल होउन् झेपावला
त्याचा रथ आकाशगंगेवर स्वार होताना
सोनेरी तेजाचे काही पुंजके सांडले दरीत
आणि उडाली एक झुंबड
ते कवडसे गोळा करण्यासाठी
पुन्हा प्रकाशित होण्यासाठी
स्वयंप्रकाशित म्हणून मिरवण्यासाठी

त्यातलेच काही सूर्यकिरण वेचताना
मी सहज वर पहिले
माझ्या काजव्याच्या डोळ्यांनी
तेव्हा त्त्या तप्त लोहगोलावर
कोरलेली दिसली
पाच अक्षरे
कु ... सु.. ... मा.... ग्र.... ज
=============
अभिजित अत्रे
================

Thursday, April 1, 2010

डोह

मित्रानो,
तुमचा प्रेमभंग झाला नसेल कदाचित पण आयुष्यात एका रस्त्याने जायचे ठरवल्यावर दुसरा रस्ता चालायचे राहून जाणे कुणाला टळलय? आणि, स्वप्ने तरी किती? प्रत्येक मुठीत येतेच असे नाही. गालिबची मला खूप आवडणारी एक कविता आहे. "हजारो ख्वाइशे है ऐसी कि हर ख्वाईश पे दम निकले". बघा तुमच्याही मनात असाच एक डोह आहे का? नसेल तर एप्रिल फूल समजा!
=================
डोह
एक डोह आहे
माझ्या मनात खोल खोल दडलेला
आमावस्य गूढतेत रुतलेला
पाझरणाऱ्या अंधाराने भरलेला
काळाच्या पडद्याआड पुरलेला

तसा मी तिथे फारसा नाही जात
नाही आता बसत
पुर्वसंचीताचे ओझे कुरवाळत
रमलेला असतो संसारात
आणि गर्दीतच असतो सतत

पण कधी कधी
जेव्हा खूप खूप एकटा असतो
तेव्हा जाऊन बसतो
त्या डोहाच्या काठावर
अलिप्ततेच्या काठीने सारतो दूर
साचलेले काळाचे दाट शेवाळे
आणि पाहतो आत वाकून

पायथ्याशी पडलेली असतात
काही चुरगळलेली स्वप्ने
काही न चाललेल्या वाटा

काही दुरावलेले चेहरे
काही पोस्ट न केलेली पत्र
काही पचवलेले नाकार
काही टाळलेले स्वीकार
काही अर्धवट टाकलेले डाव

काही हुकलेल्या संधी
काही हरवलेली नाती
काही गिळलेले अपमान

काही उपकारकर्त्याचे राहून गेलेले मानायचे आभार
कुणालातरी द्यायाच्या राहिलेल्या काही शिव्या
आणि हो, एकाचा न केलेला खूनसुद्धा!

बेल वाजते
अन मी घाईघाई ने उठतो
पुन्हा पसरवतो
काळाचे ते घट्ट शेवाळे
डोहावर.

दरवाजात उभा असतो मित्र
"उशीर केलास दार उघडायला?"
मी लपवत नाही
सांगतो त्याला माझ्या
डोहाची कथा

तो हसतो. म्हणतो:
माझ्याही मनात आहे असाच एक डोह
हातातून निसटलेल्या क्षणांनी भरलेला

मी ही मांडतो कधीतरी
होकार- नाकारांचा ताळेबंद
करतो बेरीज वजाबाकी
न चालेल्या वाटांनी गेलो असतो
तर कदाचित होऊ शकलेल्या फायद्याची
आणि तसेच न झालेल्या तोट्याची.

असाच एक डोह असेल
खोल खोल दडलेला
माझ्या, तुझ्या, सर्वांच्या
अगदी
तिच्याही मनात

जगत असतात माणसे
घेऊन एक जखम भळाळणारी
इतरांना न दिसणारी
ज्याची त्याला जाणवणारी
वाहत असते ती अखंड
काळाच्या जाड कातडीखाली
वेदनाहीन होऊन
अंधाऱ्या डोहात विरघळून
तसे आपण सारेच
अश्वथामा!.
=======
अभिजित अत्रे
===========