Saturday, October 5, 2024

जबाब

जबाब
********
पापणीआड अश्रू कोणी कोंडले
ओठांवर शब्द कोणी कोंडले

कसे पाखरांनी आता मुक्त गावे
पिंजऱ्यात आकाश कोणी कोंडले

घाट रस्त्यावर आज शुकशुकाट कसा
झाडांचे टाहो, कुणी कोंडले

सभास्थळी का हा कुबट वास आहे
पश्चिमेच्या वाऱ्याला कोणी कोंडले

अजून विखाराला का धार आहे
गहिवरले श्वास कोणी कोंडले

होत नाही आता तो मिरवणुकीत सामील
महापुरूषांना जातीत कोणी कोंडले

वाढत्या तमाला कसा बोल लावू
स्वतःला तळघरात, कोणी कोंडले

त्याने का संपविली बांधावर यात्रा
लाल बहादुरांच्या हाकेला कोणी कोंडले

विद्वानांच्या गल्लीत हा लिलाव कसला
कमलदलात भुंग्यांना कोणी कोंडले

चिमुरडीच्या डोळ्यात भीती का आहे
अशोकवनात सीतेला पुन्हा कोणी कोंडले

सांगा त्या माऊलीला काय जबाब देऊ
विश्वाचे आर्त कोणी कोंडले
*********************
©️ अभिजीत अत्रे. पुणे
०५ ओक्टोबर २०२४
**********************

Tuesday, October 1, 2024

 फुकट

*******
फुकट, फुकट, फुकट  
फुकट, फुकट, फुकट  

साडीवर ब्लाउज फुकट  
शर्टवर शर्ट फुकट  
मान्सून सेलच्या धमाक्यात
पाऊस सुद्धा, चक्क फुकट  

फुकट, फुकट, फुकट  

भाजीवर कढीपत्ता  फुकट
नेस कॉफीवर कप  फुकट
सोन्याच्या दागिन्यांवर
चांदीचं नाणं, चक्क फुकट
फुकट, फुकट, फुकट  

फुटपाथवर ओपन जिम  फुकट
झोपडपट्टीत नळ फुकट
नगरसेवकाच्या सौजन्याने
संकुलातील बाकसुद्धा, चक्क फुकट

फुकट, फुकट, फुकट  

गणपतीत भावसरगम  फुकट  
हेमा मालिनीचा नाच फुकट  
दहीहंडी मंडळामुळे भर चौकात
माधुरीचे दर्शनं, चक्क फुकट  

फुकट, फुकट, फुकट  

पुढाऱ्याला पेन्शन फुकट
बुडवणाऱ्याला कर्ज फुकट
करदात्याच्या ढुंगणावर एक
सणसणीत लाथ, चक्क फुकट

फुकट, फुकट, फुकट

अमुक ठिकाणी वीज फुकट  
तमुक ठिकाणी शिक्षण फुकट  
जनतेच्या तिजोरीतून ओटी भरून
बहिणीचे मत, चक्क फुकट

फुकट, फुकट, फुकट  

मिळवायचंय सगळंच फुकट  
प्रेम फुकट, आशिर्वाद फुकट
आमदारांच्या कृपेने 
आईची काशीयात्रा ही, चक्क फुकट

फुकट, फुकट, फुकट  

दिवसा साहेबां कडून ग्यान फुकट
झोपल्यावर स्वप्नं फुकट
नाल सापडला आहे रात्री
मिळणार अबलख घोडा, चक्क फुकट

फुकट, फुकट, फुकट  

हे फुकट, अन् ते फुकट
शरीराबरोबर साला आत्मा फुकट
फुकट्यांच्या या दुनियादारीत
गेले की आयुष्य, चक्क फुकट.

फुकट  फुकट  फुकट  
फुकट  फुकट  फुकट
------------------------------------------
©️ अभिजीत अत्रे. पुणे
२८ सप्टेंबर २०२४
**********

Friday, October 14, 2022

मावळ्यांचे मनोगत

काय ती झाडी

काय ती वाडी 

रंगी रंगले गडी 

काझीरंगा || १ ||


भगव्याची आण 

अन् धनुष्यबाण 

आमचे पंचप्राण 

गोठलेले || २ ||


का पेटवावी कान्हा  

मशाल पुन्हा 

मायेचा पान्हा 

आटलेला || ३ ||


ही साहेबांची 

ही वारसांची 

मराठी माणसाची 

कोणती रे || ४ ||


सोने लुटू विचारांचे 

कोणत्या दसऱ्याचे

पाप सीमोल्लंघनाचे

आमच्याच माथी || ५ ||


दुभंगली नाती

दुभंगली पाती 

कोण सेनापती

सह्याद्रीस || ६ ||


बीजे रुजणार 

दुहीची माळावर

कसे फुटणार 

गवतास भाले || ७ ||

******

 अभिजीत अत्रे, पुणे 

१३ ऑक्टोबर २०२२

 (ता. क.: वसंत कानेटकर लिखित 'जिथे गवतास भाले फुटतात ' या नाटकावर आधारित, सध्याच्या राजकीय घडामोडींशी कोणताही संबंध नाही.)

Monday, September 28, 2020

अक्कलकोट

 अक्कलकोट

--------------------

आसक्तीच्या पलीकडे

धुक्यात हरवलेल्या वाटेवर 

लागते त्याचे गाव,

हे कळतं, पण वळत नाही.. 


गाठतो नवे नवे  गाभारे, ठेचकाळतो उंबरठ्यावर, 

मूर्तीचे दर्शन होते, 

पण भेट होत नाही, 

प्रदक्षिणेच्या चकव्यातच थिजतात पाय

कळस दिसतो, 

पण दिशा सापडत नाही

काय चुकतं, तेच कळत नाही 


घंटा वाजवून वर्दी देतो तो हमखास त्याच्या आगमनाची

नंदीच्या दोन कानांच्या बरोबर 

मध्ये टेकवतो हनुवटी, 

आणि सरळ रेषेत पाहतो शिवलिंगाकडे, वाईला.


मनातली रुखरुख प्रथम उघड करतो मूषकाच्या कानात,  गणपतीपुळ्याला. 

जपतो चालताना विष्णू मंदिरात, पाय पडायला नको कासवावर

(साली उगाच नसती आफत) 


परवडत असताना 

उतरतो भक्तनिवासात, स्वरूपानंदाच्या पावसला. 

आवडीने भुरकतो आमटी भाताचा महाप्रसाद,

घटकाभर ध्यानस्थही  

होतो गोंदवल्याला तळघरात,

थेट समाधीला खेटून


मान्य, 

प्रत्येकवेळी सगळं चोख 

होतंच असं नाही

एकदा शेगांवी, महाराजांच्या पादुकांवर डोके टेकवताना, 

त्याला आठवलेल्या त्याच्या चपला, स्टँड बाहेर काढलेल्या

केवढा शरमला होता 

तेव्हा तो, चरफडला होता स्वतःवर

चपलांची आसक्ती सुटत नाही, संसाराची काय सुटणार


असाच एकदा कडेलोट  

झाला होता दापोलीला

रात्री चिकन आणि कोंबडीवडे खाताना,‌जेव्हा बायको म्हणाली‌ 

"आज चतुर्थी..

सकाळी आंजर्ल्याला गणपतीचं दर्शन घेतलं होतं". 


आणि कसनुसा झाला होता जेव्हा वाडीला त्याने केला होता त्रागा, 

बासुंदीची बंद दुकानं बघून, वरमला होता नंतर

"घरी काय दूध आटवता येत नाही का?"..ऐकल्यावर. 


पण हे कधीतरी, क्वचितच.

( देवाने पण थोडे समजून घ्यायला हवे ना राव.. ) 


एरवी तो चोख वागतो,

बालाजीचे कापूर वासाचे 

बुंदीचे लाडू, आठवणीने 

वाटतो सर्वांना कार्यालयात


रात्रभर उभा राहतो 

धक्के खात रेल्वेत,

पण तीन दिवसात 

पिठापूर करूनच परततो


देणगी देतो नियमित अन्नछत्रास

आणि जपून ठेवतो, 

अभिषेकाच्या

धुरकटलेल्या पावत्या, 

दुमडलेल्या अंगाऱ्यासकट


एकदा एका गुरुंचे 

पाय धरून पहिले त्याने,  

धुक्यातील वाट नाही दिसली, चिखल दिसला तळव्याखाली


असाच उदास बसला होता

त्या दिवशी दुपारी

धांडोळा घेत,हातातून निसटलेल्या संचिताचा

स्वतःलाच विचारत टोकदार प्रश्न.


तेव्हा आज्जी घेऊन आली पुढ्यात, 

पोस्टाने आलेला लिफाफा


 हू....

रांजणगावच्या अभिषेकाची पोचपावती,

गेल्या रविवारच्या त्याच्या 

नगर ट्रिपचे प्रमाणपत्र

चार खडीसाखरेचे दाणे, 

पाकिटावर प्लास्टिक मध्ये स्टेपल केलेले


ते  काढत ती म्हणाली, 

यांना देऊन येते

"परवा तासभर बसले होते,  महागणपतीच्या आणि स्वामींच्या फोटो पुढे, 

तुझ्यामुळे त्यांचा नमस्कार पोचला रे, देवापाशी". 


खरं, खोटं.. देवच जाणे

पण त्याला भरून येत

डोळे पुसत तो दोस्ताला 

फोन लावतो


"संज्या.. 

या शनिवारी साडेपाचला स्टार्टर मारतोय गाडीला, तयार रहा.

या वीकएन्डला..अक्कलकोट बरं का.... 

अक्कलकोट".

 ==================

अभिजीत अत्रे २८/०९/२०२०

Wednesday, February 20, 2019

करपलेलं नंदनवन

आत्मघाताच्या बेलगाम
वा-यावर
स्वार झालेला तुझा अश्व
जेव्हा आदळलास बेसावध रथावर,
तेव्हा दाटून आला
काळोख...
जो पाझरला थेट
नंदनवना पासून माझ्या मातीत...बुलढाण्या पर्यंत
झिरपला सर्वदूर...

कुणाचा दादा,  दादला, दिर...
परतला घरी,  छिन्नविछिन्न अवशेषात,  तिरंग्यात लपेटून...

तुझ्या जनाज्यासाठी
जमलेल्या यारांना,
कदाचित जाणवली नसेल
या चितांची धग..

खरे आहे तूझे
उभा देश कळवळला..
पण कोलमडला नाही,
आणि कोलमडणारही नाही
तो कधीच...

आठवते तुला,
तुझ्या माझ्या पणजोबांचा
दोस्त म्हणाला होता,
गाझियोंमे बू रहेगी
जब तलक इमान कि,
तख्ते लंदन तक चलेगी
तेग हिंदुस्तानकि...

आम्ही तुझ्यात
तो जफ़र शोधतो आहे..
आणि तू मात्र
चालला आहेस
प्रहरोप्रहर गडद होत
जाणा-या अंधाराकडे...

मागे फिर, आत्ताच, लगेच, ताबडतोब...

आणि हो,
पेपरमधे तिचे रडणारे
फोटो  पाहून, 
जश्न मनवणा-या तुझ्या यारांना सांग,
यातून विजयाचा अन्वयार्थ
काढू नका...
कदाचित त्यांना ऐकू येत असेल
आत्ता फक्त आक्रोश,
पण मी पाहिला आहे,
तिच्या  नजरेतला अंगार
जो सहज वितळवू शकतो,
हा बर्फाळ भूभाग...

हो, खरे आहे  तुझे
तिनेही केले आहे प्रेम
या धरतीवरील जन्नतवर,

लग्नानंतर इथेच कुठेतरी
त्याने आणि तिने
घेतल्या होत्या, 
प्रेमाच्या आणाभाका,
तिच्याही पापणीआड आहेत
तीच चिनारची झाडे,
त्याच हसीं वादिंया, आणि
तेच फूरसदचे रातदिन...

पण तिने आता उतरवला आहे
तो साजशृंगार,
तोडून  फेकला आहे
माळलेला गजरा,
आणि केला आहे धारण
त्याचा गणवेश....

तुला वाटत असेल की
तु संपवलेस त्याला..
पण तो संपला नाही रे
तो उगवतोय...

तो उगवतोय तिच्या
वज्रचुडेमंडित रूपातून..
तिची करंगळी पकडून
चालणा-या बाळकृष्णातून...
आणि नांगर बाजूला ठेवून
भरतीस निघालेल्या
शेकडो लक्ष्मणातून...

तो कधीच संपणार नाही
तो उगवत राहील
इथल्या अणूरेणूतून...
अवतरेल अविरत
दिशा-दिशातून
पुन्हा पुन्हा...

अंधाराच्या अवर्तनात
फिरणा-या
तुझ्या यारांना सांग...

मागे फिरा, आत्ताच, लगेच, ताबडतोब..
उद्या कदाचित
खूssप उशीर झाला असेल...

अभिजीत अत्रे
१४/२/२०१९

Tuesday, September 4, 2018

नटसम्राट टाईमपास

नटसम्राट टाईमपास/© अभिजीत अत्रे/ पुणे/ ४/९/२०१८

To eat or not to eat between meals that is the question...

दोन वेळाच जेवाव की दर दोन तासाने जेवाव हा एकच सवाल आहे

करीनाची मधाळ झिरो फिगर आठवत चराव
दर दोन तासांंनी लाचार डूकरा सारखे, का
नागपुरच्या जिचकरांच्या पदव्या स्मरुन मारावा
अडवा हात, दिवसांतून दोनदाच
आणि एकदमच पाडावा फडशा सगळ्याचा
बिस्कीटांंचा, प्याटिसचा आणि पोळीभाजीचा
५५ मिनिटे संपण्याआधी भात असा चापावा
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..

पण मग त्या
निद्रेतही ईंन्शूलीन पाझरु लागले तर?
ग्लूक्यागाँन बाहेर पडलाच नाही तर?
तर…तर…इथेच मेख आहे, इथेच
ईंन्शूलीनसारखी ग्लूक्यागाँनची ईंजेंक्शन मिळत नाहीत
म्हणुन आम्ही सहन करतो ही ऊपासमार
सहन करतो गाळलेले ताक, काळ्या चहाच्याच कपात
बेशरमपणे सारतो प्रसादाचे पेढे पँन्टच्या खिशात
आणि तरीही हा गोपाळकाला जेवताना, गळून पडतो घास
कुणीतरी जेव्हा बाचकवते "अब तक छप्पन्न" म्हणत

आणि अखेर सहापुडी डब्यांंचा  कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेन पुन्हा 
करीनाच्याच दारात
तोडतो लचके दर दोन तासांनी, कोवळ्या सफरचंदाचे
मध्यरात्री दचकून जाग आली की स्वःताच्याच घरात
चोरुन खातो चार बदाम आणि तिन मनूका, अंधारात

अहो डायटिशीयन्स, तुम्ही ईतके कठोर का झालात?
एका बाजुला दिवेकर तूम्ही मेट्याबाँलीझम स्लो
होण्याची रिस्क सांगता आणि दुस-या बाजुला 
दिक्षीत तुम्ही ग्लूक्यागाँनची भीती घालता

हे आमच्या पोटाच्या विधात्यांनो
तुम्ही तुमच्यात काही सु्वर्णमध्य सांधू शकाल का?
दर दोन तासांनी ५५ मिनिटे जेवलेले चालेल का?
किंवा दर ५५ मिनिटांंनतर दोन वेळा जेवावे का?
का?..का?...
फेकून देऊ सर्व ताट वाट्या आणि सहा पुडाचे डबे 
ऊकिरड्यावर, आणि टोचून घेऊ कायमचे 
एक सलाईन
पण नको.. नकोच ते
सलाईन दर दोन तासाने लावावे का दिवसातून दोनदा 
हा नवाच सवाल ऊभा राहील

त्या पेक्षा... 
हे दिवाकरा, तू  दिक्षीतांना दिक्षा दे
हे जग्ग़ननाथा, तू थोडी ऋजुता दाखव
नाही तर...
पोटावरील विस्कटलेल्या वळ्या घेउन
आम्ही ढेरपोट्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? 
कोणाच्या पायावर ? कोणाच्या ? 
कोणाच्या???
.......© अभिजीत अत्रे/ पुणे/ ४/९/२०१८

Friday, June 7, 2013

दहावी नापास झालेल्यांसाठी

जगण्याला बोल लावावा
एवढा वार खोल नाही
मरणाचा विचार करावा
एवढे परीक्षेचे मोल नाही

शून्य टक्के शंभर टक्के
सब घोडे बारा टक्के
आयुष्याला लगाम घालावा
असा कोणताच निकाल नाही

आई बोलली बाबा बोलले
भाऊ बहीण असतील चिडले
पण तुझ्याशिवाय कुणासाठी
त्यांच्या आतड्यात ओंल नाही

तुझे प्रयत्न कमी पडले 
त्यात  इतके काय बिघडले ?
झोळी तुझी रितीच ठेवायला 
देव  काही  कंगाल  नाही 


जीवन हीच एक मोठी शाळा
श्रमाने फुलतो इथला मळा 
प्रगतीपुस्तकावर इथल्या
रंग घामाचा लाल नाही

मार्कशिटची ती काय किमंत? 
कागदात  मोजता येत नाही हिमंत
मुठी वळवून दाखव जगाला 
आयुष्य तुझे फोल नाही

जगण्याला बोल लावावा
एवढा वार खोल नाही…
========== 
अभिजित अत्रे

Saturday, January 19, 2013

प्रिय सुनीता,

प्रिय सुनीता,
तू खूप खूप दूर होतीस तेव्हा, हो बरोबर, तेंव्हाच
राजधानीत एक घृणास्पद घटना घडली
कदाचित तुझ्या वाचनात ती आता आली असेल
किवां नसेलही, महिना झाला आता त्याला
तेव्हापासून एक  उबग आणणारी चढाओढ सुरु आहे
तुला सुरक्षित ठेवण्याची

प्रशासनाने विडा उचलला आहे 
तुझ्या भोवती नव्या नव्या लक्ष्मणरेषा आखण्याचा
महापालिकेनीही घेतले आहे कंत्राट 
तुला जूडो-कराटे  शिकवायचे
परवा राजकीय पक्षाच्या महिला आघाड्यांनी
तिळगुळा सवे  तिखटाच्या पुड्या लुटल्या
संक्रांतीला, आणि
पोलीस कमिशनर स्वतः जातीनी वाटत आहेत
सहा इंचाहून कमी लांबीच्या सुऱ्या आणि कात्र्या
अगदी मोफत

चंद्रकळेच्या गाठीला असू दे
एखादा पेपर स्प्रे 
थोडे अवघडल्यासारखे होईल
पण स्प्रे बांधलेला पदर घट्ट ठेव
एकले नाहीस का? काय म्हणतात
औरंगाबादचे  न्यायमूर्ती आणि कुलगुरू
टाळी एका हाताने वाजत नाही, बाई

ज्यांच्या वाणीला तपश्चर्येचे अधिष्ठान नसते 
ते ऋषीं शाप देण्याचे सामर्थ्य  गमावून बसतात
म्हणून ते तुलाच मंत्र म्हणायला सांगत आहेत
पण तरीही लक्ष दे जरा त्यांच्याकडे 
तेवढा एक मंत्र पाठ कर
समोरच्याला इंपोXX करणारा
मोठ्याने सराव कर म्हणण्याचा
बावळटा सारखे तोंडातल्या तोंडात पुटपुटलीस
तर इफेक्ट नाही होत जपाचा
दातखीळ बसली असेल तरीही 
आठवायलाच हवे तुला
कोणाला कोणत्या नावाने बोलवायचे ते
भाऊ, दादा, काका, मामा
असे कितीतरी सोपे सोपे शब्द आहेत
तू एखादा सॉफ्ट स्किल कोर्स
का नाही करत हे शब्द शिकण्याचा?

नाही नाही
सरकारने तुझी जबाबदारी नाकारलेली नाही
गृह खाते स्वस्थ बसलेले नाही
परवाच मंत्रालयाने डेल कार्नेजी बरोबर करार केलाय
कॉपी आत्ताच बुक कर, ऑन लाईन
नवे पुस्तक लिहून देणार आहे तो
हाऊ टू विन स्टॉकर एण्ड इनफ्लूंस रेपिस्ट 

एक राहिलेच,
तुझ्या मोबाईलवर हे सॉफ्टवेयर डाउनलोड कर
तुझा ठावठिकाणा सांगणारे
आणि हो
उगाच गोंधळून जाऊ नकोस
स्प्रे, मोबाईल, मंत्र, कात्री, तिखट, कराटे 
यातले काय काय
कधी कधी
कसे कसे वापरायचे
शिक जरा मल्टीटास्किंग करायला

सुनीता
या देशात प्रत्येक गोष्टींचे मार्केटिंग होते
तुझे तर होणारच
ते बघ ते
नीतिमत्तेचे घाऊक ठेकेदार
ते रोज नवे नवे फर्मान सोडत आहेत
आणि पळी पळीने पाजू  पहात आहेत तुला
आपल्या प्राचीन संस्कृतीचे बोधामृत
मला गंमत वाटते कधी कधी
कोणती भारतीय संस्कृती?
आसुर्यस्पर्शा स्त्रीचा उदोउदो करून
तुला घरात कोंडून ठेवणारी?
की सतीची मंदिरे बांधणारी?
जुगारात बायकोला पणास लावणारी?
की गर्भवतीस रानात सोडणारी?

मान्य
याच संस्कृतीत जन्मास आला
रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडणारा राजा
गार्गी मैत्रयीचे गुणगान गाणारे एक यूग पहिले
याच संस्कृतीने
आणि इथेच घोड्यावर स्वार होऊन
लढली होती राणी लक्ष्मिबाई
ताराबाई आणि अहिल्यादेवी
पण हेच अंतिम सत्य नाही
आणि तू ते खास जाणतेस
खळ्यात, मळ्यात, शेतात,
चौकात, घरात, दारात
सर्वत्र
नुसत्या  नजरेने वस्त्र फेडणारे दुशा:सन
याचा संस्कृतीत घाऊकपणे  उभे राहिलेले
तू पहिले आहेस, वर्षानुवर्षे 

या कुबड आलेल्या संस्कृतीची
बासरी वाजवणाऱ्या कृष्णांनी
देवळात सोडलेल्या  मुरळीवर
पितांबर पांघरल्याचे ऐकिवात नाही
सावकाराच्या तिजोरीत बंद झालेल्या
यौवनांला आणि डाकबंगल्यात
घुसमटलेल्या अश्रूंना मुक्त करण्याचे
शाश्वत प्रयत्न कुठे झाले या संस्कृतीत?
काळानरूप ठिकाणे फक्त बदलत गेली
इतकेच, अग
एखाद दुसराच जाणता राजा
बाकी सगळा बेंडबाजा

सुनीता
सनातन मुल्यांची राख चोपडलेले पुजारी
तुझी दिशाभूल करायला टपून आहेत
ते तुला सत्यवान सावित्रीच्या कहाण्या ऐकवतील
आणि वडा भोवतीच्या दोऱ्यात गुरफटून टाकतील
विचार त्यांना
मातृसत्ताक देशात का मारल्या जातात मुली
जन्माला येण्या अगोदरच?
नाही नाही
सगळे  तसेच आहेत असे नाही
पण तरीही, दुर्देवाने
युगान मागून युगे जाऊनही
ही मातृसत्ताक संस्कृती अजून नसा नासात
भिनलेली नाही
सार्वत्रिक चित्र हेच आहे की
मांडवात  दुर्गेची पूजा करणारे
घरात चहाचा कपही विसळत नाहीत

सुनीता
तुलाही युगान युगांची सवय झाली आहे
वामांगीच उभे राहण्याची
आणि म्हणून मला राग आहे
तुला पुरातन काळापासून फसवत आलेल्या
या तत्वज्ञानाचा, ज्याच्या जीवनधारेवर
व्रतवैकल्यचि पुटे चढलीत
मलाही अभिमान आहे भारतीय संस्कृतीचा
पण माझी भारतीय संस्कृती पुराणाच्या 
पानात दडलेली नाही
तिला व्रतवैकल्यचि  कोळीष्टीके
चिकटलेली नाहीत
ती दिसते मला
जंतर मंतरच्या उत्स्फूर्त  स्फुलींगात
तुला समानहक्क मिळवून देणाऱ्या
नव्या कायद्याच्या उद्घोषात
तुझ्या मुक्त हास्यात
आणि हो,
रयाम्पवरच्या तुझ्या
धीट पदन्यासातही

सुनीता
सुनीता विल्यम्स
हो, विल्यम्स, तूच तेव्हा इथे नव्हतीस
आकाशावर स्वार होतीस, तब्बल १२७ दिवस
त्यांना तुझ्या अंतराळ भरारीचे मोल अद्याप कळलेले नाही
तुझ्या सामोसे खाण्याचेच त्यांना जास्त कौतुक
म्हणूनच ते अजून चाकू, कात्र्या आणि तिखटाच्या
पुड्या वाटत बसलेत, स्वत: कुठेही  न बदलता 

क्षितिजांच्या लक्ष्मणरेषा ओलांडून
आकाशगंगेवर तू एक उर्जस्वल चित्र रेखाटलेस
आदिशक्तीच्या अंगभूत सामर्थ्याचे
पण ते पाहण्याची  हिम्मत निर्माण व्हायची आहे
इथल्या म्हाताऱ्या घोडेछाप झापडबंद डोळ्यांत

सुनीता 
तू माझ्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहेस
अशी संस्कृती जी उभी आहे
समतेच्या तीरावर, विज्ञानाचे पंख लेवून 
म्हणून तुला सोपवू पाहतोय मी
माझ्या मुलीचा हात
या नव्या वाटेवर
ती सप्तपदी चालू शकली नाही
तरी चालेल
पण तिचे यान
सप्तऋषींचा तारका पुंज शिवून येईल
चाळणी आडून चंद्र पाहायचे संस्कार
ती विसरली तरी चालेल
ती चंद्रावर पाय रोवायला शिकेल! 

सुनीता
कदाचित मी खूप काही मागतोय
कदाचित मी नको इतका आशावादी आहे
पण काय करू?
मला नव्या अभ्युदयाची आस आहे
कारण माझी मुलगी, माझा श्वास आहे.
============
अभिजित अत्रे

Wednesday, December 26, 2012

वैकुंठातला निवारा

हा वृद्धाश्रम इथे कसा?
स्मशानास खेटून
मृत्यूच्या फलाटावरच्या
एखाद्या वेटिंगरूम सारखा
बोलवा, बोलवा
त्या संस्था चालकांना
नगर नियोजकांना, सिटी इंजिनियरना
.................................
ते बघा
बघा ते, पाय खरडत खरडत
चाललेले आजोबा
ते रोज दिसतात
गेले कित्येक दिवस,
महिने, वृद्धाश्रमातून निघतात
आणि जाऊन बसतात
स्मशानाच्या दरातील बाकावर
'राम नाम सत्य' चा गजर झाला
कि उठून उभे राहतात
एकटक बघत राहतात अंतयात्रेकडे
काहीतरी मोजतात
स्वत:शीच पुटपुटतात
मान हलवतात
पुन्हा बसतात
पुढच्या प्रेतयात्रेची वाट पाहतात  
कातरवेळी जेव्हा दिशा उदास होतात
आणि खांदे पडलेल्या चाकरमानी सावल्या
घोळक्याने घरी सरकत असतात
तेव्हा ते असे एकटे बसलेले बघून
मलाच गलबलून येते
या पेक्षा ते मेलेले बरे, असे वाटते
संध्याछाया दाटून येताना
त्यांनी का दिवस मोजत बसायचे
तेही स्मशानाच्या दारात?
अरे, कोणीतरी हा वृद्धाश्रम
हलवा ना येथून
......................
अहो पत्रकार
काहीतरी गैरसमज होतोय तुमचा
तो म्हातारा चांगला धीट आहे
डोक्यावर थोडा परिणाम झालाय
बायको गेल्या पासून, इतकंच
दोन्ही पोर अमेरिकेत असतात
कोथरूडचा बंगला भाड्याने देऊन
स्व:खुषीने इथे राहतोय
मरणाची भीती नाही त्याला
त्याला हेवा वाटतो
मढ्या भोवतालच्या गर्दीचा
एके काळी मोठा गोतावळा होता
त्याला आता चिंता आहे
त्याची तिरडी उचलायला
चार जण असतील की नाही याची
येडा साला
तो दिवस नाही मोजत स्वतःचे
माणसे मोजतो, अंतयात्रेतील माणसे
...............
तरी पण हा मानसिक छळच त्यांचा
हा वृद्धाश्रम इथे नसता तर
तर.. नाही..नाही..वृद्धाश्रम नव्हे
हे स्मशानच इथे नसते तर
हे स्मशान इथे कसे?
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
माणसाच्या जगण्याच्या
जगण्यासाठीच्या संघर्षाच्या
सर्व खुणा आजूबाजूला
त्यात हे स्मशान कसे?
हे गावाबाहेर हवे
दूर दूर, खूप दूर
या शहराच्या सीमेबाहेर
नगर नियोजकांना
काही अक्कल आहे की नाही?
..................
बरोबर आहे तुमचे
पण हे स्मशान हद्दीबाहेरच होते
वाहत्या नदीकाठावर
गावातल्या कोलाहलापासून दूर
ही वस्ती
ही रक्तपेढी
हे औषधाचे दुकान
हे हॉस्पिटल
स्मशानावरच उभे आहे
पूर्वी इथे सगळीकडे स्मशानच होते
आम्ही तरी काय करणार
शहरच विस्तारत गेले
स्मशानास येउन भिडले
कसा थोपवायचा हा विकास?
हे फक्त या शहरातच घडतंय
असेही नाही, सर्वत्र हीच परिस्थिती
आता अपरिहार्य आहे
शहर आणि स्मशाना मधील
हद्दी पुसल्या जाणे
=================
अभिजित अत्रे

Friday, December 14, 2012

गझल:-- ग्यांगवॉर

प्रेमावर अनेकांनी खूप गझल लिहिल्या आहेत. दोस्त म्हणाला तू  एखाद्या रुक्ष विषयावर-- पुण्यात , पिंपरीत, मुंबईत होणाऱ्या टोळीयुद्ध, मारामारी, इत्यादी.. इत्यादी विषयांवर -- गझल लिही. त्याच्यासाठी.... 
==============================
गंजून गेले भाले, म्यान तलवार झाली
जरीपटके झाले ओले, आज कोयत्यास धार झाली

बूरूज ढासळून पडले, तोफ आता गार झाली
दगडी चाळीत जे दडले, त्यांचीच चर्चा चिकार झाली

पुस्तकात  लपवलेल्या  पिस्तूलाची, कहाणी आता बेकार झाली
काल मावळात गावठी कट्ट्यांची, विक्री बेसूमार झाली

ही वाट काळोखाची, जिंदगी जूगार झाली
ही न युद्धे वीरांची, गल्लीत शिकार झाली

संगे कोणी ना आला, गर्दी हुशार झाली
थोडा अंधार काय झाला, सावलीही पसार झाली

या शहरातील पांडवांची, वस्ती का लाचार झाली?
इथे शमीच्या झाडांची, कत्तल फार  झाली  
==========
अभिजित अत्रे

Monday, December 3, 2012

नकार

कडेलोटाचे फर्मान निघाले तेव्हाही
शाबूत होते माझ्या बेसावध डोळ्यात
एक इंद्रधनुष्य, त्याच्या सप्तछटांनसकट
आता हे रंगहीन अस्तित्व कोसळत आहे
एका तीव्र उतारावरून, खोल खोल
तळ नसलेल्या काळोख्या दरीत
एखाद्या उंच पर्वताच्या शिखरावरून
निसटलेल्या दिशाहीन पत्थरा प्रमाणे
आता अटळ आहे
ठिकऱ्या होऊन विखरून पडणे
पण
अजूनही तुझ्या शब्दांवरचा माझा विश्वास
तसूभरही कमी झालेला नाही
आठवते?, पाठ वळवून निघताना
तू म्हणाली होतीस की तसे
माझे काही बिघडणार नाही फारसे
तुझ्या नकाराने 
==========
अभिजित अत्रे

Monday, November 5, 2012

एका गुंठा मंत्र्याची कैफ़ियत

भिंतीला ओल आली की
बुरशी धरते, पोपडे पडतात
मोड येत नाहीत, मातीसारखे
तरीही परवानगी दिलीत
एन.ए. ला, गुंठेवारीला
धरणीशी जोडलेली नाळ
अशी एका फटक्यात तोडलीत?
विचारले एकदा पत्रकारांनी मंत्र्यांना, खाजगीत
तेव्हा ते हसले, म्हणाले, भलेबहाद्दर
आता तुम्ही जाब विचारणार आम्हाला?
आमच्या सगळ्याच पिढ्या बरबाद झाल्या की
शेतीच करता करता, तेव्हा कुठे होता तूम्ही?
आम्हीही लहानपणापासून एकत आलो
भारत एक कृषी प्रधान देश आहे
पण कृषी करणारा कधीच प्रधान झाला नाही
फक्त आज्या - पणज्याच्या हातावरच्या
कमनशिबी रेषाच उमटत राहिल्या अवजारांवर
आयुष्य सलत राहिले पायात रुतलेल्या
बांधावरच्या बाभळीच्या काट्या सारखे
कणसात कधी दाणे भरलेच नाहीत असे नाही
पण जास्त करून दारिद्र्यच पिकले
कॉंग्रेसच्या गवतासारखे, वर्षानु वर्षे
आणि पिढ्यानां सवय झाली
अंधाराने घर सारवायची
अशी सवय मोडणे खूप कठीण
तुमच्यापेक्षा जास्त आमचा बाप चिडला होता
दोन दिवस जेवला नाही, बोलला नाही
त्याला जबरदस्तीने उचलून
इथे या फ्ल्याट मध्ये थांबवले
आता त्यालाही कळतय
तळ बुडालेल्या विहिरीतून पाणी शेंदण्यापेक्षा
खूप सोपे असते फ्लशचे बटण दाबणे
निर्णय घेताना माझेही  डोळे  भरून  आले  होते
पण काळी आईच कंटाळली होती
म्हणाली, असे अर्धवट भिजून
कुणाचेच कल्याण होत नाही
एकदाच काय ते
सिमेंटने न्हाऊ माखू घाल
बळी राजाचे राज्य नाही आले या देशात
गुंठामंत्र्यांचे तरी येऊ दे!
================
अभिजित अत्रे

Friday, October 19, 2012

मर्जर

आदेशाप्रमाणे मंत्र्यांच्या
अठ्ठावीस गावे शहराच्या
हद्दीत समाविष्ट करण्याच्या
प्रस्तावावर सही करून
विश्लेषणाचे तक्ते डकवून
पाणी पुरवठ्याचे गाजर दाखवून
अनधिकृत बांधकामांची भीती घालून
मेगासिटीची झालर लावून
आणि
सिग्नेचरचे दोन पेग रिचवून
जरा उशीराच रात्री घरी
जेव्हा परत आला टाऊनप्लॅनर

तेंव्हा त्याची बायको
मुलाला झोपवता झोपवता
मांडीवर डोके थोपटता थोपटता
एक गोष्ट सांगत असते
ईसापनीतीची
बैल बनू पाहणाऱ्या
मोठे मोठे पोट फुगवणाऱ्या
फुगवता फुगवता फुटणाऱ्या
फुगून फुटून मरणाऱ्या
बेड्कीची
===========
अभिजित अत्रे

Wednesday, October 10, 2012

दगडूशेठ

आठवते तुला? 
वाड्यात रंगलेला लपाछपीचा खेळ
कधी कधी जोगेश्वरीचा बोळ ओलांडायचा
तेव्हा येऊन दडायचो गाभारयात, बिनदिक्कत
कधी कधी, सकाळी सकाळी, सगळ्यांच्या नकळत
आज्जी पाठवायची तपकीर आणायला
तेव्हा येता जाता पारोशानेच शिरायचो देवळात
खोबऱ्याचे तुकडे टाकायचो तोंडात, बिनधास्त

वाडा इतिहासजमा झाला
तपकिरीचे दुकान, आणि आज्जीही
तू पण किती बदलास
परवा आलो होतो, ऐन उत्सवात, रात्रीचा
पोराने हट्ट धरला, म्हणून निघालो गर्दीचा

मंदिराच्या खूप अलीकडेच, रस्त्यावर
मोठ्या मोठ्या प्रवेशद्वारांच्या कमानी
हे नवीन, बाकी जुनेच,
तोच गोंधळ व तीच धक्काबुक्की
मी वाट काढत पुढे सरकतो
फोन वाजतो...वडील बोलत होते ...
कुठे आहात? दगडूशेठला
कशाला घेऊन जातोस नातवाला गर्दीत
चुकला, हरवला, काही झाले तर..तर काय?
.. मी हसतो..त्यांचा जन्म गेला या गल्ली बोळात
अति काळजी, मी फोन कट करतो
पोराच्या मनगटावरची पकड मात्र घट्ट होते..

बाबा मंदिरात मूर्तीच नाही
अरे ती समोर, मांडवात हलवतात
एवढी मोठी मूर्ती कशी उचलतात
अरे ती आतून पोकळ असते
बाबा देव पोकळ असतो?
देव नाही रे.. मूर्ती
...............

बाबा तो फुलवाला कुठे बसतो
कोणता फुलवाला?
तो, ज्याने ती बॉम्बची ब्याग ठेऊ दिली नाही.. तो
...(बापरे.. पोरगा पेपर वाचतो कि काय?)
...फालतू प्रश्न विचारू नकोस
समोर बघ, तो बघ रंगीबेरंगी महाल
.........
त्या मचाणावर सोल्जर का आहेत मशीनगन घेऊन?
बाप्पाचे संरक्षण करायला
पण बाप्पा आपले रक्षण करतो ना
मग पोलीस कसे करणार त्याचे रक्षण?
...
पोरगा मशीनगनकडे एकटक पाहतोय
मला लोकांच्या हातातला नारळ हँण्डग्रेनेड भासतोय
हसू नकोस, ....तुझे बरे आहे बाप्पा
तुझा विमा काढलाय पन्नास कोटींचा
आम्हा भक्तांचे काय?
(माणसाने किती प्रगती केली बघ बाप्पा
देवाचा पण विमा काढू शकतो माणूस)

.....नाही रे..मी अजिबात घाबरलेलो नाही
काहीतरीच काय.. आणि तू असताना कसली भीती
त्यात हा माझ्याच घराचा परिसर
भीती नाही रे .. खरे सांगू.. मी वैतागलोय
पोलीस शिट्ट्या वाजवतोय, कंटाळलेला कार्यकर्ता
पुढे चला, पुढे चला, चा घोष करतोय....

तू समोर दिसतोयस, कोणीतरी जुनी ओळखही देतोय
पण मेटल डिटेक्टरच्या कमानीतून पुढे जावत नाहीए
मी उजवीकडे, लक्ष्मीरस्त्यावर वळतोय
.. ..
इथे बरेच शांत आहे ..विशेष गर्दीही नाही
अगदी आम्हा तिघांच्या चालण्याचा
आवाजही ऐकू येतोय
माझ्या चपलेचा, पोराच्या बुटाचा
आणि हळू हळू सरपटणाऱ्या
दहशतीचा
......
होईल होईल
या सोबतीचीही सवय होईल
पुढल्या वर्षी नक्की येईन!
==========
अभिजित अत्रे