Tuesday, October 13, 2026

मराठवाडा

मराठवाडा

कधी बियाणं खोटं
कधी पाऊस खोटा
बांधा बांधावर आता
विस्कटलेल्या वाटा

काल विकले नाही
आज पिकले नाही
दारिद्-याचे कोडे
काही सुटले नाही

किती प्रेमाने जोजावले
किती स्वप्नांनी सजवले
शिवारातून तरी पुन्हा
पुन्हा कर्जचं उगवले  

पुराचे वळणार पाणी
पाखरं गाणार गाणी
आस लावूनिया गेली
एक रंगीत कहाणी

कंत्राटांची खाडाखोड
कागदावर नदीजोड
पूर्णेच्या काठावर
पर्णहीन उभी झाडं  

हे गेले, ते आले
तेच ते भाषण झाले
वठलेल्या जखमांचा
नवा पंचनामा चाले

काय लिहू जबाब
काय मांडू हिशोब
मोडली शीव अन
करपले नशीब

उधळलाय सारीपाट
साचलाय अंधार सन्नाट
आता तरी धाड देवा
मावळतीला पहाट
***
अभिजीत अत्रे
१३ ऑक्टोबर, २०२६  

No comments: