Thursday, April 5, 2012

गम्मतगाणे: खूपच संध्याकाळी

पिसाटला हा वारा
गरुडांची पडली घरटी
वृद्ध भिक्षुकाच्या घरा
तृष्णेची धार चपटी ---१

गर्भार धरतीलाही
प्राजक्ताची पडली भूल
निष्पर्ण कदंबातून
पेटून उठे चूल --- २

संक्रमंणाच्या रात्री
चंद्र तुटून पडावा
उर्मिलेचा ओल्या नेत्री
उभा वनवास उलगडावा --- ३

मेणाचे दाखले खोटे
पाण्यात मिटे वीज
घनगर्द ढोलीतून
अनवट ओघळे चीज ----४


रानात थबकला आज
दगडांचा भिजला घोडा
मिटत्या काळोखात
दौडला तरीहा वेडा---- ५


काजव्यांनी उजळेल रात
मी घेतली बांग छीलून
कोम्बातून पसरली जाळी
कोरडी आतडी आंबवून---६


ती सरता काजळमाया
चिम्ब चिम्ब तो भिजला
मातीतून पुन्हा रुजाया 
बैरागी असे निजला--- ७
===================
समाप्त. तुम्हाला कविता कळली असेल तर पुढे वाचु नका


कवीने कवितेचाअर्थ सांगायचा नसतो


पण दुर्बोधतेचा शिक्का लागू नये म्हणून खाली अर्थ देतो आहे:-- ===================================
१ खूप थंडी आहे. मी ओल्डमौंक रमची क्वार्टर घेऊन घरी आलोय.


२ संध्याकाळी खाल्ले होते पण तरीही आत्ता खूप भूक लागलीय. घरी खायला काहीही नाही आहे.


३ मी पांढरया कांद्याच्या गड्डीतून दोन कांदे तोडलेत. चिरताना डोळ्यात पाणी येते आहे.


४ पावसाने लाईट गेले आहेत आणि मेणबत्ती पेटत नाहीय. बंद फ्रीज मधून मी विरघळलेले चीज बाहेर काढले आहे.


५ पार्किंगमध्ये पाणी आल्याने बाईक सुरु होत नाहीये. ही नेहमीचीच बोंब. दुकानदार किराण्याचे दुकान बंद करतोय म्हणून मी धावत धावत गेलोय.


६ हुश्श. सिगरेट मिळाली. रात्र काढता येईल. अंडी पण मिळाली. आंबलेले खायचे नाही, पण एखाद्यावेळेस ब्रेड चालतो.


७ दारू संपली. पिउन टाइट् झालोय. उद्या लवकर उठायचे आहे म्हणून कपडे न बदलताच झोपलोय. =========

Wednesday, March 28, 2012

रेषेखालची माणस

अठ्ठावीसचे तीस, तीसचे बत्तीस
व्याख्या बदलतात दरवर्षी बीपीएलच्या
पण दारिद्र्य संपत नाही

हे जरा आक्रीतच, विशेषतः
हस्तसामुद्रिकेच्या अभ्यासकांसाठी
इतक्या मोठ्या समूहाची भाग्यरेषा
सारखीच असेल, खुरटलेली?
तीस रुपयांच्या परिघावर
थोडी आत, थोडी बाहेर, थिजलेली?

बदला येतील रापलेल्या हातावरच्या
या खुज्या रेखा एकाच साच्यात?
प्रयत्न करायला काहीच हरकत नाही

विज्ञान सरळ करु शकते नटीचे नाक बटबटीत
म्हणून तोडून आणलेत मीही काही पंजे गुबगुबीत
ज्यांच्या बोटांना लगडले होते पिवळेजर्द पुष्कराज

आता फक्त रोपण करायचे आहे या गुलाबी त्वचेचे
समूहाच्या अभागी हातांवर
बदलायची आहेत फक्त बोटांची निबर पेर
त्याखालचे उंच निर्जीव घट्टे काळे
पुसायचे आहे तळहातावर खोल खोल रुतलेल,
सुरकुतलेल,भाग्यरेषांचे अभागी जाळे

पण हा प्लास्टिक सर्जन म्हणतोय
अशक्य आहे असे ग्राफटिंग करणे
या हस्तरेखा नाही पुसता येणार
कितीही घासल्या तरी त्या खरवडणे
कठीण आहे

कारण तळातांवर उमटले आहेत फक्त ठसे
मूळ भाग्यरेषा चिकटल्यात हाडालाच
जन्मल्यापासून
तशी रीतसर नोंदही झालीय
रेशन कार्डावर, बीपीएलच्या.
=================
अभिजित अत्रे

Monday, March 19, 2012

तो निसटलेला क्षण

वर्तमान रोजच चढवतो
एक नवे ओझे पाठीवर
नव्या नव्या ओळखींचे
नव्या नव्या बंधांचे
नव्या नव्या स्मृतींचे


जुनी माणसेही भेटतात
एक नवीन, न पटणारी
ओळख घेउन, रोजच
आपण स्व:ताला स्व:ताच
भेटतो नव्याने, सततच


वर्तमान घेऊन येतो
नवी नाती, नवी पैंजणे
नवे मित्र, नवे शत्रू
नव्या वाटा, नवे काटे
नवे हेवे, नवे दावे


आठवणी धूसर होतात
कैकदा सवडच होत नाही
भूतकाळाचे पदर सोलायची
वर्तमानही बदलतो स्वतःला
भूतकाळात, अविरत


दिवसागणिक वाढत जातो
एक एक पापुद्रा, धूसर धूसर
होत चाललेल्या आठवणींवर
बालपण, शाळा, मित्र, मैत्रिणी
मैदान, सहल, मास्तर


मागे पडत जाते जुने घर
जुने गाव, जुने झाड, बक्षीस
अपमान, सत्कार, तिरस्कार
पहिले प्रेम, पहिली नोकरी
पोराची शाळा, त्याचे मित्र


अगदी काल परवाची नवी गाडी,
कुणा अप्ताचे मरण, अपघात
सगळं सगळ जातं मागे मागे
पापुद्रे वाढतात दिवसागणिक
त्यांचे साठतात थर, दररोज


वर्तमान रोजच चढवतो
एक नवे ओझे पाठीवर
तर मग, खूप खूप पूर्वीच
हातून निसटलेल्या त्या क्षणांची
आठवण अजून इतकी ताजी कशी?


मी जाणीवपूर्वक जोपासतोय तो क्षण?
का  भूतकाळाच उगवतोय
नव्याने, माझ्या वर्तमानात?
मी वर्तमानातच आहे न?
छे..हे फार भयंकर आहे.
=============
अभिजित अत्रे
============

Monday, March 12, 2012

साम्य

संस्कृती रक्षकांनी विडा उचलला आहे
आणि आता ओतली जाणार आहे
काळी शाई, त्या संपादकाच्या चेहऱ्यावर
जमलच तर त्याच्या कुबट विचारांवर

तसा गुन्हा गंभीरच आहे त्या विद्वानाचा
दुखावल्या जाणारया सनातन भावनांचा
विचार न करता त्याने नको ते छापले
दोन घटनात म्हणे त्याला साम्य दिसले

पहिली घटना पनवेलची, रात्रीची, ओल्या पार्टीची,
मदहोश धुंदीची, डान्सबारची, गुंठा मंत्र्याची,
ज्याने उधळले काही करोड रुपये होऊन फिदा
नाचणाऱ्या बारबालेवर, जिच्या मधाळ होत्या अदा

दुसरी घटना पुराणाची, संस्कृतीची, देवांची,
राजा इंद्राची, अप्सरेची, महान साधूची
ज्याने ओवाळून टाकले त्याचे हजार वर्षाचे तप
त्या कामुक नर्तकीवर, जिने भंगले त्याचे जप

हा तर घोर अपमान आमच्या इतिहासाचा
ठेचायला हवा आता सडका मेंदू याचा
पण हाय, रस्ता पकडला त्यांनी घराचा
पटला त्यांना हा खुलासा संपादकाचा

"तुलना नाही केली मी पैशाची आणि तपाची
ठाऊक, गुंठा मंत्र्याला नाही सर विश्वामित्राची
दोस्तांनो, मला दिसलेले साम्य वेगळेच आहे
नाचणारी मेनका अजूनही शापितच आहे".
============
अभिजित अत्रे
===========

Friday, March 2, 2012

पारवे

कोणत्यातरी समरानंतर उडवली गेली होती
दोन शुभ्र कबुतरे, शांततेचा संदेश देणारी
बहुदा त्यांच्याच विजोड संभोगातून जन्माला
आलेत हे पारवे


त्यांचा वावर सिमित नाही राहिला
आता, दादरच्या कबुतरखान्या पुरता
घट्ट रोवले आहेत त्यांनी पंजे
आजूबाजूच्या चाळीत, वस्तीत, संस्थेत
गगनचुंबी इमारतीत, कचेरीत, दुकानात
आणि घराघरात


आत्ममग्न फिरत राहतात पारवे
कोनाड्या कोनाड्यातून, जोडीने,
कधी बसतात एका ओळीत, शिस्तीत,
टेलीफोनच्या वायरींवर, ठो आवाज झाला
कि दचकतात, सैरभैर उडतात, पुन्हा येवून बसतात
पूर्वीच्याच जागेवर, जसे बसले होते ते गेटवेवर,
बॉम्बस्फोटानंतर, पूर्वीप्रमाणेच प्रणयलीला करीत निरंतर,
आणि  प्रस्थापित केली होती त्यांनी स्फोटापेक्षाही 
भयंकर, शांतता

उगीचच दोन पावले चालतात
बसल्या जागेवरून बुड हलवतात,
पुन्हा बसतात, वाट पाहतात
नेमाने मिळणाऱ्या दाण्यांची,
बोल लावतात भाग्याला पण
बंड करीत नाहीत जेव्हा
किराणा दुकानदार फेकतो समोर
कुजके धान्य, टिपत राहतात, झुंडीने,
शिटत राहतात दिवसभर राहत्या जागांवर,
तिथच करतात मैथुन,
आणखी एक पिढी वाढवतात
ऐदी परव्यांचीच


काही पारवे चुकून जन्मही देतात गरुडांना
पण त्यातील बहुतेकांना छोटा भासतो
हिमालय, उडतात आल्प्सकडे,
तिकडून पाठवतात नवे चावीष्ठ दाणे,
फेडू पाहतात खुज्या संह्याद्रीचे ऋण, दुरूनच,
शिव्या घालतात इथल्या बुरशी आलेल्या
खुराड्याना, गुबगुबीत मान फिरवीत चर्चा
करतात चकचकीत मॉल्स मधील घरट्यांची,
तुपट संस्कृतीची, आणि टंच श्रीमंतीची
काही त्यालाही उबतात, उद्विग्न होतात,
लढतात, परततात, पण त्यांचे मोठे पंख
टोचतात पारव्याना


काही गरुड इथेच थाबतात, उभी करतात
काही आनंदवने, वाळवंटातल्या ओयासीस सारखी
पण त्यांची संख्या खूप खूप कमी
खूप खूप पंख फडफडायला लागतात त्यासाठी
आणि बांधावी लागतात घरटी
लस्टर विरहित कडे कपारीत
काही पारवेही करतात तसा प्रयत्न,
सोडून देतात, अर्धवट, 
नखे मोडतात इतरांच्या नावाने,
पंख मिटवून दाणे टिपत राहतात,
मेलेल्या पारव्याच्या नावाने,
देतात दोन चार दाणे, देणगी म्हणून,
ज्ञातीतील गरुडांना


उकिरडे पाहिलेकी डोळे मिटून घेतात
अंधार पडायच्या आधीच परतात, खुराड्यात
पकडलेच कुणा एकाला एखाद्या मांजरीने
तर चर्चा करतात, हळहळतात, नवस बोलतात, रडतात, मूक मोर्चा काढतात आणि असाह्य बसतात
चाळीतील वायरीवर, पण झुंडीने 
टोची मारत नाहीत मांजरीला,
घू घू करत पुन्हा घुमत राहतात आपल्याच नादात,
प्रस्थापित करतात एक फक्त कुजबुजणारी
वांझ शांतता


हीच अलिप्त नीरवता अभिप्रेत होती का
त्या गुलाबवाल्या काकांना?
 ज्यांनी उडवलेली ती दोन शुभ्र कबुतरे,
खरच ठाऊक नाही मला
पण  ह्या स्मशानशांततेने उन्मळून पडलाय
सरकारी कचेरीतून नागवलेला एक म्हातारा
खाल्ल्या मिठाची शपथ देत,
काठी आपटत, ओरडून सांगतोय तो मला
कि  या देशाला गरज आहे पुन्हा
एका युद्धाची!
==========
अभिजित अत्रे
========

Monday, February 27, 2012

गम्मत गाणे: चायनीज भेळ


चाल: मोठ्याने
संगीत: मकरंद अनासपुरेचा गावठी हेल
=========
घड्याळाचे सेल चाइनीज
प्लास्टिकचे वेल चाइनीज
ब्याडमींनटनचे फूल चाइनीज
कानातले डूल चाइनीज
------- जगात चारातले एक मूल, ते पण चाइनीज
***
मैत्रिणीने रेसिपी टाकलीय फेसबुकवर
शेजवान ट्रीपल राइसइचा फोटो पानावर
मीही टाकलीय कॉमेन्ट चिनीसारखी गोड
भारतीय वाटण्याला येणार बेजिंगचे मोड
--------बोला.. हिंदी चीनी भाई भाई!
***
मित्र दाखवतोय मोबाइल भारी
उल्हासनगरावर चायनाची स्वारी
राक्षबंधनालाही बाधलेत जागतिकीकरणाचे वारे
राखीचे भगवे गोंडे ही चाइनीज सारे
-------बोला..डॉक्टर कोटणीस अमर रहे"
***
 दामू दहावीला नापस झाला
दलाई लामा तरी प्रसन्न त्याला
चायनीजच्या टाकल्यात गाड्या तीन
बाकावर बसून हाणता येते जीन
--बोला..हक्का नुडल्स खाणे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
***
दूर दूर सारा आता जपानी निन्न्जा
चिन्याला करा आता आपला भांजा
रक्ताळला जरी हाताचा पंजा
पतंगातून लोंबूदे तरी, चाइनीज मांजा
-----लवकरच मिळणार.. होळी स्पेशल.. चाइनीज गांजा
***
केसरीची पानभर जाहिरात
चायनाची टूर वीस हजारात
कशाला उरी टाइनामन स्क़्वेअरची खंत?
पहा लांबच लांब पसरलेली कीर्तिमान भिंत
--- बोला.. कम्यूनिझंम झिंदाबाद, तिबेट-अक्साईचिन झिंदाबाद
***
आपल्या इंडियन्सना महत्वच कळत नाही हेरीटेजचे
ए, विस्की दे, चायनीज भेळ दे, पैसे घे सिगारेटचे
द्यानेश्वाराने तर भिंत चालवलेली आकाशात गरागरा
प्रिझव केली असती, च्याएनाचा जिरला नसता तोरा?
-----"बारमध्ये बसा बसा...हळू हळू भिंतही हलते".
***
शेजारच्य आज्जी आल्यात तीर्थयात्रेवरून
जप मोजायचे चीनी यंत्र आणलय हरिद्वारवरून
गंगाजलाचा चाइनीज गडू, स्लाइडिंग सील असलेला
तीनदा वापरता येतो, परत जायलाच नको गंगेला
--गडू उपडा करू करू...आज्जी, आजोबा..मग कोणाला मारू?
***
आज्जीनी भेट दिलाय चायनिज गणपती खास
उदबत्तीच्या पुड्यामध्ये झुरळाचा भास
शेवयाच्या खिरीला येतोय नुडल्सचा वास
कणकेला लावणार बायका आता सोया स्वॉस
-- बस टू मिनिट्समध्ये तयार होणार बघा जेवण सुग्रास
***
ड्र्यगनने काबीज केलीय सगळी बाजारपेठ
घरी दारी सर्वत्र चीनी वस्तू उमेठ
तुळशीबागतरी नको बनायला शांघायची पेठ
आत्ता खुडलाच पाहिजे या म्याग्गीचा देठ
--- पण माझ्या नवसाला पावणार का हा..चायनिज दगडूशेठ?
=============
अभिजित अत्रे
=========

Thursday, February 23, 2012

एन ग्रीष्मात

तुला फक्त उसवलेला अंधारच दिसतो
दिसत नाही हा उजेड, हा आकाशदिवा
दिसत नाहीत या बागा, ही फुले?
सवाल केला दोस्ताने

खरच चुकलेच माझे जरा
मी ही बांधून घेतली होती
ओंगळ झापडे, काळोखाची
पटले मला मित्राचे
डोळे लावले प्रकाशाचे

दिसला खूप खूप उजेड
दिसल्या सुंदर सुंदर बागा
दिसली रंगीबेरंगी फुले
गुलाब, डेलिया आणि
कार्नेशन्स!

इतक्यात ती चिमुकली आली समोर
त्याच फुलांचा गुच्छ घेऊन
"एक तरी घ्या, साहेब. इस रुपयाला देते.
बोनी करा साहेब. अजून च्यापन पिली नाय,"
म्हणाली ती दीनवाणी
व्याकूळ नजर केविलवाणी
उभी राहिली अनवाणी
भाजून काढणाऱ्या उन्हात.

उघड्या डोळ्यात माझ्या
धुवांधार बरसला अंधार
एन ग्रीष्मात
========= 
अभिजित अत्रे
===========

Tuesday, February 21, 2012

पेटंट

त्याच्याच शेपटासारख्या
लांब रांगेत उभा होता तो
अमेरिकी पेटंट आणि ट्रेडमार्क
ऑफिसच्या बाहेर
चेहरा ओळखीचा, पण वेश वेगळा
हातात जुन्या-नव्या फोटो फ्रेम्स
देवळातून गोळा केलेल्या


देवा तुम्ही इथे?. ओरडलोच मी
हळू बोल वत्सा
जाड ओठातून बारीक शब्द झिरपले
देशाचेच काम घेऊन आलोय इथे
परवा हिमालयात वाचली बातमी
हळदीचे पेटंट अमेरिका हडप करणार होती
नशीब कुणा एका शास्त्रज्ञाने ते वाचवले
माझे पेटंट मीच वाचवायला हवे ना?


तुमचे कसले पेटंट देवा?, मी
असे काय करतोस, वत्सा
अरे पहिली ओपन हार्ट मीच केली नाही का?
त्याचे पेटंट नको घ्यायला, म्हणाला तो
आणि दाखवू लागला त्याच्या तसबिरी
छाती फाडून रामपंचायत सीन दाखवणाऱ्या


नंबर पुकारल्यावर गेला आत उड्या मारत
तासाभराने आला बाहेर
थोडा उदास, थोडा आनंदी
काय झाले देवा विचारल्यावर
ओरडला भक्तांच्या नावाने
त्यांना तसबिरी चालत नाहीत पुरावा म्हणून
म्हणाले प्रात्यक्षिक करून दाखवा
तीनदा रोवली नखे, पण
छाताडा पर्यंत पोचलीच नाहीत
तिन्ही वेळेला ढलप्या खाली पडल्या
शेंदराच्या 

युगान युगे केवढा शेंदूर फसलाय तुम्ही
छाती फाटणार कधी आणि राम दिसणार कधी?


अरे रे.. तुझी ट्रीप वाया गेली की, मी
नाही, अगदीच वाया नाही गेली वत्सा
ओपन हार्टचे नाही पण दुसरे एक पेटंट
दिले त्यांनी भारताला, कोणते रे?
 मी विचारले, तेव्हा हसत म्हणाला
शेंदराचे रे शेंदराचे!
============
अभिजित अत्रे
=========

Monday, February 13, 2012

बडबड गाणे: पोरगा विचारणार तुम्हाला जाब.

वाटले होते..
असेल सगळे सोपे सरळ
जगाला पडणार माझी भुरळ

तीन नंबरचा पोरगा बनायचे
मेंढपाळाच्या घरी जन्मायचे
दवंडी एकताच  दरबारी जायचे
मग सरळ जंगल गाठायचे

दिसली म्हातारी, म्हण तिला माय
भेटला साधू, चेप त्याचे पाय
देणार तो अंगठी, करतो काय
उडत्या गालिच्यावरूनच बाय बाय

गाठायचा तो महाल काळा
तळघराचा तोडायचा टाळा
पोपटाचा फोडायचा डावा डोळा
होणार मग राक्षस चोळामोळा

राजकन्या ती, सुंदर बाला
मला घालणार वरमाला
अर्धे राज्य खिशात घाला
अन सुखाने संसार झाला

वाटले होते...
सगळे असेल सोपे सरळ
जगाला पडणार माझी भुरळ
परि, फिरतो अजुनी लालबाग परळ
स्वप्न माझे झाले आता विरळ

जंगलात वाट सापडेना
म्हातारी-साधू भेटेना
जादूची अंगठी मिळेना
माझी चटई काही उडेना

राक्षस ही एक नसे
त्यांची तर फौज दिसे
मदतीला ही कुणी नसे
यांना आता मारायचे कसे?

सांगा बाबा, का शिकविली गोष्ट उफराटी
ठाऊक नव्हती तुम्हाला जगरहाटी?
साधू खोटा, अंगठी खोटी
राक्षस फक्त खरा, रोजच भेटी

सुचेना आता काय करावे
ठरवले आपणही राक्षस बनावे
पण राक्षस कसे बनायचे?
साल, महत्वाचेच राहून गेले शिकायचे
==============
अभिजित अत्रे
===========

Saturday, February 11, 2012

एका प्रभागातील निवडणूक


वजीराच्या जोरावर
प्याद्याला पुढे करून
काळ्या राजाला शह देण्याची
जुनीच पद्धत, थेट
बुद्धिबळाच्या पटावरून उचललेली

सफेद राजा बसलेला असतो सुख:नैव
त्याच्या सुरक्षित क्यासलमध्ये
आणि, वाजीरही असतो खुश
शेवटी त्याचेच राज्य चालते
चौसष्ट घरात

पण आता बदलली आहेत
लढाईची परिमाणच, आणि
काळ्या-पांढऱ्या राजांची झाली आहे
दिलजमाई, एकशे अठ्ठावीस घरांवर
जोडीने राज्य करायच्या वायद्यावर

शेजारीच उभे असणाऱ्या बेसावध
वजीराच्या पोटात खुपसलाय त्यांनी
विश्वासघातकी लालभडक सूरा
फेकून दिलीत त्यांची कलेवर पटाबाहेर
आणि लवकरच सुरु होणार आहे
एक अनिर्बंध सत्ता दोन्ही राजांची
मोठ्या पटावर

भयभीत झाले आहेत घोडे आणि उंट
नवीन वजीर तयार व्हायला हवेत
त्यासाठी दामटवायला लागेल
एखादे प्यादे पुढे पुढे, दोन्ही
राजांची करडी नजर चुकवून
पण त्याला लागेल बराच वेळ
प्याद एकच घर चालते एकवेळ

परिस्थिती कठीण आहे आणि
दोन राजांचा अश्वमेध रोखणे
जमणार नाही म्हातारया उंटांना
खेळाचे सगळेच नियम बदलेत
आता गरज आहे
चारीही हत्तींनी एकत्र येवून
तिरक चालण्याची!
==========
अभिजित अत्रे
============






Tuesday, February 7, 2012

शोधू कुठे तुला.........

शोधू कुठे तुला,  रस्ते हरवलेले
गर्दीत भाविकांच्या, मंदिर झाकलेले

देणगीच्या ओझ्याने, गाभारे वाकलेले
अभिषेकाच्या पावतीने, सोवळे बाटलेले

छत बदलले तरी, आभाळ फाटलेले
वेश नवे तरी, भाव ठिगळलेले

चीस्तीच्या कबरीला, चादरीत लपेटलेले
नक्षीदार गावाक्षाला, नवसात ओवलेले

खिळ्यांनीही स्व:चे, हुंदके दाबलेले
इथेही प्रेषितांचे, रक्त सांडलेले

महापुजेला विठोबाच्या, हेलीकॉप्टर उतरलेले
तीरावरून इंद्रायणीच्या, विमान कधीच उडालेले

शोधू कुठे तुला.........
=======
अभिजित अत्रे
========

Wednesday, February 1, 2012

सिंहासन

त्या तिथे खोदा
तिथे दडवली आहेत
पिळदार बाहूंवर सजलेली
सोन्याची कडी
त्या भुयारात मिळतील
तिच्या स्वयंवरासाठी खास घडवलेले
पाचूचे बाजूबंद
अन, त्या पेटीत आहे
मानस सरोवरातील राजहंसांचा चारा
पोपटाच्या डोळ्यासारखे गोल गोल मोती
पलीकडच्या तळघरात आहे ते धनुष्य
त्यालाही मढवून ठेवले आहे नवंरत्नांनी
तेवढी ती सन्दुक मात्र
जपून उचला
त्यात आहेत ते मयसभेतील
बिलोरी आरसे आणि
स्फटिकाची झुंबरे
सांगत होता तो इतिहासपुरुष
पुरातत्व खात्याच्या चार संशोधकांना
ज्यांनी खोदून काढला होता
धरणीच्या उदरात लुप्त झालेला
एका महापराक्रमी विराचा राजमहाल

पण जेव्हा मारला गेला हातोडा
तख्ताखालच्या संगमरवरी फरशीवर
तेव्हा क्रोधीत झाला तो इतिहासपुरुष
थांबा! तेवढे ते भुयार खोदू नका
तिथे काहीच नाही महत्वाचे
किंचाळला तो.
तरीही उतरले संशोधक त्या
अंधारलेल्या तळघरात, आणि
घेऊन आले बाहेर एक
शेवाळलेली पेटी

पण खरे ठरले भाकीत इतिहासपुरुषाचे
त्या पेटीत होते एक
गंजलेल्या बाणाचे पाते,
एक भुस्सा झालेले लाकडी चक्र,
एक निळे जांभळे निस्तेज चिलखत
आणि, हाडाचा एक लहान तुकडा.

त्या दिवसापासून बंदी घातली गेलीय
सिंहासनाखालची भुयारे खोद्ण्यावर
आणि ही बंदी रास्तही आहे
कारण कोणत्याही सिंहासनाखाली
तसे काहीच नसते मौल्यवान

तिथे सापडते फक्त
शिखंडी आडून लक्ष्यभेद करताना
शरमून अक्षय भात्यातच रुतलेले
न सुटलेल्या पहिल्या बाणाचे पाते
तिथे असते फक्त एक जुने रथचक्र
जे रुतले होते रणात  आणि
ज्याच्या अरीवर मारला होता गेला होता
एक शापित योद्धा
तिथे असतात कुणाचीतरी
फसवून आणलेली निरुपयोगी
कवचकुंडले
आणि हो,असतो तिथे
एक कोवळेपणी कापलेला
अंगठा

या आणि अशाच सटर फटर
वस्तू असतात तख्ताखाली
मूल्यहीन आणि फुटकळ
पण त्यांच्यावरच उभे असते
प्रत्येक सिंहासन!
==========
अभिजित अत्रे

Monday, January 23, 2012

गीत: एकटी ती, सांजवेळी



सोडू नको एकटे मला सांजवेळी
श्वासात भास होती, मला कातरवेळी||धृ।  
  
   मिटल्या      पंखातून
   मिटती         गाणी
   फिटते          नभातून
   केशराचे      पाणी

व्याकूळ करे मला, घर चंद्रमोळी
सोडू नको एकटे, मला सांजवेळी||१||

थरारून हले पान, थरारते डहाळी
दबाधरून उभी दिसे, तिथे रात्रकाळी

   पश्चिमेच्या   वाऱ्यातून
   उदास          कहाणी
   दाही            दिशातून
   दाटती         आठवणी


दिव्या दिव्यात आज, दिसे काजळी
सोडू नको एकटे, मला सांजवेळी|| 2|| 
==============
अभिजित अत्रे
==============

वडाची फिर्याद

वडाचे झाड
कैफियत मांडून गेले
लोक मला दोऱ्यात
गुंडाळून गेले

माझ्याच पारंब्यांचा
आवरेना मला पसारा
ते तर जन्मांच्या
गाठी बांधून गेले

या पिंपळाचे कसे
बरे चालले आहे
फेकतो कि याच्यावर
अवघे विश्व तरुन गेले

याच्या पानांनाही
तिच्या वहीत जागा
आमच्या फांदीवर साले
घुबड शिटून गेले

नाही दिली फिर्याद
तुम्ही आता म्हणाल
मनही याचे खोडागत
निबर बनून गेले

पण खर सांगू
कधीतरी ती बघेल म्हणून
स्व:ताची जाळीजाळी होईपर्यंत थांबणे
मला नसते जमून गेले.
========
अभिजित अत्रे
===========

Monday, January 16, 2012

कणव


त्यालाही रोज दिसते
बस थांब्याच्या शेजारी
आल्युंमिलीयमच्या भांड्यात
रटरटणारी भूक


तोही होतो कासावीस
सिग्नलला जेव्हा
बालपणीच पिकलेले हात
त्याच्या गाडीचे बॉनेट पुसतात
रुपया दो रूपयांसाठी


तोही जातो शरमून
जेव्हा काही टारगट
करतात पाचकट विनोद
तिच्या टोपलीतून उचलताना
कर्दमलेले गजरे


तोही जातो गलबलून
जेव्हा त्याच्या वडिलांच्या वयाचा
लंगडा भिकारी
फिरवतो त्याच्यासमोर
एक लाचार थाळी


अशी अगणिक
दुख: टांगलेली असतात
चौका चौकात
वस्ती वस्तीत
गावा गावात
सोललेल्या बकऱ्यासारखी
उघडी नागडी


असेच काहीसे पाहिल्यावर
फिरवली होती पाठ
सिंहासनाकडे
आणि एक राजपुत्र
तुडवीत गेला होता सारे रान
बोधीवृक्षाच्या शोधात


क्षणभर त्यालाही वाटते
सिद्धार्थाच्या मागे जावे
पण प्रेषितांच्या वाटेवर
वीज अंथरलेली असते
व्यावहारिक यशस्वीतेच्या
गुढ्या उभारलेल्या नसतात
म्हणून तो
कार मधूनही उतरत नाही!


नेहमीप्रमाणेच शह देते
त्याचे विवेकी मन
त्याच्या भावनेला
आणि करते गजर
"सरव्हायवल ऑफ द फिटेस्टचा"
त्याच्या लहान मेंदूत


सिग्नलच्या पिवळ्या हिरव्या प्रकाशात
केस पिंजारलेला म्हातारा भिकारीही
त्याला आता
डार्विन सारखा दिसतो
एक रुपयाचे नाणे
त्याच्या थाळीत टाकत
तो मार्गस्थ होतो
तुमच्या- माझ्या सारखाच
=======
अभिजित अत्रे

Wednesday, April 13, 2011

प्रगती? ...फसवणूक.

साईबाबाच्या मुकुटावर
हिऱ्याचे कोंदण
राबणाऱ्या हातावर
आभावाचे गोंदण

देवीच्या ओटीला
चांदीचे जर
ठिगळाच्या साडीला
वेदनेचे अस्तर

समतेच्या सारीपाटावर
सेन्सेक्सच्या रेषा
निवडणुकीच्या प्रचारावर
मार्क्सची भाषा

प्रगतीच्या आलेखावर
फोर्ब्सची यादी
राजाच्या श्रीमंतीवर
भुलतात प्यादी

अढळपदी पोचवी
मर्सिडीजचा तारा
ध्रुवाला जोजवी
मेळघाटचा वारा

उबदार घरट्यात
आत्ममग्न चिवचिवाट
विद्वान दिवाणखान्यात
वांझ थयथयाट

अजून किती फसवणार आपण?
स्वतःलाच.
============
अभिजित अत्रे
=============

Tuesday, April 5, 2011

अंधार.

अंधार...
सूर्य उगवला कि अंधार
संपतोच असे नाही
तसा काही नियम नाही
पुष्कळदा तो चालतो
त्या सहस्त्ररेश्मिच्याच संगे
त्याचे तळपते किरण धरून
आणि अलगद उतरतो
कोठेतरी ऊन्हकळा लागून
मारणाऱ्याच्या मिटत्या पापणीत.

अंधार...
कधी कधी उफाळून वर येतो
खोल खोल पाताळातून
भूकंप बनून
तुस्मानी लाटांवर स्वार होऊन
आणि घनघोर बरसतो
ज्वालामुखीच्या धगेतून.

अंधार...
भाजून काढणाऱ्या ग्रीष्मात
तो चोरपावलांनी शिरतो
सावकारी कर्ज थकलेल्या
एखाद्या शेतकऱ्याच्या झोपडीत
आणि बसतो दबा धरून
कीटकनाशकाच्या बाटलीत
किवां लपेटतो स्वतःला
दावाच्या दोरात.

अंधार...
न्हातो काळ्या सडकांन सोबत
झिरपतो उन उन डांबरावरती
कधी फसफसून सांडतो बाहेर
करकचून दाबल्या जाणाऱ्या ब्रेकमधून
आणि अवचित प्रकटतो
एखाद्या व्हराडाच्या टेम्पोसमोर

अंधार...
बेमालूमपणे मिसळतो तो
रेल्वे इंजिनाच्या आवाजात
आणि घेऊन जातो संगे
रूळावरची काही बेसावध गाणी.

अंधार...
कितीही दिवेलागण केली
तरी तो संपत नाही
कारण
अंधार आहे एक
अपरिहार्य देण
प्रकाश भोगण्याच. 
============
अभिजित अत्रे
============

Tuesday, March 15, 2011

एक फर्मास फार्स.

(लोकेशन: मुंबईचा राजवाडा. वेळ: नेहमीचीच, टळून गेलेली. महाराज दिवाणखान्यात येराझारा घालत आहेत. प्रधानाने नुकताच प्रवेश केला आहे)

महाराज: प्रधानजी

प्रधान:जी.. जी. जी. जीर जी. जीर जी. जी जीर जी जीर जी..

महाराज:गाणी काय म्हणताय?. इथे माझा जीव चाललाय.

प्रधान:काय झाल राजाजी?

महाराज: काय झाले? महिना झाला. कुठे आंदोलन नाही. कुठे तोडफोड नाही. अशाने पक्ष कसा वाढणार?

प्रधान:आता म्या काय बोलनार? तुम्ही फकस्त हुकूम कराजी. मी लगोलग मोहिमेवर निघतो. पोरांना सांगून दोन चार शिन्माची पोस्टर फाडतो.

महाराज: हेच.. हेच चुकते तुमचे. तीच तीच आंदोलने. मेंदूत भूस्सा भरलाय तुमच्या.

प्रधान:पण राजाजी माझ्या टकुर्यात का पाहता? माझी बॉडी बघा ना. बॉडी बघा.चार जनांसी अजुन्बी एका टायमला हाणू शकतो मी.

महाराज:अरे रे.काय हे विचार......एक काम करा.आपले पत्रकार मित्र जाजू ना फोन लावा.त्याला सांगा आम्हाला मराठी अस्मितेचा एखादा नवीन पण ज्वलंत विषय सांग. (स्वगत)  भाषणे देवू. सभा जिंकू. उभा महाराष्ट्र दणाणून सोडू...

प्रधान:लई भारी.

महाराज:थांबा. निट एका. जाजूला सुचत नसेल तर XXX फोन करा. त्यालाही नाही सुचला तर XXX फोन करा. पण आंदोलनाचा नवीन विषय घेऊनच इथे परत या.

प्रधान:व्हयंजी

( प्रधान जातो. राजा झोपतो. लोकेशन तेच. दुपारच्या चहाची वेळ. प्रधान पळत पळत महालात येतो)

प्रधान:महा राजाजी... सुरेखा... सुरेखा..

महाराज:सुरेखा उणेकर? इथे. अजून त्यांच्या व्हीसाचे काम झाले नाही? काय ही कलाकारांची परवड. प्रधानजी मी मदत करणार. शेवटी लोक कलावंतां इथे कोण वाली?. मीच. फक्त मीच वाली.

प्रधान:राजाजी तुम्ही वाली नव्ह. वाली होण्याचा हक्क फकस्त थोरल्या राजाजींचा. तुम्ही सुग्रीव. तुम्ही धाकलं.

महाराज: खामोश. जीभ छाटून टाकीन.

प्रधान: चिडू नकाजी. पन राजाजी शेवटला सुग्रीवानेच राज्य केलत.

महाराज: ठीक आहे. धाकल्या राणींना सांगा त्या सुरेखाचे चहा पाण्याचे पाहायला. आम्ही आलोच.

प्रधान: च्या-पाणी? राजाजी कोन बी आलेला नाय.

महाराज: मग तुम्ही का बोंबलत होता आग लागल्या सारखे?.

प्रधान:ते व्हयं. ते मी म्हण म्हणालो.

महाराज: म्हण?

प्रधान:व्हयं जी. तुमच्या संगत राहून म्या बी दोन चार बुके वाचले.

महाराज: बुके नाही हो. बुक. पुस्तके.

प्रधान:तेच व्हो. त्यात एका बुकेत लिवलंय कि इंग्लिश माणसाला काय बी नवं गावल कि तो युरेका युरेका अस वारडतो. म्या त्याचे भाषांतर केल.. सुरेखा सुरेखा.

महाराज: (कपाळाला हात लावतात).. बर काय शोध लावला तुम्ही.

प्रधान:तेच सांगतोय कवा धरून. तुमच्या जाजूला एक्बी नवीन विषय सुचेना. माझी करभारीन मला म्हणाली रद्दी टाकून या. म्हणून  रद्दीच्या दुकानात गेल्तो. तिथे मला नवीन ईशाय  मिळाला. राजाजी तुम्ही कधी गेलाय रद्दी टाकाया?.

महाराज: मी रद्दी टाकायाला? मुर्खा राजा कधी रद्दी टाकतो का?

प्रधान:(स्वगतं: यांना फक्त टाकायचं माहिती.. सकाळ नाही.. रात्र नाही.. कसा वाढणार पक्ष). न्हाय.. पण जाव राजाजी. रद्दीची पिशवी उचलून बॉडी पन भारी होते. माझी बॉडी बघा. अजुन्बी एका टायमाला...

महाराज: प्रधानजी. विषयाचे बोला. तुमची बॉडी गेली तेल लावत.

प्रधान:तेच सांगून राहिलोय. आंवो रद्दीच्या दुकानात मला मराठी भाषेवर होनारा लई घोर अन्याय दिसला.

महाराज: घोर अन्याय?

प्रधान: व्ह्ययजी. लई भारी विषय. स्मिता टिकायच पाहिजे आसा.

महाराज: स्मिता नाही हो. मराठी अस्मिता.. एके दिवशी फास लावाल तुम्ही आमच्या गळ्याला.

प्रधान:राजाजी कोन्च्याबी रद्दीच्या दुकानात मराठी पेपरचा भाव इंग्लिश पेक्षा कमी असतोय. हाय कि नाही घोर अन्याय? अन हा अन्याय हजारो वर्षापासून चालू हाय.

महाराज:अरे पेपर चालू होऊन दोनशे वर्ष पण झाली नाहीत अजून. हजारो वर्ष कसा होईल अन्याय? आणि इंग्लिश पेपर मी घेतो. त्याचा कागत गुळगुळीत असतो.

प्रधान:समदा नव्हे. फकस्त रविवारी. म्या पण घेतो इंग्लिश पेपर. रविवारच्या दिवशी. दोनचार गुळगुळीत कागद असत्यात. लक्स साब्नावाणी. पन राजाजी ह्यो गुळगुळीत कागद कोनी रद्दीत टाकतच नाय.

महाराज: मग त्याचे काय करतात?

प्रधान:त्या कागदावर काय बाय फोटो असल तर ते म्या आन समदे सरदार आनी मर्द जनता ते लपवून ठेवतो. आन नसल तर माझी आन सर्वांची कारभारीन ते कागुद कपाटात कपड्यांखाली किवां ब्यागेत ठेवाया वापरते.

महाराज: जर इंग्लिश पेपरचा गुळगुळीत कागद रद्दीत जात नसेल आणि तरीही मराठी राद्दीस कमी भाव मिळत असेल तर मग आहे हा आंदोलनांचा विषय.इतके वर्ष कुणाच्याही हे लक्षात कसे आले नाही?पूर्वी असे आंदोलन झाले आहे का?थोरले महाराजांनी असे आंदोलन केले होते काय?

प्रधान:अजिबात नाय. माझ्या पोरांनी गुग्गळ का काय असतना त्या पन पायल. जाऊ का राजाजी. दोन चार दुकान आज जाळतो. पेट्रोलचीबी गरज न्हाय. कागुदाचे दुकान. भस भस पेटलं बघा.

महाराज: थांबा. घाई करू नका. सगळ्या मराठी पेपर मधील आपल्या लोकांची एंक मीटिंग घ्या. जातीने हजार रहा. त्यांचा काय विचार आहे ते बघा. त्यांचा पाठींबा घेऊनच परत या.

( स्थळ: तेच. वेळ: दुपारची. महाराज येरझारया घालत आहेत. प्रधान जड पावले टाकत येतो).

महाराज: या. या प्रधानजी. सगळे तयार आहेत न पाठींबा द्यायला?

प्रधान: नाय. आंदोलन क्यान्सल.

महाराज: क्यान्सल? काय झाले?

प्रधान:भांडान.

महाराज: भांडण? कुणाचे? त्यांना सांगा शत्रूला घाबरू नका. मी आहे.

प्रधान: शत्रू? अवो कोन शत्रू? आव आपलीच लोक एकमेकात भांडली.

महाराज: म्हणजे?

प्रधान:एका पेपरवाल्याचे म्हणणे अशे पडले कि मराठी मराठीत वेगवेगळे भाव हवे, पेपरच्या किमती नुसार. तीन रुपयाच्या पेपरचा भाव तोच आनी एक रुपयाच्या पेपरचा भाव तोच, हे बराबर नाय.

महाराज: आणी?

प्रधान:दुसरा म्हणाला आमचा पेपर प्रिंटींग प्रेसमधून थेट रद्दीत जातो म्हणूनशान आम्हाला जास्त भाव हवा. त्यांच्या पेपरची घडी पन मोडलेली नसते. लग्नात आहेरात मिळालेल्या साडीवानी कोराच असतो त्यो.

महाराज: आणि?

प्रधान: तिसरा म्हणाला फकस्त आमच्याच पेपर मध्ये नव्या बातम्या असतात आन एक्बी जाहिरात नसते.
चौथा म्हणाला कि शुद मराठी फकस्त आमच्याच पेपरमंदी.

महाराज: शेवटी काय ठरले?

प्रधान:प्रत्येकाला येग्ला येग्ला भाव हवा. आन तो भाव तुम्ही ठरवावा असे म्हतात. त्यो भाव ठरल्यावर मंग इंग्लिश पेपेरचे पहा आसा सगळ्यांचा हुकुम हाय.

महाराज: मी भाव ठरवायचे? बापरे. हे एक धर्मसंकटच आहे. काय हे. इथे महाराष्ट्र चुकतो. आपसात भांडतात. एकत्र येवून यवनांशी लढायच्या वेळेलाच दुही माजवली जाते. दुर्देव आणि काय?

प्रधान:राजाजी. साद बोलाकी. कॉंग्रेस आन यानशीपी. परवाही तुमी यवन यवन म्हणाला आन लोकांना वाटले बाबासाहेब पुरांद्रेच बोलत्यात. उगा पुढच्या टायमाला गणपतीत भाषणाला बोल्व्त्याल.

महाराज: अरे रे. हाही विषय गेला. आता काय? तुम्ही कोठे चालला प्रधानजी?

प्रधान: म्या? घरी चाललो. अन्गोलीला.

महाराज: अंघोळीला? दुपार झाली तरी तुमची अंघोळ झाली नाही?

प्रधान: सकाळच्याला केलती. पुन्यांदा करतो.

महाराज: खामोश. इथे मयत झाली नाही कुणाची. थांबा इथे. नवीन विषय शोधायचा आहे.

प्रधान:आवो म्या त्यासाठीच चाललो हाय. राजाजी तुमच्या इथे टब हाय का टब?

महाराज: टब?

प्रधान: नसेल तर बसवून घ्या. मी बशिव्लाय.

महाराज: टब? तो कशाला?

प्रधान: टब मध्ये बसा आनी सुरेखा सुरेखा म्हणा. कायतरी नवीन सूचल बघा पटदिशी.

(प्रधान जातो. पडदा पडतो)
============
अभिजित अत्रे
================

Thursday, March 10, 2011

हट्ट कशासाठी?

रोज रोज जिंकण्याचा हट्ट कशासाठी?
रोज रोज धावण्याचा हट्ट कशासाठी?

रानातल्या वेलीवर फुलपाखरू येवून बसले
घरात गुलाब फुलवण्याचा हट्ट कशासाठी?

फांदीवरील पाखरू, शीळ घालून गेले
ते पिंजऱ्यात कोंडण्याचा हट्ट कशासाठी?

पौर्णिमेचे चांदणे रात्री घरभर झरले
आता चंद्र तोडण्याचा हट्ट कशासाठी?

डहाळीचा मोहर मुळांनी पाहिलाही नाही
हा  श्रेय लाटण्याचा हट्ट कशासाठी?

डोंगरातला झरा नदीत झाला रिता 
सगळे शिगोशीग भरण्याचा हट्ट कशासाठी?

शर्यतीतले घोडे गोळी खाऊन मेले
उर फुटेस्तोवर धावण्याचा हट्ट कशासाठी?

कालचे तुझे सु:ख  झाले-कुठे जुने?  
नवे दुख: शोधण्याचा हट्ट कशासाठी?
=============
अभिजित अत्रे
===============

Wednesday, March 2, 2011

सीता

रावणाने ओढले कधी ना ते
पदर तृणाचे
सीतेला खरे दुख:
दुसऱ्या वनवासाचे


जळल्याशिवाय कळणार कसे
मोल अग्नीपरीक्षेचे?
शरयूच्या फितूर पाण्यावर तरले
शब्द धोब्याचे


दाखले नाहीत हे
प्राचीन पुराणाचे
रामाचे बाण भेदती, हे  
अंतर युगांचे


दुभंगण्यास आसूसले अजून
काताळ धरतीचे
विहिरींच्या काठास ओले
रंग हळदीचे


हे नव्हेत अग्निदेव
हे दूत काळोखाचे
जानकीच्या पदरात अजूनी
दान निखारयाचे


हा वारसा थोर कि हे
शाप पुर्वसंचीतांचे?
सितांच्या प्रक्तानांत रुजले
झाड अशोकवनाचे
==============
अभिजित अत्रे
=============